रत्नागिरी : देशात ६५० ठिकाणी एकाच वेळी सुरू होणाऱ्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या रत्नागिरी शाखेचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते होणार आहे. शनिवारी, एक सप्टेंबर २०१८ रोजी दुपारी अडीच वाजता माळनाका येथील मराठा मैदानावर उद्घाटन कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाला आमदार उदय सामंत, जि. प. अध्यक्षा स्वरूपा साळवी, नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपणही या वेळी दाखवण्यात येणार आहे. क्यूआर कार्डचे वितरण आणि बँकेच्या उद्घाटनानिमित्त स्पेशल कव्हरचे अनावरण होणार आहे.
गावोगावी कार्यक्रम
असेच कार्यक्रम वाटद येथे माध्यमिक विद्यामंदिरात सरपंच प्रशांत घोसाळे यांच्या, सोमेश्वर ग्रामपंचायतीमध्ये सरपंच गजानन बोरकर यांच्या, भाट्ये ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पराग भाटकर यांच्या आणि सैतवडे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सरपंच श्रीमती संज्योत चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहेत.
जिल्ह्यात ५८४ डाक शाखा कार्यालये व ७९ विभागीय कार्यालये आहेत. पोस्टमन व ग्रामीण डाकसेवकांमार्फत बँकेच्या विविध सेवा पोहोचवल्या जाणार आहेत. याकरिता त्यांना स्मार्टफोन दिला असून, त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत २२० खाती उघडली आहेत. उद्घाटनानंतर खात्यांची संख्या वाढेल, असा विश्वास पोस्टातर्फे व्यक्त करण्यात आला. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची रत्नागिरीतील शाखा रत्नागिरीतील सुभाष रोडवरील मुख्य टपाल कार्यालयात आहे.
‘इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक जिल्ह्यात नक्की क्रांती घडवेल. ग्रामीण भागात ग्राहकांना घरपोच पैसे देणे, भरणे यासाठी खूपच उपयोगी ठरेल. छोटे व्यापारी, विद्यार्थी व विमा आणि गुंतवणूक क्षेत्रात ही बँक चांगली कामगिरी करेल. शिवाय देशातील सर्वांत मोठी बँक अशी ख्याती मिळवेल. सध्या ग्राहकांची खाती कागदपत्रांशिवाय बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे उघडण्यात येत आहेत,’ असे रत्नागिरी जिल्ह्याचे डाकघर अधीक्षक ए. बी. कोड्डा यांनी सांगितले.
पोस्ट पेमेंट बँकेची वैशिष्ट्ये
- उत्पादने व सेवा - बचत, चालू खाते,
- मनी ट्रान्स्फर - सोपे व सुरक्षित, तत्काळ, २४ तास उपलब्ध.
- सबसिडी पेमेंट - मनरेगा, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी सबसिडी, सामाजिक कल्याणकारी योजनांचा लाभ
- अन्य उत्पादने व सेवा - कर्ज, विमा, गुंतवणूक, डाकघर बचत योजना, बिल पेमेंट- मोबाईल व डीटीएच रिचार्ज, वीज, पाणी, गॅस बिल, विमा हप्ता पेमेंट.
- उद्योगक्षेत्र व व्यावसायिकांचे पेमेंट - भारतीय डाक विभागाच्या सुविधा, ई-कॉमर्स वस्तूंच्या वितरणाचे संगणकीकृत पेमेंट, छोटे व्यापारी, किराणा दुकान, असंघटित किरकोळ व्यापार, ऑफलाइन पेमेंट, रोख व्यवस्थापन सेवा.