Next
स्पर्धा परीक्षेसोबत वेगळे कौशल्यही आत्मसात करा
डॉ. ज्ञानेश्वर मुळेंचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला
अमोल आगवेकर
Monday, July 08, 2019 | 11:28 AM
15 0 0
Share this article:

डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या जीवनावर आधारित ‘सृजनशील जगन्मित्र’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर...

पुणे :
‘स्पर्धा परीक्षा देण्यासाठी देशभरातून लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. त्यासाठी अत्यंत कष्टही करतात. दर वर्षी जास्तीत जास्त एक हजार विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होतात. प्रशासकीय सेवेत जाऊन देशसेवा करण्याचे उद्दिष्ट मनात बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा विचार करून स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धेत उतरण्यापूर्वीच एखादे कौशल्य आत्मसात करायला हवे. परीक्षेत यश न मिळाल्यास चरितार्थ चालवण्यासाठी त्या कौशल्याचा उपयोग होऊ शकतो,’ असा मोलाचा सल्ला भारतीय परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या जीवनावर आधारित ‘सृजनशील जगन्मित्र’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (सात जुलै) पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (३१३१) रवी धोत्रे उपस्थित होते. युनिक अॅकॅडमीचे नागेश गव्हाणे, पुस्तकाच्या लेखिका शुभांगी मुळे, उद्योजक नितीन मुळे आणि ‘ग्रंथाली’च्या प्रकल्प प्रमुख धनश्री धारप या वेळी मंचावर उपस्थित होत्या. प्रकाशनानंतर डॉ. मुळे यांनी ‘स्पर्धा परीक्षा... आजचा विद्यार्थी आणि मी’ या विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. मुळे म्हणाले, ‘मी भारतातील सगळ्या राज्यांत फिरलो आहे. तिथे विद्यार्थांशी संवाद साधला, तेव्हा किती जणांना अमेरिकेला जाण्याची इच्छा आहे, असा प्रश्न आवर्जून विचारला. त्यातील ७० ते ९० टक्के मुलांनी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांत जाऊन नोकरी करण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचे आहे. महाराष्ट्राचा विचार केला, तर आता प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे सुरू झाली आहेत; पण अडचण अशी झाली आहे, की सध्या देशात १५ लाख मुले स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. त्यापैकी पाच ते सहा लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि त्यातील केवळ एक हजार विद्यार्थी उत्तीर्ण होतात. त्यामुळे या चक्रव्यूहात येण्याआधी येथे नापास होण्याची शक्यता जास्त आहे हा विचार विद्यार्थ्यांनी करावा.’

डॉ. ज्ञानेश्वर मुळेडॉ. मुळे यांनी सध्याच्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘आता पुण्यात काय किंवा दिल्लीत काय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांनी एक बाजारपेठ तयार केली आहे. यामध्ये मध्यम किंवा उच्च मध्यम वर्गातील मुले लाख-दीड लाख रुपयांचे शुल्क भरून येतात. ही मुले डॉक्टर, इंजिनीअर झालेली आणि वेगवेगळ्या विषयांचे शिक्षण पूर्ण केलेली असतात. या परीक्षेसाठी आपल्या सर्व कौशल्यांना बाजूला ठेवून ती तयारी करतात. मी पाहिले आहे, की या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एक धागा समान आहे, तो म्हणजे त्यांचे ‘इग्निशन ऑन’ असते. अर्थात, ‘मी प्रशासकीय अधिकारी होणारच’ अशी इच्छा त्यांच्या मनांत चेतवलेली असते; पण परीक्षा देणाऱ्यांचे आणि निकालाचे प्रमाण पाहता अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नापास होण्याच्या भयापोटी काही जणांनी आत्महत्येपर्यंतचा मार्ग स्वीकारला आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणे हेच जीवनध्येय असू शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेसोबतच अन्य कौशल्य शिकायला हवे, जे त्यांना चरितार्थाचे साधन मिळवून देईल. उद्योजकता विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य सरकार करत आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. त्याचबरोबर युनिक अॅकॅडमीसारख्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या संस्थांनीही आपल्या केंद्रात कौशल्य विकसन अभ्यासक्रम राबवावेत.’

रचनेत बदलाची गरज 
‘शिक्षणातून कारकून तयार करण्याची मेकॉलेने रूढ केलेली पद्धत अजूनही आपण राबवत आहोत. त्यातून सर्जनशील विद्यार्थी घडताना दिसत नाहीत. भारतीय विद्यार्थी अमेरिकेची सेवा करण्याचे ध्येय बाळगतात आणि तिथे स्थायिक होतात. आता भारतात संधी नाही असे कोणीच म्हणू शकणार नाही. आताच्या प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या निवडीच्या पद्धतीचाही फेरविचार व्हायला हवा. कारण समाज, परिस्थिती यातील बदलांप्रमाणे अनुरूप प्रशासकीय सेवा तयार व्हायला हवी. त्यासाठी सध्या राजकारण्यांनी ‘लॅटरल एंट्री’च्या माध्यमातून काही पदे निर्माण केली आहेत. त्या पदांवरील अधिकारी कालसुसंगत काम करू शकतात. त्यामुळे देशाला उपयोगी ठरेल व काळानुरूप असेल अशी निवड प्रक्रिया अस्तित्वात यायला हवी,’ अशी अपेक्षाही डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केली.

‘ग्रंथाली’च्या धनश्री धारप म्हणाल्या,’ ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने नेहमीच विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित केली जातात. ‘सृजनशील जगन्मित्र’ हे त्यातीलच पुढचे पुस्तक आहे. डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे एक प्रज्ञावंत साहित्यिक आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या पुस्तकाला चांगले यश मिळेल. हे पुस्तक ई-बुक  स्वरूपातही बुकगंगा डॉट कॉम या वेबसाइटवर उपलब्ध आहे.’

लेखिका शुभांगी मुळे म्हणाल्या, ‘डॉ. मुळे यांच्याबद्दलचे यू-ट्यूबवरचे व्हिडिओ आणि इतर माहिती मिळाल्यावर त्यांच्यावर पुस्तक लिहिण्याची इच्छा झाली. मी मूळची गायिका, पण हे पुस्तक लिहायचे शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांच्या आई, पत्नी, इतर कुटुंबीयांनी, मित्र-मैत्रिणींनी त्यांच्याबद्धल भरपूर माहिती दिली. त्यांचे शाळेतील शिक्षक, वर्गमित्र, प्रशासकीय सेवेतील सहकारी या सगळ्यांनीच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू माझ्यासमोर मांडले. या सगळ्यांनी मला दाखवलेले डॉ. मुळे हे व्यक्तिचित्र मी शब्दबद्ध केले. सर्वांत मुख्य म्हणजे डॉ. मुळे यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्व बाजू मोकळेपणाने लिहिण्याची मुभा दिली. त्यांनी कुठेच हस्तक्षेप केला नाही. माझे पती नितीन मुळे व कुटुंबानेही मला मोलाचे सहकार्य केले.’

नागेश गव्हाणे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी युनिक अॅकॅडमीच्या कार्याबद्दल माहिती दिली. प्रणित कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

(‘सृजनशील जगन्मित्र’ या पुस्तकाबद्दलची डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांची प्रतिक्रिया पाहा सोबतच्या व्हिडिओत. हे पुस्तक आणि ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search