Next
गोविंदांना संरक्षण देणारी दहीहंडी
BOI
Wednesday, September 05, 2018 | 02:44 PM
15 0 0
Share this story

गोविंदाला संरक्षण देण्यासाठी हार्नेस, रोप जोडताना रत्नदुर्ग माउंटेनीअर्सचे गणेश चौघुले, संजय खामकर

रत्नागिरी : दहीहंडी किती थरांची असावी, त्यात सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या जिवाची काळजी घ्यायला हवी, वगैरे गोष्टींवर संपूर्ण राज्यभर दर वर्षी चर्चा होत असते. प्रत्यक्षात मात्र त्यावर ठोस काही केले जात नाही. दहीहंडीच्या दिवशी अनेक गोविंदा पडून जखमी होतात किंवा काहींचा दुर्दैवी मृत्यूही होतो. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीतील एका दहीहंडीच्या सर्वांत वरच्या थरातील गोविंदाला दोरखंड आणि हार्नेसद्वारे संरक्षण देण्याचा चांगला प्रयोग रत्नदुर्ग माउंटेनीअर्स संस्थेने राबवला. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत असून, सर्व ठिकाणी असे केले गेले, तर अनेक गोविंदांचे जीव वाचू शकतात. रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे मोटार मालक संघटनेचा दहीहंडी उत्सव सोमवारी (तीन सप्टेंबर २०१८) पार पडला. त्यामध्ये सलामी देणाऱ्या २२ गोविंदांना रत्नदुर्ग माउंटेनीअर्स या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दोरखंड (रोप) व ‘हार्नेस’द्वारे संरक्षण दिले. रत्नदुर्ग माउंटेनीअर्सने रत्नागिरीत हा नवा पायंडा सुरू केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

दहीहंडीचा साहसी क्रीडा प्रकारामध्ये समावेश केल्यामुळे गेल्या वर्षी रत्नदुर्ग माउंटेनीअर्सचे सचिव संजय खामकर यांनी ‘हंडी फोडणाऱ्या सर्वांत वरच्या गोविंदांचे दोरखंडाच्या साह्याने संरक्षण करता येण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत,’ असे सुचवले. हा प्रयोग सुरुवातीला त्यांनी रत्नागिरीत ते राहतात त्या सोसायटीमध्ये केला. तो यशस्वी झाल्यामुळे यंदा मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना असा उपक्रम राबवण्याबाबत त्यांनी सुचविले. या गोष्टीचे महत्त्व पटल्याने मोटार मालक संघटनेने ‘रत्नदुर्ग’च्या टीमला पाचारण केले.

गिर्यारोहणातील तंत्र वापरून सर्वांत वरच्या थरावर जाऊन सलामी देणाऱ्या गोविंदाला हार्नेस जोडून दोरखंडाद्वारे संरक्षण देण्यात आले. रत्नदुर्ग माउंटेनीअर्सचे अध्यक्ष शेखर मुकादम, फिल्ड इन्चार्ज गणेश चौघुले, जितेंद्र शिंदे, संजय खामकर, संतोष दैत आणि सनील डोंगरे यांनी ही सेवा दिली. ‘मोटार मालक संघटनेने दिलेल्या सहकार्यामुळे ही सेवा देता आल्यामुळे त्यांचे विशेष आभार,’ अशी भावना ‘रत्नदुर्ग’तर्फे व्यक्त करण्यात आली. पुढील वर्षी जास्तीत जास्त दहीहंडी आयोजकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष मुकादम यांनी केले.

‘रत्नदुर्ग माउंटेनीअर्स’ ही संस्था गिर्यारोहणात रत्नागिरीत कार्यरत आहे. संस्थेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू आहे. अलीकडेच राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील धबधब्यावर अडकलेल्या १३ पर्यटकांना या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यशस्वीरीत्या वाचवले होते. त्यामुळे रत्नदुर्ग माउंटेनीअर्स ही रत्नागिरीतील संस्था देशात चमकली होती.

अधिक माहितीसाठी संपर्क :
गणेश चौघुले - ९०८२१ ०७८०१

(रत्नदुर्ग माउंटेनीअर्सच्या पर्यटनविषयक उपक्रमांबद्दलची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link