Next
हिंदू महिला सभेतर्फे शीतल चव्हाण यांना दुर्गा पुरस्कार प्रदान
BOI
Tuesday, October 16 | 01:30 PM
15 0 0
Share this story

हिंदू महिला सभेतर्फे शवविच्छेदन करणाऱ्या शीतल चव्हाण यांना दुर्गा पुरस्कार देण्यात आला. या वेळी (डावीकडून) शीतल चव्हाण, विजय फळणीकर व सुप्रिया दामले.

पुणे : हिंदू महिला सभेतर्फे यंदाचा दुर्गा पुरस्कार शवविच्छेदन करणाऱ्या शीतल चव्हाण यांना नुकताच देण्यात आला. ‘आपलं घर’ या संस्थेचे संस्थापक विजय फळणीकर यांच्या हस्ते शीतल चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र आणि धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले, महिला पदाधिकारी, तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. 

शीतल चव्हाण या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनाचे काम करतात. शवविच्छेदन हा शब्द ऐकला तरी आपल्या अंगावर काटा येतो; पण शीतल चव्हाण लहानपणापासून आपल्या वडिलांना या कामात मदत करत आल्या आहेत आणि पुढे उपजीविकेसाठी त्यांनी हेच काम स्वीकारले. आज त्या अपघातांच्या ठिकाणी जाऊनही शवविच्छेदन करतात. काही वेळा त्यांना सलग ४० -४२ तासही काम करावे लागले आहे. मांढरदेवी, भाटघर धरण आदी ठिकाणच्या दुर्घटनां वेळीही त्यांनी शवविच्छेदनाचे काम केले आहे. आतापर्यंत तब्बल सहा हजार मृतदेहांचे शवविच्छेदन त्यांनी केले आहे. असे काम करणाऱ्या त्या महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील एकमेव महिला आहेत. आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. ‘हिंदू महिला सभा, पुणे’ या संस्थेनेही त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना नवरात्रीनिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमात दुर्गा पुरस्कार देऊन गौरविले. शनिवारी, १३ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या कार्यक्रमात शीतल चव्हाण यांचा गौरव करण्यात आला.

‘शवविच्छेदनासारखे काम करताना भीती वाटत नाही का, दुसरे काम का नाही केले,’ असे अनेक प्रश्न शीतल यांना वारंवार विचारले जातात. त्यावर त्यांनी आपल्या मनोगतातून उत्तरे दिली. ‘मी लहान होते तेव्हा, पोटाची खळगी भरण्यासाठी वडील हे काम करत होते. ते थकत असल्याने त्यांना मदत करणे गरजेचे होते. त्यामुळे भीती, घाण वाटत असली तरी मृतदेह उचलणे, आयुधे देणे अशी मदत करू लागले. हळूहळू नजर मेली, भीती नाहीशी झाली. नंतर मोठेपणी जिवंत माणसांपेक्षा मृतदेहच कमी धोकादायक असतात हे उमगले आणि होती नव्हती ती भीतीही नाहीशी झाली. त्यातूनच हेच काम पुढे चालू ठेवायचा निर्णय घेतला. कोणाला तरी  मृत्यूनंतर न्याय देण्याचे काम आपण करतोय, ही भावना खूप समाधान देणारी आहे, त्यामुळे या कामाची ना किळस वाटते ना शीण येतो. कर्तव्यपूर्तीचा आनंद मनाला अधिक उभारी देणारी असतो. समाजसेवा म्हणून मी या कामाकडे बघते,’ असे त्यांनी सांगितले. 

(‘तुजऐसी नाही’ मालिकेतील सर्व लेख https://goo.gl/idhJdV या लिंकवर, तर ‘नवरत्ने’ मालिकेतील लेख https://goo.gl/T9ihBw या लिंकवर उपलब्ध आहेत. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांबद्दल वाचण्यासाठी https://goo.gl/zuvB57 या लिंकवर क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
पूर्णिमा खांबेटे About 95 Days ago
शव या शब्दाची सुद्धा भिती वाटते.पण आपण मात्र महान आहात..एक जगावेगळं कार्य आपण करता.सलाम.त्रिवार सलाम
0
0

Select Language
Share Link