Next
सुदाम आंब्रे यांच्या विश्वंभरा कवितासंग्रहाचे प्रकाशन
BOI
Thursday, May 02, 2019 | 03:57 PM
15 0 0
Share this article:

कवी सुदाम आंब्रे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना श्रीधर लाड, प्रा. वसंत वळंजू, सुनील दबडे. शेजारी विजय पावसकर, रावसाहेब मुके, चंद्रकांत गावडे, श्रीकांत बागाव, मधुकर थूळ, शेखर नानरकर, सुरेश कुलकर्णी, प्रिया गावडे

रत्नागिरी :
‘कवी सुदाम आंब्रे यांच्याकडे प्रतिभाशक्ती आधीपासूनच होती; मात्र त्यांनी शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर ‘विश्वंभरा’ हा कवितासंग्रह प्रकाशित केला आणि सुखद धक्का दिला. प्रत्येक माणसाचे आत्मचैतन्य त्याला कवी बनवत असते. प्रत्येक माणूस कवी असतो; पण त्यासाठी आपण व्यक्त झाले पाहिजे,’ असे प्रतिपादन माजी प्राचार्य तथा कवी प्रा. वसंत वळंजू यांनी केले.

पावस येथील स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर येथे एक मे २०१९ रोजी विश्वंभरा कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. भालावली हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक व स्वरूपानंद विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी असलेले आंब्रे यांच्या या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला अध्यक्षस्थानी श्रीधर लाड व प्रमुख पाहुणे म्हणून कवी प्रा. वसंत वळंजू, कवी सुनील दबडे उपस्थित होते. व्यासपीठावर माजी प्राचार्य विजय पावसकर, माजी प्राचार्य रावसाहेब मुके, माजी शिक्षणाधिकारी चंद्रकांत गावडे, भालावलीचे माजी सरपंच श्रीकांत बागाव, शिवार आंबेरे महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर थूळ, शाळा समिती सदस्य शेखर नानरकर, स्वरूपानंद विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सुरेश कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका प्रिया गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन हरीश सामंत यांनी केले. दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर स्वागतगीत आणि मान्यवरांचे सत्कार झाले.

आंब्रे म्हणाले, ‘हा माझा पहिला कवितासंग्रह आहे. जे सुचले ते लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. यात ६५ कविता आहेत. १९८७पासून २०१५पर्यंत मी भालावली हायस्कूलचे मुख्याध्यापकपद भूषवले. विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आवड निर्माण व्हावी, गुरूंबद्दल आदर निर्माण व्हावा, महिलांचे सामाजिक स्थान सुधारावे, मानवी जीवनाकडे पाहण्याचा चांगला दृष्टिकोन वृद्धिंगत व्हावा, श्रमाचे महत्त्व वाढावे आणि वाढता भ्रष्टाचार कमी व्हावा या हेतूने कविता लिहिल्या आहेत.’
प्राचार्य सुनील दबडे म्हणाले, ‘आंब्रे यांनी आयुष्यात आलेले भलेबुरे अनुभव कवितेद्वारे मांडले आहेत. अस्सल अनुभव ही या कवितांची मौलिकता आहे. बालकांचे मनोरंजन व प्रौढांचे प्रबोधन करणाऱ्या या कविता असून, त्या स्वतःच्या आनंदासाठी लिहिल्याचे दिसून येते.’

पावसकर म्हणाले, ‘आंब्रे यांनी यमक जोडून कविता केलेल्या नाहीत, तर त्या वास्तववादी आहेत.’ गावडे यांनी सांगितले, ‘२५-३० वर्षांपासून भालावली हायस्कूलमध्ये आंब्रे मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत. विनाअनुदानित शाळा चालवताना अनेक अडचणींवर त्यांनी मात केली. शांत, मिश्किल स्वभाव व निरीक्षणशक्ती चांगली असल्याने ते कविता करू शकले.’

मुके म्हणाले, ‘स्वरूपानंद विद्यामंदिर म्हणजे भाई सामंतांची शाळा. त्यांनी आम्हा सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांना माणसाशी कसे वागावे हे शिकवले. हा शिक्षणयज्ञ आहे. त्यांची आपुलकीची भावना आम्ही अनुभवली. अजूनही शाळेत हे वातावरण चांगले टिकून आहे.’

शिक्षक आनंद शेलार यांनी पुस्तकाचे समीक्षण केले. या कवितासंग्रहातील शैक्षणिक, सामाजिक कविता, बडबडगीते यांची भाषा साधी-सोपी आहे. शिवाय गुरूंबद्दल आदर असल्याने आज चार माजी प्राचार्य कार्यक्रमाला एकत्र आले आहेत, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वामी स्वरूपानंद यांचा आशीर्वाद
‘सुदाम आंब्रे विद्यार्थीदशेत असताना डिसेंबर १९७१मध्ये स्वामी स्वरूपानंद यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पावसला आले होते. त्या वेळी स्वामींनी त्यांच्या पाठीवर थाप मारली व शाबासकी दिली. १९८१मध्ये ११वी व १२वीचे शिक्षण घेताना ते स्वामींच्या समाधिमंदिरात ध्यानगुंफेत अभ्यास करत. मुंबईत कीर्ती कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेताना आंब्रे माई आंबेडकर यांच्या घरी घरकाम करत होते. स्वरूपानंद विद्यामंदिरातील दोन विद्यार्थी ते दर वर्षी दत्तक घेतात,’ अशी माहिती हरीश सामंत यांनी दिली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search