Next
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती
सहा हजार किलो कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारला
BOI
Friday, October 05, 2018 | 05:30 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने जैवविघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सेंद्रिय खत प्रकल्प उभारला आहे. तब्बल सहा हजार किलो कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे. महाविद्यालयाच्या आवारात तीन ठिकाणी उभारलेल्या या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले. या प्रकल्पाद्वारे महाविद्यालयाने स्वच्छ भारत अभियानात आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. या प्रकल्पातून तयार झालेले खत आवारातील झाडांना वापरले जाणार आहे.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी वसतिगृहामध्ये उभारलेला सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प.

या प्रकल्पाच्या उद्घाटनाला नगराध्यक्ष राहुल पंडित, ‘इकोरॉक्स’च्या प्रतिनिधी रश्मी जोशी, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्य विवेक भिडे उपस्थित होते. विघटनशील कचरा, पालापाचोळा, वाया गेलेले अन्न यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत बनवले जाणार आहे. जैविक कचरा विघटनासाठी महाविद्यालयात एका ठिकाणी व मुलींच्या वसतिगृहाच्या आवारात दोन ठिकाणी टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. यात सुमारे सहा हजार किलो कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. टाकीमध्ये तीन कप्पे केले असून, प्रत्येक कप्प्यात पाचशे किलो कचरा साठविण्याची क्षमता आहे. महाविद्यालय, कँटीन व वसतिगृहातील सर्व कचरा, वाया गेलेले अन्न, पालापाचोळा आदी गोष्टी या टाकीत टाकल्या जातील. या टाक्यांमध्ये शेणाचे थर दिले जाणार असून, कल्चर पावडर टाकून गांडूळही सोडले जाणार आहेत. या टाक्यांवर विद्यार्थ्यांनीच वळलेल्या झापांचे आच्छादन टाकण्यात आले आहे. या युनिटमधून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा वापर महाविद्यालयाच्या आवारातील झाडांसाठी केला जाणार आहे. ‘शहरातील मोठ्या संस्था, गृहनिर्माण संस्थांनी वाया जाणारे अन्न, ओल्या कचऱ्यावर अशा प्रकारे प्रक्रिया केल्यास त्याचा उपयोग होईल. स्वच्छ भारत अभियानामध्ये रत्नागिरी नगरपालिकेने देशात ४०वे स्थान मिळवले. २०१९मध्ये आणखी वरच्या स्थानावर झेप घेण्यासाठी अशा प्रकल्पांचा उपयोग होणार आहे. त्यामुळे शहरातील गृहनिर्माण संस्थांनी असे प्रकल्प साकारावेत,’ असे आवाहन केले जात आहे.

ई-कचऱ्याबाबतही गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने मुंबईतील इकोरॉक्स या ‘एनजीओ’सोबत सामंजस्य करार केला आहे. या मोहिमेला बळ देण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेच्या दोन गाड्या शहरातून फिरल्या. या मोहिमेत एकूण ३५० किलो ई-कचरा गोळा झाला. बंद पडलेले मोबाइल, चार्जर्स, वायर्स, टीव्ही, कम्प्युटर, की-बोर्ड, हार्ड डिस्क आदी कचऱ्याचा त्यात समावेश आहे. शहरातून गोळा झालेला ई-कचरा ‘इकोरॉक्स’च्या मार्गदर्शनाखाली सरकारमान्य संस्थेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link