Next
साहित्यिकांच्या गावाची सफर करण्याची संधी
प्रेस रिलीज
Thursday, March 15, 2018 | 05:14 PM
15 0 0
Share this article:

'चला साहित्यिकांच्या गावाला' उपक्रमाच्या माहितीपुस्तिकेचे अनावरण करताना विशाल सोनी, डॉ. गणेश राऊत, मनोहर सोनावणे, लक्ष्मीकांत देशमुख, मिलिंद जोशी, आश्लेषा महाजन व नितीन शास्त्री

पुणे : ‘महाराष्ट्रातील वाचकप्रिय साहित्यिकांच्या गावी जाऊन कोकणातील निसर्गसौंदर्य साहित्यिकांच्या नजरेतून, त्यांच्या गावातून अनुभवण्याची संधी वाचनप्रेमी रसिकांना देण्यासाठी विश्वकर्मा पब्लिकेशन्स आणि ऑफबीट डेस्टिनेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चला साहित्यिकांच्या गावाला’ या अनोख्या सहल उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून प्रथम कोकणची साहित्यसफर रसिकांना घडणार आहे’, अशी माहिती ऑफबीट डेस्टिनेशनचे नितीन शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

या उपक्रमाच्या माहितीपुस्तिकेचे अनावरण या वेळी करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कवयित्री आश्लेषा महाजन, डॉ. गणेश राऊत, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संपादक मनोहर सोनवणे या वेळी  उपस्थित होते. 

याबाबत अधिक माहिती देताना शास्त्री म्हणाले, ‘दोन  ते नऊ मे या कालावधीत हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या विशेष सहलीमध्ये आपल्याला कोकणातील निसर्गसौंदर्य बघायला मिळणार असून, त्यासोबत आपल्या लाडक्या साहित्यिकांची घरे, स्मारके, अनुभवायला मिळणार आहे. मराठीत पहिले प्रवासवर्णन लिहणारे गोडसे भटजी यांचे पेणजवळील गाव ते विनोबा भावे यांचे गागोदे, मधु मंगेश कर्णिक, मंगेश पाडगावकर यांचे वेंगुर्ला, वि. स. खांडेकरांचे शिरोडा अशी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि दापोलीजवळील काही ठिकाणे पाहता येणार आहेत, ते ही कवी अशोक नायगावकर, कवयित्री आश्लेषा महाजन आणि अरुण म्हात्रे यांच्या समवेत. हे या सहलीचे खास वैशिष्ट्य असेल.’ 

या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, ‘लेखक व वाचक यांच्यातील बंध आणखी घट्ट होण्यासाठी ‘चला साहित्यिकांच्या गावाला’ हा उपक्रम उपयुक्त ठरेल. आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी, लोकमान्य टिळक, मंगेश पाडगावकर, जयवंत दळवी, केशवसुत, आरती प्रभू  यांच्यासारख्या महान साहित्यिकांच्या गावांना भेटी देऊन त्यांनी ज्या स्थितीत साहित्यनिर्मिती केली, ती वास्तू, तिथला परिसर प्रत्यक्षरित्या पाहण्याचा अनुभव या उपक्रमातून मिळणार आहे. कोकणातील अशा महान साहित्यिकांच्या साहित्याचे वाचन, विद्यमान साहित्यिकांच्या मैफली यामुळे लेखक-वाचक यांच्यातील बंध आणखी घट्टा होतील. या उपक्रमामुळे साहित्यक्षेत्रात एक वेगळा प्रयोग होईल.’

डॉ. मिलिंद जोशी म्हणाले, ‘आधुनिक भारताच्या इतिहासात कोकणच्या सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वाने एक अढळ स्थान मिळविले आहे. रँग्लर परांजपे, अण्णासाहेब कर्वे, साने गुरुजी, कवी केशवसुत ही सारी मंडळी कोकणचीच. मराठी साहित्यातील अनेक दिग्गज लेखक, कवी, नाटककार, नट आणि कलावंत मूळचे कोकणातील. भूदानचे प्रणेते (भारतरत्न) विनोबा भावे हे गागोद्याचे तर आपल्या कलेने सर्वाना भुरळ पाडणारा मनस्वी कलावंत मच्छिंद्र कांबळी मालवणचा; ज्या श्यामची आईची गोष्ट आजही घरा-घरांत बालकांना आजी-आजोबांकडून सांगितली जाते, ते लिहिणारे साने गुरुजी पालगडचे. या साहित्यिकांना भेटण्याचा जणू हा योग आहे.’

विशाल सोनी म्हणाले, ‘समस्त मराठी वाचकांसाठी ‘सकस साहित्य आणि दर्जेदार पुस्तक निर्मिती’ हे ब्रीद सत्यात रुजवणारे पुण्यातील विश्वकर्मा पब्लिकेशन्स या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे सहआयोजक आहेत, हे नमूद करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. ‘सुजाण वाचक’ हेच आपले शक्तिस्थान मानून विश्वकर्मा व्ही.पी. बुक क्लब, पुणे इंटरनॅशनल लिटरेचर फेस्टिव्हल व राज्यभर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्याने अशा उपक्रमांचे सतत आयोजन करुन आपले साहित्यिक व सामाजिक दायित्व पार पाडत आहे.’

अधिक  माहितीसाठी :
ऑफ बीट डेस्टिनेशन्स्, शॉप नं.१, रामचंद्र अपार्टमेंट्स, ५८६, शनिवार पेठ, नारायण पेठ पोलीसचौकीजवळ, पुणे-३० 
मोबाईल क्रमांक  : ९४२२० १०४६७  /९६६५५ २६०५४/ ७२७६४ ४५६००   

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search