Next
भाषाशुद्धीचे भगीरथ - स्वा. सावरकर
BOI
Monday, May 28, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

प्रखर देशभक्त आणि अलौकिक प्रतिभाशक्ती असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज (२८ मे) जयंती. त्या निमित्ताने, भाषाशुद्धीसाठी त्यांनी केलेल्या भगीरथ कार्याचे स्मरण करून देणारा हा विशेष लेख...
............  
दर वर्षी २८ मे ही तारीख आली, की सर्व सावरकरभक्तांमध्ये अस्मितेची ज्वाला प्रज्ज्वलित होते. क्रांतिकारकांच्या या युवराजाला वंदन करण्याची अहमहमिका सुरू होते. मुळातच दैवदुर्लभ अशा गुणांनी मंडित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पैलू अनेक. त्यातल्या एका-एका पैलूचे कवडसे पडले, तरी डोळे दिपून जातात. स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, साहित्यिक, इतिहासकार - सावरकरांनी ज्या क्षेत्रात पाऊल टाकले त्या क्षेत्रात शिखर गाठले. त्यातल्या ‘भाषाशुद्धीचा आधुनिक प्रणेता’ या त्यांच्या रूपाकडे मात्र अंमळ दुर्लक्षच झालेले. मराठी भाषेसाठी त्यांनी जिवाच्या कराराने केलेले प्रयत्न बहुतेकांना माहीत असतात; मात्र त्या प्रयत्नांना दाद देण्याची दानत फारच थोड्यांमध्ये असते. किंबहुना त्यांच्या या आग्रहाची थट्टा उडविणारेच जास्त – अर्थात गतानुगतिक लोकांमध्ये दृढ इच्छाशक्ती बाळगणाऱ्या प्रत्येकाच्या वाट्याला ते प्राक्तन आलेले - त्याचे वैषम्य त्यांनी स्वतःही कधी बाळगले नाही. परंतु मातृभाषा मराठी म्हणून सांगणाऱ्यांनी त्यांचे ऋण मनी बाळगायलाच हवेत.

वास्तविक सावरकरांसारखा खंदा भाषायोद्धा मराठीला लाभला, हे या समाजाचे भाग्य. ‘मराठी भाषेतील शुद्धी चळवळीला जेवढे झुंजार नेते लाभले, तेवढे हिंदुस्थानातील अन्य कोणत्याही भाषेला क्वचितच लाभले असतील. मदनलाल धिंग्रांसारख्या निधड्या छातीच्या वीराला स्फूर्ती देणारा, भारतातील अनेक ‘धिंग्रां’ना पुस्तकाच्या वेष्टणातून पिस्तुले पाठविणारा, काळ्या पाण्यावरील अंधार कोठडीतही भिंतीवर महाकाव्य लिहिणारा हा असामान्य वीर, अंदमानातून सशर्त सुटका होताच एखाद्या भाषेच्या प्राध्यापकाला शोभावी अशी चळवळ तितक्याच एकनिष्ठपणे हाती घेतो, हा एक विलक्षण चमत्कारच मानवा लागेल!’ असे गौरवोद्गार श्री. के. क्षीरसागर यांनी त्यांच्याबद्दल काढले आहेत.

मराठीत जे काम स्वातंत्र्यवीरांनी केले त्या तोडीचे काम इंग्रजीत दोघांनी केले - इंग्लंडमध्ये डॉ. सॅम्युएल जॉन्सन आणि अमेरिकेत नोआह वेब्स्टर. एकाने इंग्रजी भाषेला तिचा खऱ्या अर्थाने पहिला  शब्दकोश करून दिला, तर दुसऱ्याने त्याच इंग्रजीला अमेरिकी रूपडे दिले. इंग्रजी, फार्शी आणि अरबी अशा चहूबाजूंच्या विळख्यात सापडलेल्या मराठीला तिचे स्वतःचे ठाशीव रूप देण्यासाठी सावरकरांएवढी तोशीस अन्य कोणी क्वचितच घेतली असेल. डॉ. जॉन्सन आणि वेब्स्टर यांना त्यांच्या त्यांच्या समाजाने डोक्यावर घेऊन मिरविले. त्यांच्या महिम्याला आजही खळ लागलेली नाही. मग सावरकरांच्याच वाट्याला हा श्रेयनकार का?

सावरकरांनी मराठी भाषेत अनेक नवे शब्द रूढ केले. एखाद्या शिल्पकाराने छिन्नी घेऊन काळ्या फत्तरात लेणी घडवावी, तसे श्रम त्यांनी केले. राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांना मुक्ती देण्यासाठी घोर तप केले आणि पृथ्वीतलावर गंगा अवतीर्ण केली. सहस्र वाटांनी त्या गंगेने भारतभूमी समृद्ध केली. सावरकरांनी मराठी भाषेला परकीय भाषांपासून मुक्त करण्यासाठी अहर्निश चिंतन केले आणि हजारो शब्दांची घडण केली. त्या शब्दांनी आज महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आहे. ‘सावरकरी टांकसाळ’ या नावाने हिणवल्या गेलेल्या त्या कार्याची समृद्धी आज आपण भोगत आहोत. स्वातंत्र्यलढ्याप्रमाणेच याही लढ्यासाठी त्यांची प्रेरणा होती छत्रपती शिवाजी महाराजांची. शिवरायांच्या काळी फार्शी शब्दांचा उपयोग सर्वत्र केला जाई. याला उत्तर म्हणून त्यांनी रघुनाथपंत हणमंते यांना आज्ञा करून राजव्यवहार कोशाची निर्मिती केली. त्याचप्रमाणे सावरकरांनी महापौर, दिनांक, अध्यासन, प्रपाठक, विधिज्ञ, टपाल, दूरमुद्रक, नेपथ्य असे अनेक शब्द मायमराठीला दिले.

अन् या सर्वांवर बोळा फिरवत आजकाल आपल्याकडे वृत्तपत्रे, वाहिन्या, चर्चा वा साहित्यातून इंग्रजी आणि हिंदीची सरमिसळ करणे यालाच आधुनिकता मानणाऱ्यांची संख्या जास्त. अवतरण चिन्हांच्या महिरपीत कोंबून कोंबून इंग्रजी शब्द वापरण्याचा सोस वाढतोय. उदाहरणच घ्यायचे झाले, तर ‘लायब्ररी’ या शब्दाला सावरकरांनी ‘ग्रंथालय’ हा शब्द दिला होता, तर ‘रीडिंग रूम’ला ‘वाचनालय.’ आज ग्रंथालयाने आपली जागा बऱ्यापैकी टिकवून धरली असली, तरी रीडिंग रूमचा सोस गल्लोगल्ली वाढतोय. अन्य भाषेतील शब्द आपल्या भाषेत आणल्यामुळे भाषा समृद्ध होते, हा युक्तिवाद अशा वेळी कामी येतो. पडत्या फळाची आज्ञा घ्यायचेच ठरल्यावर फळ कुठले आहे, याच्याशी काय मतलब? त्यात गंमत म्हणजे आपले घर समृद्ध करण्यासाठी हे जे परकीय शब्द आणायचेत, ते वेगवेगळ्या दुकानांतून (भाषांतून) नव्हे, तर एकाच दुकानातून  - इंग्रजी किंवा हिंदी. जवळपास सारख्याच असलेल्या  तमिळ, कन्नड, तेलुगू अशा भाषांमधून हे शब्द का घ्यायचे नाहीत? अर्थात, येथे दोन मुद्दे सांगता येतील. ते म्हणजे मराठीशिवायच्या अन्य भारतीय भाषांमध्येही हीच परिस्थिती आहे. दुसरे म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नवे शब्द घडवताना संस्कृतचा आधार घेण्याची भलामण केली आहे, तीसुद्धा एकांगीच आहे. तमिळ किंवा गुजरातीसारख्या भाषांमधून ही उधार-उसनवार का करायची नाही?

असे असले, तरी सावरकरांच्या शब्दयज्ञाचे मोल तसूभरही कमी होत नाही. उलट आपण ते मोल कधी समजू शकू की नाही, असा प्रश्न पडतो. सुमारे १०० वर्षांपूर्वी जो यज्ञ त्यांनी सुरू केला, तो आता मराठी भाषेपुरता मर्यादित राहिला नाही. हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळाल्यावर ती संस्कृतनिष्ठ करण्यात आली (हाही स्वातंत्र्यवीरांचाच विचार!) आणि हिंदीत शिरलेल्या परकीय शब्दांची हकालपट्टी सुरू झाली. आज त्याच हिंदीला इंग्रजीने विळखा घातला असून, हिंग्लिश नावाच्या कॉन्व्हेंटगुजरी भाषेने थैमान घातले आहे. अशा वेळी ‘ठेठ देसी’ हिंदीभाषकांना आठवण होते ती सावरकरांच्या भाषाशुद्धीची. डॉ. रघुवीर यांच्या प्रयत्नाने शासन व प्रशासनात रूढ झालेल्या शब्दांमागे त्यांचीच प्रेरणा होती.

संस्कृतमध्ये एक वचन आहे ‘ऋषीणां वाचम् अर्थो अनुधावति!’ याचा अर्थ सामान्य लोकांच्या तोंडचे शब्द अर्थानुसार बाहेर पडतात. परंतु थोर व्यक्तींच्या तोंडातून बाहेर पडलेल्या शब्दांमागे अर्थ आपणहून धावत येतो. आज आपण सराईतपणे वापरत असलेल्या या शब्दांमागे त्या आधुनिक दधिची ऋषीची तपस्या होती. एरव्ही त्या शब्दांना हे मोल आले नसते! (सावरकरांच्याच शैलीत सांगायचे म्हणजे मोल येते ना!) अशा या ऋषीला शतशः नमन, त्याच्या भाषायज्ञाला नमन!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बहुतांश पुस्तके ई-बुक स्वरूपात ‘बुकगंगा डॉट कॉम’ या पोर्टलवर मोफत उपलब्ध आहेत. ती डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. ‘तेजस्वी काव्यप्रतिभेचे धनी’ हा सावरकरांच्या काव्यप्रतिभेबद्दलचा विशेष लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 29 Days ago
Purity of language ? Exchange / interchange with other languages is Inevitable . People will do this , when it helps them in everyday Life . Mothertongue ? Of course it is I'mportant . But Pride in it ? It's knowledge is not an achievement . You are born into it , that is all .
0
0

Select Language
Share Link
 
Search