Next
डॉ. होमी भाभांची चित्रे आणि चित्रसंग्रह
BOI
Thursday, November 15, 2018 | 06:45 AM
15 0 1
Share this article:

डॉ. होमी भाभाडॉ. होमी जहांगीर भाभा हे नाव आपल्याला शास्त्रज्ञ म्हणूनच माहिती आहे; पण ते स्वतः एक उत्तम चित्रकार होते आणि कलेचे भोक्तेही होते. समकालीन अनेक चित्रकारांना त्यांनी पाठबळ दिले होते. केम्ब्रिज विद्यापीठात असताना त्यांनी नाटकांचे सेट्सही डिझाइन केले होते. त्यांनी केलेला चित्रसंग्रह मुंबईत ‘टीआयएफआर’ संस्थेत पाहायला मिळतो. ‘स्मरणचित्रे’ सदरात आज डॉ. भाभा यांची चित्रे आणि त्यांच्या चित्रसंग्रहाबद्दल...
.............
डॉ. होमी जहांगीर भाभा हे नाव आपल्यासमोर येते ते शास्त्रज्ञ म्हणूनच. शास्त्रज्ञ असण्यासोबतच ते कलेचे भोक्ते होते. ते स्वतः चित्रे काढत असतच; पण समकालीन कलाकारांनाही डॉ. भाभा यांनी मोठे पाठबळ दिले. त्यापैकी अनेक नामवंत चित्रकार त्यांचे मित्र होते. देशी-विदेशी शास्त्रज्ञ त्यांना भेटायला येत, तेव्हा त्यांच्यासोबत ते मुंबईतील चित्रकारांना आवर्जून जेवायला-चर्चेला बोलावत असत. डॉ. भाभांचा चित्रसंग्रह टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर, नेव्हीनगर, मुंबई) या संस्थेत आहे. 

टीआयएफआर संस्थेतील चित्रसंग्रह

या संग्रहात हुसेन, गायतोंडे, आरा अशांसारख्या नामवंतांची चित्रे आहेत. मला एकत्रित पाहता आलेला हा चित्रांचा खजिना म्हणजे एक मोठी पर्वणीच होती. १९९०च्या सुमारास मुंबईत ‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’सारख्या संस्था नव्हत्याच. चित्रे मांडण्याची दालनेदेखील मर्यादित होती. अशा वेळी आधुनिक चित्रे केवळ खासगी संग्रहात असत. मुळात चित्रे पाहायला मिळणे तसे दुर्मीळच होते तेव्हा. चित्रे छापील स्वरूपात पाहायला मिळत. त्यांचा आकार लहान असल्याने तपशील लक्षात येत नसे. या पार्श्वभूमीवर, डॉ. भाभांच्या संग्रहातील चित्रे स्मरणात राहिली नाही तरच नवल.

डॉ. भाभांनी काढलेले पिप्सी वाडिया यांचे स्केच.मी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्’मध्ये शिकत असताना, ‘महत्त्वाच्या चित्रकारांची चित्रे कोठे पाहायला मिळतील,’ असे विचारल्यावर दादा साळवी सरांनी ‘टीआयएफआर’ला पाहता येतील, असे सांगितले. जाताना ओळखपत्र घेऊन जायला सांगितले. ‘टीआयएफआर’ला खूप कडक सुरक्षाव्यवस्था असल्याने तेथे मला आत सोडेनात. मग सुरक्षा अधिकाऱ्याने एका शास्त्रज्ञांना फोन लावला आणि परवानगी मिळाली. एका सुरक्षारक्षकाबरोबर मला पाठवण्यात आले आणि चित्रे पाहण्याची सोय करून देण्यात आली. तो डॉ. भाभांचा चित्रसंग्रह होता. नोबेल पारितोषिकविजेते शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी तर एकदा डॉ. भाभांची तुलना चित्रकार लिओनार्दो दा विंचीशी केली होती. 

हुसेन यांचे 'भारत भाग्यविधाता' हे चित्र...

मुख्य इमारतीत प्रवेश केला, की लक्ष जाते ते हुसेन यांनी १९६४ साली केलेल्या भव्य अशा ‘भारत भाग्यविधाता’ नावाच्या राजस्थानच्या चित्राकडे. हे चित्र नानाविध रंगांतील आणि भव्यदिव्य आहे. डाव्या बाजूला उंट, काही चेहरे, मग राजस्थानच्या गावाच्या वेशीचा दरवाजा, त्या बाजूला हत्ती... हे सगळे हुसेन यांच्या जोरकस चित्रांनी साधलेले. रंगांचे तजेलदार फटकारे... भारी आकर्षक चित्र... हुसेन यांचे त्यांच्या उमेदीच्या काळातील हे चित्र खूप प्रभावी आहे. ‘थ्रू दी आय ऑफ पेंटर’ या त्यांच्या चित्रपटाची आठवण हे चित्र पाहताना येते. हा लघुपट राजस्थानच्या पार्श्वभूमीवर साकार होतो.

गायतोंडे यांची अमूर्त चित्रे पाहायला मिळणे दुर्मीळ. तेथे त्यांची दोन चित्रे पाहता आली. एखाद्या अमूर्त चित्राचे इतके सुरुप पाहण्याची माझी ती पहिलीच वेळ होती. गायतोंडेंबाबत भारतीय चित्रकारांना सतत उत्सुकता असते. मी तरी त्याला अपवाद कसा असेन? गायतोंडेंच्या चित्रांना अथांग स्वरूप असते. अगदी याच्या विरुद्ध रूप असलेल्या आरा यांची चित्रे तर मी त्यापूर्वी मूळ आकारात आणि स्वरूपात पाहिलीच नव्हती. त्यांचे रंग लावणे पाहून मी तेव्हा अक्षरशः थक्क झालो होतो. आरांच्या चित्रांत रंग लावण्यात खूप वेगळ्या प्रकारचा मोकळेपणा होता. अशा अनेक समकालीन कलाकारांची चित्रे डॉ. भाभा यांच्या संग्रहात होती.

डॉ. भाभा यांनी १७व्या वर्षी काढलेले सेल्फ पोर्ट्रेटडॉ. भाभा स्वतःही उत्तम चित्रे काढीत. पुढे म्हणजे २०१०मध्ये डॉ. भाभांच्या चित्रांचे व संग्रहाचे प्रदर्शन मुंबईत झाले होते, तेव्हा त्यांची चित्रे पाहता आली. वयाच्या १७व्या वर्षी त्यांनी काढलेले आत्मचित्र हे त्याचे उत्तम उदाहरण होय. बॉम्बे आर्ट सोसायटीची अनेक पारितोषिके त्यांना मिळाली होती. केम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी नाटकांसाठी सेट डिझाइन केले होते. अमूर्त चित्रांबरोबरच त्यांनी व्यक्तिचित्रेदेखील केली होती. त्यातील रेखाचित्रे फारच आकर्षक आहेत. जेमिनी रॉय, रावल, के. के. हेबर, बी. प्रभा, एन. एस. बेंद्रे या नामवंतांची चित्रे डॉ. भाभांच्या संग्रहात होती. या समकालीन कलाकृतींबरोबरच गांधार प्रदेशातील भगवान गौतम यांच्या चेहऱ्याचे शिल्पही त्यांच्या संग्रहात आहे.

डॉ. भाभांनी काढलेले सी. व्ही. रामन यांचे स्केच.डॉ. भाभा यांची स्वतःची चित्रे वास्तववादी आहेत. त्यातील शेरगिल व हुसेन यांचे चित्र विशेष पाहण्याजोगे आहे. सुप्रसिद्ध चित्रकर्ती अमृता शेरगिल हिचे ते वडील. त्याप्रमाणेच इतरही व्यक्तिचित्रे पेन्सिल माध्यमावरील भाभा यांची पकड दर्शवितात. त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठात असताना ‘लाइफ इज ए ड्रीम’, ‘सुसान’ या नाटकांबरोबरच मोझार्ट ऑपेरासाठीदेखील सेट डिझाइन केले होते. त्यांच्या एकूण कलात्मक जाणिवांचा आढावा घेताना, पेन्सिलमधील रेखाचित्रे पाहताना, रामन यांनी त्यांना दिलेली ‘भारताचा लिओनार्दो दा विंची’ ही उपमा किती सार्थ आहे, हे लक्षात येते. रामन यांचे डॉ. भाभांनी केलेले व्यक्तिचित्र म्हणजे शेडिंगवरील त्यांचे प्रभुत्व आणि चित्रकाराच्या निरीक्षणशक्तीचे उत्तम उदाहरण होय. केम्ब्रिजमध्ये असताना त्यांनी आपल्या प्रोफेसर्सची चित्रे केली. मार्ग प्रकाशनाने १९६८ साली त्यांच्या चित्रांचे स्वतंत्र पुस्तक प्रकाशित केले होते. 

चित्रकार म्हणून नव्याने आधुनिक कला समजावून घेणाऱ्या माझ्यासारख्याला ‘टीआयएफआर’च्या संग्रहामुळे खजिना सापडल्याचा आनंद झाला होता.

- डॉ. नितीन हडप
ई-मेल : nitinchar@yahoo.co.in

(लेखक पुण्यातील चित्रकार असून, काष्ठशिल्पे, पुरातन वास्तू, फॅशन आदी त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘स्मरणचित्रे’ या पाक्षिक सदरातील सर्व लेख https://goo.gl/w99eTN या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(डॉ. होमी भाभा यांच्या चित्रांचा आणि चित्रसंग्रहाचा संपूर्ण खजिना आता ‘गुगल आर्टस् अँड कल्चर’च्या उपक्रमामुळे घरबसल्या पाहणे शक्य आहे. तो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 1
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr,Nandkishor Ramakant Ekbote About 187 Days ago
Excellent !!! Thanks, For New & good Information about Dr.Homi. j.Bhabha.
0
0
Sunil Hambir About 190 Days ago
Thanks for sharing Information about Dr.Artist Homi Bhabha.
2
0

Select Language
Share Link
 
Search