Next
अनंत सामंत, फ. मुं. शिंदे, रॉबर्ट साउदी
BOI
Saturday, August 12 | 04:00 AM
15 0 0
Share this story

‘एमटी आयवा मारू’ने रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर गेलेले अनंत सामंत,  ‘आई एक नाव असतं...’सारखी मनाचा ठाव घेणारी कविता लिहिणारे फ. मुं. शिंदे हे मराठी आणि रॉबर्ट साउदी या इंग्लिश साहित्यिकाचा १२ ऑगस्ट हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
..........

अनंत सामंत
१२ ऑगस्ट १९५२ रोजी अर्नाळा इथे जन्मलेल्या अनंत सामंत यांनी जे जीवनानुभव आपल्या साहित्यातून मांडले, ते सर्वसामान्य मराठी वाचकाने त्याआधी कधीही वाचलेले, ऐकलेले किंवा पाहिलेले नसल्याने त्यांची भुरळ न पडती तरच नवल!

एम टी आयवा मारू’ या त्यांच्या पहिल्याच कादंबरीने मराठी वाचकांना समुद्र, जहाज, खलाश्यांचं जग, जहाजाची स्वतःची स्पंदनं, मानवी स्वभावाचे कंगोरे यांची सफर घडवली आणि तीही एका विलक्षण ओघवत्या बिनधास्त शैलीत! ही कादंबरी अल्पावधीतच बेस्टसेलर ठरली आणि आजही अनेक पिढ्यांवर तिची मोहिनी कायम आहे.
 
हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून त्यानंतर जहाजावर नोकरी करणारे सामंत यांचा तसा लेखनाशी त्याआधी संबंध आला नव्हता; पण आपल्या समुद्री सफरींवर आधारित लेख त्यांनी मित्रांना पत्रातून लिहिले आणि पुढे त्यातूनच ते पुस्तक जन्माला आलं आणि एक साहित्यिक त्या निमित्तानं आपल्यासमोर आला. स्वामी विवेकानंद आणि संत ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर पगडा आहे.

एम टी आयवा मारू, अविरत, के फाईव्ह, एका शहराचं शूटिंग, अश्वत्थ, लांडगा, लिलियनची बखर, बायपासचे दिवस, मितवा, दृष्टी, त्रिमाकासी मादाम, ओश्तोरीज, किबुत्झमधला डॅनी इथे आला होता!, ऑक्टोबर एंड – अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
...........................

फकीर मुंजाजी शिंदे

१२ ऑगस्ट १९४८ रोजी हिंगोलीमध्ये जन्मलेले शिंदे हे अवघ्या मराठी जनांना परिचित आहेत ते कवी आणि मराठीचे प्राध्यापक म्हणून! एकीकडे मजेशीर वात्रटिका आणि विडंबनपर कविता करणारे ‘फमुं’ त्याच वेळी ‘आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं’सारखी मनाचा ठाव घेणारी कविताही लिहित असतात.

८७व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असणाऱ्या फ. मुं. शिंदे यांनी मराठवाडा साहित्य संमेलन, गुणीजन साहित्य संमेलन, अस्मितादर्श साहित्य संमेलन, शब्दगंध साहित्य संमेलन अशा जवळपास २१ विविध साहित्य संमेलनांचं अध्यक्षपद भूषवलं आहे.

त्यांना कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, काकासाहेब गाडगीळ साहित्य पुरस्कार, भा. रा. तांबे पुरस्कार असे जवळपास १४ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

कबंध, गणगौळण, गाथा, जुलूस, पाठभेद, प्रार्थना, फकिराचे अभंग, मिथक, लोकगाणी, अवशेष, आई आणि इतर कविता, आदिम, आयुष्य वेचताना, निरंतर, मेणा, स्वान्त, कालमान, सूत्र आणि संवाद - अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
.........................

रॉबर्ट साउदी
१२ ऑगस्ट १७७४ रोजी ब्रिस्टलमध्ये जन्मलेला रॉबर्ट साउदी हा इंग्लंडचा १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातला महत्त्वाचा कवी आणि लेखक.

विल्यम वर्डस्वर्थ आणि सॅम्युएल टेलर कोलरीज यांसारख्या विख्यात कवींचा हा समकालीन आणि मित्रसुद्धा! त्यांच्याच बरोबरीने त्या काळच्या गाजलेल्या रोमँटिक मूव्हमेंटमध्ये साउदीचंही नाव घेतलं जातं.

दी डॉक्टर, लाइफ ऑफ नेल्सन, लाईफ ऑफ वेस्ली, लेटर्स फ्रॉम इंग्लंड, अशी त्याची पुस्तकं गाजली होती.

२१ मार्च १८४३ रोजी त्याचा केस्विकमध्ये मृत्यू झाला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link