Next
‘हार्ट फेल्युअरच्या लक्षणांबद्दल जागरूकता आवश्यक’
प्रेस रिलीज
Monday, September 24, 2018 | 03:04 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘भारतातील हार्ट फेल्युअरचे प्रमाण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर वाढत असल्याने या विकाराकडे सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. बरेचदा रुग्ण जेव्हा पुढे गेलेली लक्षणे घेऊन रुग्णालयात दाखल होतात किंवा त्यांना हार्ट फेल्युअरशी संबंधित असा दुसरा एखादा हृदयविकार होतो, तेव्हा या विकाराचे निदान होते. त्यामुळे हार्ट फेल्युअरच्या लक्षणांबद्दल जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तातडीने उपाय करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे (सीएसआय) अध्यक्ष डॉ. के. सरत चंद्र यांनी केले.

भारतात कार्डिओव्हस्क्युलर विकारांनी होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढून २०१६ मध्ये २८ टक्के झाली. १९९० मध्ये ती संख्या १५ टक्क्यांवर होती. लॅन्सेट या जागतिक स्तरावरील वैद्यकीय नियतकालिकाने अलीकडेच या संदर्भातील अहवाल प्रसिद्ध केला आहे. यावर डॉ. के. सरत चंद्र यांनी भाष्य केले.

कार्डिओव्हस्क्युलर विकारांपैकी मृत्यूला सर्वाधिक कारणीभूत ठरणारा विकार म्हणजे हार्ट फेल्युअर. या विकाराचे निदान झाल्यानंतर सुमारे २३ टक्के रुग्ण वर्षभरातच दगावतात. हृदयविकाराच्या खुणा व लक्षणांकडे अधिक लक्ष देण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी जागतिक हृदय दिनाचे निमित्त साधून केले आहे. लवकर निदान होईल व उपचार मिळतील याकडे लक्ष द्यावे, कारण यामुळे हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या खाली आणता येईल.

जगातील एकूण इस्केमिक हृदयविकाराच्या रुग्णांपैकी सुमारे १/४ भारतात आहेत. हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हा विकार होतो. भारतीय रुग्णांमधील हार्ट फेल्युअरचे प्रमुख कारण इस्केमिक हृदयविकार हे आहे. पंजाब, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू आणि त्याखालोखाल हिमाचल प्रदेश व पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये इस्केमिक हृदयविकाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. तज्ज्ञांच्या मते, हार्ट फेल्युअर या विकाराकडे आवश्यक तेवढे लक्ष दिले जात नाही आणि त्यामुळे हा विकार मूकपणे व जलद गतीने रुग्णांचे बळी घेत आहे, त्यांना वारंवार रुग्णालयात दाखल होण्यास भाग पाडत आहे.

‘सीएसआय’चे माजी अध्‍यक्ष आणि रुबी हॉल क्लिनिकच्‍या कॅथ लॅबचे संचालक डॉ. शिरीष हिरेमठ म्‍हणाले, ‘हार्ट फेल्‍युअर हा तीव्र स्‍वरूपाचा आजार आहे. या आजारामध्‍ये रक्‍त पंपिंग करणारे हृदयाचे स्‍नायू कमकुवत होतात. हार्ट फेल्‍युअरने त्रस्‍त जवळपास २३ टक्‍के रुग्‍ण निदानाच्‍या एका वर्षातच मृत्‍यू पावतात. रुबी हॉल क्लिनिकमध्‍ये आम्‍ही आमच्‍या क्रिटिकल केअर युनिटमध्‍ये रोज किमान दोन हार्ट फेल्‍युअरने पीडित रुग्‍ण दाखल झाल्‍याचे पाहतो. यापैकी बहुतेक रुग्‍णांमध्‍ये आजार प्रगत टप्‍प्‍यावर पोहोचलेला असतो. म्‍हणूनच वेळेवर उपचार सुरू करण्‍यासाठी हार्ट फेल्‍युअरची लक्षणे लवकरात लवकर ओळखणे अत्‍यंत महत्‍त्‍वाचे आहे. यामुळे हॉस्पिटलचा खर्च वाचू शकतो आणि रुग्‍णाचे आयुष्‍य वाढू शकते.’

डॉ. हिरेमठ पुढे म्‍हणाले, ‘हार्ट फेल्‍युअरने पीडित रुग्‍ण त्‍यांची स्थिती व लक्षणांच्‍या तीव्रतेवरून विभागण्‍यात येतात. ऑफिसला जाणे आणि रोजची घरातील कामे करणे अशी नेहमीची कामे करणारे रुग्‍ण ग्रेड दोन रुग्‍ण मानले जातात. औषधोपचार व जीवनशैलीमधील बदलांमुळे जीवन स्थिर झालेले रुग्‍ण ग्रेड तीन रुग्‍ण मानले जातात. आजारांच्‍या लक्षणांमुळे वारंवार हॉस्पिटलला जाण्‍याची गरज असलेले रुग्‍ण ग्रेड चार रुग्‍ण मानले जातात. दर महिन्‍याला मला भेट देणाऱ्या रुग्‍णांपैकी २० टक्‍के रुग्‍ण ग्रेड दोन व तीन रुग्‍ण आहेत आणि ते औषधोपचार व जीवनशैलीमधील बदलांनुसार त्‍यांची स्थिती नियंत्रित ठेवू शकतात.’

हार्ट फेल्युअर म्हणजे हृदयक्रिया बंद नव्हे, तर याचा अर्थ हृदयाचे स्नायू कमकुवत झाले असून, ते व्यक्तीच्या शरीराच्या ऑक्सिजन व पोषणात्मक मागण्या पूर्ण करण्याइतपत रक्ताचे पंपिंग करू शकत नाही आहेत. कुटुंबात इस्केमिक  हृदयविकारांचा इतिहास असणे, कोरोनरी आर्टरी विकार (सीएडी), ह्रदयविकाराचा धक्का, उच्च रक्तदाब, हृदयाच्या झडपेचा आजार, कार्डिओमायोपथी, फुप्फुसांचे विकार, मधुमेह, स्थूलता, मद्य किंवा अंमली पदार्थांचे सेवन आणि एकंदर कुटुंबातील हृदयविकाराबाबतचा इतिहास यांचा हार्ट फेल्युअरमागील धोक्याच्या घटकांमध्ये समावेश होतो. श्वासोच्छ्वासास त्रास किंवा धाप लागणे, घोटे किंवा पाय किंवा ओटीपोटावर सूज येणे, व्यवस्थित श्वसन व्हावे यासाठी रात्री झोपताना उंच उशी घेण्याची गरज भासणे आणि दैनंदिन कामे करताना कोणत्याही कारणाशिवाय थकवा येणे ही हार्ट फेल्युअरचा इशारा देणारी सामान्य लक्षणे आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link