Next
‘नव लेखनाचा प्रवास वैचारिक बैठकीकडे व्हावा’
‘सोशल मीडिया आणि नवलेखनाची परंपरा’ परिसंवादात सूर
प्रेस रिलीज
Tuesday, January 08, 2019 | 01:06 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘प्रतिक्रियात्मक लेखनाकडून वैचारिक बैठकीकडे नव लेखनाचा प्रवास व्हावा,’ असा सूर अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनातील ‘सोशल मीडिया आणि नवलेखनाची परंपरा’ या विषयावर आयोजित परिसंवादात उमटला.

मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळ आणि महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने आयोजित १२ व्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पाच जानेवारी २०१९ रोजी सकाळी ‘सोशल मीडिया आणि नवलेखनाची परंपरा’ या विषयावर  परिसंवाद झाला. यात पत्रकार कलीम अजीज, प्रा. डॉ. समाधान इंगळे, ‘अक्षरनामा’ पोर्टलचे राम जगताप, पत्रकार हीना कौसर खान, कुणाल गायकवाड आदींचा सहभाग होता. हे संमेलन आझम कॅंपस येथे आयोजित केले होते.

या वेळी हीना कौसर खान म्हणाल्या, ‘नव माध्यमांवरील लिखाण करणारे तरुण पुस्तक न लिहिणारे पण, तरीही लेखकच आहेत. काळ समजून घ्यायला या नोंदी उपयोगी पडतील. प्रतिक्रियात्मक लेखन या नव माध्यमांवर अधिक होत असले, तरी ते उथळ नाही; मात्र या लिखाणाचा वैचारिक बैठकीकडे प्रवास सुरू झाला पाहिजे.’

गायकवाड म्हणाले, ‘नव माध्यमातील लिखाणातून साहित्याची नवी सैद्धांतिक मांडणी होताना दिसत नाही. संशोधन केले पाहिजे, असा दृष्टीकोन दिसत नाही. प्रस्थापित साहित्यात जितका जातीयवाद नाही, तितका नव माध्यमात दिसतो; मात्र एकाच कंपनीकडे नव माध्यमांची मालकी असणे धोक्याचे आहे.’

‘अक्षरनामा’चे जगताप म्हणाले, ‘भोवतालच्या घडामोडी समजून घ्यायला सोशल मीडिया उपयोगी पडतो. मुस्लिम तरुणांनी अजून अधिक प्रमाणात सोशल मीडियाकडे वळले पाहिजे. आपण कुठलीही गोष्ट फॉरवर्ड करताना स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की हा मजकूर विश्वासार्ह आहे का, त्यातून सोशल मीडियावर फॉरवर्ड होणारा फसवणूक करणारा निम्मा मजकूर कमी होईल. अनेक तरुण-तरुणी इथे सशक्तपणे, सकारात्मक व्यक्त होत आहेत, त्यातून प्रत्येकाला रोज नवी उमेद मिळेल.’

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. इंगळे यांनी सोशल मीडियावरील नव लेखकांचा परिचय करून देत निवडक उतारे वाचून दाखवले. ते म्हणाले, ‘सोशल मीडियामुळे नवी भाषा, नव्या इमोजीची अभिव्यक्ती निर्माण होत आहे. सामाजिक, राजकीय बदल होत आहेत. अॅडिक्शनदेखील निर्माण होत आहे. प्रस्थापित माध्यमांनाही सोशल मीडियावरील टीकेने अनेकदा बदलावे लागले आहे.’

दाहक मुजावर यांनी सूत्रसंचालन केले. फिरोज खान यांनी वक्त्यांचा सत्कार केला.

यानंतर सकाळच्या सत्रात ‘मुस्लिम तरुणांपुढील आव्हाने’ या विषयावर झालेल्या परिसंवादात डॉ. एस. एन. पठाण, गणी  आजरेकर, चंद्रशेखर शिखरे, डॉ फारुख तांबोळी, हलीमा कुरेशी, अझीम शेख आदी सहभागी झाले होते. दुपारच्या सत्रात झालेल्या ‘प्रसारमाध्यमे आणि मुसलमान’ या परिसंवादात डॉ. जयदेव डोळे, संजय आवटे, आमदार इम्तियाझ जलील, बशीर मुजावर, राज काझी, अझीम शेख, साजिद पठाण आदींचा सहभाग होता.

सायंकाळच्या सत्रात झालेल्या ‘धार्मिक ध्रुवीकरण आणि  समतेच्या चळवळी’ या परिसंवादात डॉ. रत्नाकर महाजन, अन्वर राजन, निरंजन टकले, डॉ. सय्यद रफिक पारनेरकर, ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे महाराज, डॉ. सुदाम राठोड आदी  सहभागी झाले. यानंतर ‘अनुवंशिक गैरसमज’ ही एकांकिका सादर झाली. रात्री आयोजित केलेल्या ‘मुस्लिम यशस्वी उद्योजकांशी संवाद’ या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ‘मिला जुला मुशायरा’ कार्यक्रम रंगला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna gramopadhye About 7 Days ago
Excellent idea . More. Of such. Events , pl. And more publicity Best wishes .
0
0

Select Language
Share Link