Next
‘चायनीज बॅले’ने नागपूरकर मंत्रमुग्ध
प्रेस रिलीज
Wednesday, February 07 | 05:38 PM
15 0 0
Share this story

 
नागपूर : केवळ पायाच्या बोटांवर शरीराचा भार देऊन सादर होणारे डौलदार ‘चायनीज बॅले’ नृत्य बघून नागपूरकर रसिक अक्षरशः स्तिमित झाले होते. चीनमधील गुआनशो बॅले समूहाने रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात याचे सादरीकरण केले. लयबद्ध, डौलदार शारीरिक हालचाली आणि एकमेकांसोबतचा अप्रतिम ताळमेळ साधत चिनी तरुणींनी सादर केलेले हे नृत्य नागपुरकरांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरला.

‘चायना टुडे आर्ट्स विक’ अंतर्गत प्रथमच भारत दौऱ्यावर आलेल्या या चीनी कलावंतांनी राजधानी दिल्ली आणि त्यानंतर नागपुर येथे हे सादरीकरण केले. वेशभूषा, संगीत आणि प्रकाश योजनेचा अफलातून आविष्कार यामध्ये अनुभवायला मिळाला. यात ‘क्लासिक ग्रँड’ या नावाने रोमँटिक नृत्य आणि ‘स्वॅन  लेक’ ही  नृत्यनाटिका  होती. ‘नॅचरल मेलोडी’ नृत्य प्रकारातील रचनांनी रसिक मंत्रमुग्ध झाले होते. आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी नावाजलेल्या या नृत्यांचे दिग्दर्शन शिया शियाओ यांनी केले होते. ‘हे नृत्य बघताना जणू रिमोटच्या तालावर काही बाहुल्या रंगमंचावर नाचत असाव्या, असा भास निर्माण होत होता’, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमासाठी मुंबईतील काऊन्सेल जनरल ऑफ चायना चांग शिओन आणि त्यांच्या पत्नी ही फँग क्युई यांची प्रमुख उपस्थिती होती. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी,  डॉ. चंद्रशेखर मेश्राम, विष्णू मनोहर यांच्यासह समन्वयक किशोर जवादे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. ऑरेंजसिटी कल्चरल फाऊंडेशन व मैत्री परिवार या संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

(या बॅले नृत्याची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link