Next
रत्नागिरीत रंगणार ‘दीपावली पूर्वसाज’ मैफल
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजन
BOI
Tuesday, October 30, 2018 | 11:32 AM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कै. यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमीतर्फे पुण्यातील संदीप रानडे यांच्या ‘दिवाळी पूर्वसाज २०१८’ ही शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि भक्तीगीतांच्या सुश्राव्य गायनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे. ही मैफल दोन नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात होईल.  

रानडे हे मेवाती घराण्याचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आहेत. त्यांनी पद्मविभूषण संगीतमार्तंड पंडित जसराज, डॉ. शोभा अभ्यंकर आणि अंजली जोगळेकर-पोंक्षे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग केले असून, अमेरिकेतील जॉन्स हॉपकीन्स युनिव्हर्सिटीमधून काँप्युटर सायन्स विभागात मास्टर्स डिग्री प्राप्त केली आहे. अमेरिकेत असताना ते गुगल, व्हीएमवेअर, मायक्रोसॉफ्ट अशा वेगवेगळ्या प्रथितयश कंपन्यामधे कार्यरत होते.

संगीतशास्त्रातील सौंदर्य, बारकावे आणि गणितीशास्त्रातील सिद्धांत यांच्या अनोख्या मिलाफाची प्रचिती रानडे यांच्या गाण्यातून येते. ‘नादरंग’ या टोपणनावाने त्यांनी वेगवेगळ्या रागांवर, स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांवर आधारित अशा जवळजवळ ७० रचना केल्या आहेत. त्यामधे विविध बंदिशी, तराणे, चतरंग, त्रिवट, गीत, रागमाला, अभंग, भावगीते, निर्गुणी भजन यांचा समावेश आहे. पारंपरिक, तसेच नाविन्यपूर्ण आधुनिक संगीताचा सुरेख संगम रानडे यांच्या रचनांमधून झळकतो.

अनेक वर्ष साधना आणि सखोल अभ्यास करून त्यांनी रियाजाची एक नावीन्यपूर्ण पद्धत विकसित केली आहे. त्यानुसार दहा तासांचा रियाज एका तासामधे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण करता येतो. या आविष्काराचे नाव ‘नादयोग’ असून, भारत, अमेरिका, कॅनडा, युरोप, ऑस्ट्रेलिया अशा विविध ठिकाणी रानडे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन शिकवतात; तसेच ‘नादयोगा’च्या कार्यशाळाही घेतात. शास्त्रीय संगीताच्या साधकांसाठी त्यांनी ‘नादसाधना’ हे अॅप तयार केले आहे. रोजचा रियाज अॅप वापरून केल्याने स्वरस्थाने पक्की व अचूक होण्यास मदत होईल.

‘रत्नागिरीतील समस्त संगीत रसिकांनी या मैफलीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,’ असे आवाहन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, सचिव सतीश शेवडे आणि पटवर्धन संगीत अकादमीच्या अध्यक्ष डॉ. कल्पना मेहता यांनी केले आहे.  

मैफलीविषयी :
दिवस :
दोन नोव्हेंबर २०१८
वेळ : सायंकाळी सहा वाजता
स्थळ : राधाबाई शेट्ये सभागृह, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search