Next
सत्यार्थी यांच्यावरील ‘द प्राइस ऑफ फ्री’ माहितीपट यू-ट्यूबवर
बालकामगारांच्या सुटकेचे प्रत्यक्ष चित्रण
प्रेस रिलीज
Friday, November 30, 2018 | 05:21 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : शांततेचा नोबेल पुरस्कारविजेते कैलाश सत्यार्थी यांच्या आयुष्याचा व कामाचा काही भाग चित्रित करणारा ‘द प्राइस ऑफ फ्री’ हा पुरस्कारविजेता माहितीपट युट्युबवर जगभर प्रदर्शित करण्यात आला आहे. ९३ मिनिटांच्या या माहितीपटामध्ये कैलाश सत्यार्थी यांची उल्लेखनीय मोहीम आणि समाजासाठी नि:स्वार्थीपणे केलेले कार्य टिपले आहे. 

यामध्ये सक्तीने मजुरी करण्यासाठी अनैतिक व्यापार करण्यात आलेल्या लहान मुलांचे दुःखी जीवन, या बालकांची सुटका करण्यासाठी कैलाश सत्यार्थी यांच्या नेतृत्वाखाली घातलेले साहसी, थरारक लाइव्ह छापे चित्रित करण्यात आले असून,    सत्यार्थी व त्यांचे सहकारी यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या व हल्ले याबद्दलही माहिती देण्यात आली आहे. 

 

याबाबत बोलताना सत्यार्थी म्हणाले, ‘हा चित्रपट म्हणजे, शेवटच्या श्वासापर्यंत बालकांच्या हक्कांसाठी निडरपणे, नि:स्वार्थीपणे झुंजणाऱ्या व स्वतःच्या जीवनाचे समर्पण करणाऱ्या धूमदास, आदर्श किशोर व काळूकुमार या माझ्या सहकाऱ्यांना आदरांजली आहे. प्रत्येकाने हा सिनेमा पाहावा आणि सर्व बालके मुक्त, निरोगी, सुरक्षित व शिक्षित असतील, असे विश्व निर्माण करण्यासाठी आमच्याबरोबर काम करावे. जगभरातील लाखो बालकांना स्वातंत्र्य हा वैश्विक, स्वाभाविक अधिकार सहजपणे प्राप्त होत नाही, ही न्यायाची केलेली थट्टा म्हणावी लागेल. म्हणूनच, या चित्रपटाच्या निमित्ताने, अत्यंत वंचित, संवेदनशील बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी पुढे यावे, यासाठी रणशिंग फुंकण्यात आले आहे.’

गेली दोन वर्षे हे सर्व वास्तववादी प्रसंग चित्रित करणारे चित्रपटाचे दिग्दर्शक डेरेक डोनीन म्हणाले, ‘कैलाश व त्यांच्या कामाविषयी वाचल्यानंतर मला धक्काच बसला. तोपर्यंत मला त्यांच्या कामाविषयी काहीच माहिती नव्हती. आम्ही त्यांच्याशी संवाद साधला व ही समस्या शक्य तितकी समजून घेण्याचा प्रयत्न केला. अनेकांना अशक्य वाटावे, असे कार्य करणाऱ्या एका व्यक्तीचा प्रवास यात चितारला आहे.’

हा माहितीपट बालकांच्या व्यापाराची कार्यपद्धती उघड करतो आणि लाखो बालके गुलामगिरी व बालकामगार या दुष्टचक्रामध्ये कशी अडकतात, ते समजून घेण्याची संधी प्रेक्षकांना देतो. तसेच, आपल्या समाजात व जगभरामध्ये बदल घडवण्यासाठी, सहभागासाठी व प्रचारासाठी साधनेही स्पष्ट करतो.


या समस्येबाबत जागृती करण्याच्या हेतूने, कैलाश सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाउंडेशनने (केएससीएफ) हा माहितीपट भारतातील पंधरा लाख शाळांमध्ये व हजारो महाविद्यालयांमध्ये दाखवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बालकांची गुलामगिरीतून मुक्तता करण्याच्या उद्देशाने छापे व सुटका कार्य करत असताना कार्यकर्त्यांना सामना करावी लागणारी आव्हाने यामध्ये अधोरेखित केली आहेत. केवळ भाषणबाजी किंवा चर्चा करण्याऐवजी, बालकांच्या हक्कांच्या संरक्षणाविषयी जागृती करत काही कठीण प्रश्न यातून सर्वांसमोर मांडण्यात आले आहेत. हा  माहितीपट  म्हणजे, हजारो लोकांच्या आणि ट्रॅफिकर्सकडून धमक्या येऊनही व हल्ले होऊनही कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या चिकाटीची, संयमाची व धैर्याची यशोगाथा आहे.

‘अनेक हल्ले व गुंडगिरीचे प्रकार होऊनही आम्ही प्रत्येक बालकाची सुटका करण्याचा प्रयत्न सोडला नाही की अहिंसेबाबत कधी तडजोड केली नाही. हा माहितीपट अनुकंपा, आशा व साहस यांना चालना देते, तसेच बालकामगारमुक्त उत्पादन व पुरवठा करण्याचे आवाहन करते. बालकांच्या बाबतीत तत्परता दाखवण्यासाठीही हा माहितीपट कायदेकर्त्यांना व अंमलबजावणी यंत्रणांना प्रोत्साहन देतो’, असे सत्यार्थी यांनी सांगितले.

‘द प्राइस ऑफ फ्री’चा पहिला ट्रेलर पार्टिसिपंट मीडिया, कॉन्कॉर्डिआ स्टुडिओ आणि युट्युब यांनी सात नोव्हेंबर रोजी प्रदर्शित केला. ‘संडेन्स २०१८’ चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेल्या या  माहितीपटाला यूएस डॉक्युमेंटरी ग्रँड ज्युरी प्राइझ मिळाले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search