Next
‘महाराणा प्रतापसिंह कलादालनामुळे वैभववाडीच्या वैभवात भर’
पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन
BOI
Tuesday, January 08, 2019 | 12:08 PM
15 0 0
Share this article:

वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह कलादालन व सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन करताना पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, मेवाडचे युवराज लक्ष्यराज कुंवर आदी

सिंधुदुर्ग : ‘महाराणा प्रतापसिंह कलादालन व सांस्कृतिक केंद्राच्या उभारणीमुळे वैभववाडीच्या वैभवात भर पडली आहे,’ असे प्रतिपादन पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी केले. वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह कलादालन व सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन नुकतेच त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 


या वेळी मेवाडचे युवराज लक्ष्यराज कुंवर, कोल्हापूरचे युवराज खासदार संभाजी छत्रपती, खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, रावराणे मंडळाचे अध्यक्ष गणपत रावराणे, उपाध्यक्ष सदानंद रावराणे, वैभववाडीच्या नगराध्यक्ष गजयेबार, तहसीलदार संतोष जाधव आदी उपस्थित होते.

‘देशाच्या इतिहासामध्ये अनेक शूरवीर होऊन गेले;पण त्यातील लक्षात राहण्यासारखे कार्य छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांनी केले. भविष्यात यशस्वी होण्यासाठी इतिहासाची आठवण असणे गरजेचे आहे. या कलादालनाने महाराष्ट्र व राजस्थानच्या इतिहासावर प्रकाश टाकण्याचे; तसेच मराठा व राजपूत यांची सांगड घालण्याचे कार्य केले आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही हे कलादालन महत्वाचे आहे. पर्यटनास इतिहासाची जोड दिल्यास त्याचा फायदा पर्यटकांना होतो. पुढील पिढीला आपला इतिहास माहिती व्हावा या उद्देशाने उभारण्यात आलेल्या स्मारकाचा लाभ पर्यटकांनी घ्यावा. या निमित्ताने मेवाड व कोल्हापूरच्या युवराजांना एकत्र आणण्याचा एक नवा इतिहास रचला गेला आहे,’ असे रावल यांनी नमूद केले.


आमदार राणे म्हणाले, ‘पर्यटनाच्या माध्यमातून इतिहासाचे जतन करणे व आपला इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या स्मारकाचा उद्देश आहे.’

संभाजी छत्रपती म्हणाले, ‘या स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने मेवाडच्या घराण्याशी संबंधीत सर्व वंशजांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. हा इतिहासातील एक सुवर्ण क्षण आहे.’

नारायण राणे म्हणाले, ‘आजचा काळ तलवारीने लढण्याचा नसून, बुद्धीमत्ता व तंत्रज्ञानाच्या बळावर देशाचा विकास साधण्याचा आहे. आपण समाज, देश व धर्मासाठी काय करु शकतो याचा प्रत्येकाने विचार करण्याचा काळ आहे. देशाच्या विकासामध्ये आपण दिलेले योगदान हे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या कार्याचाच एक भाग असेल.’  सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळ लवकरात लवकर पूर्ण करावे; तसेच देशातील पहिले सी वर्ल्ड सिंधुदुर्गात सुरू करावे अशी विनंती त्यांनी रावल यांना केली. 

मेवाडचे युवराज लक्ष्यराज कुंवर
‘विमानतळ व दोन पंचतारांकीत हॉटेल्स लवकरच सुरू करण्यात येतील आणि सी वर्ल्डबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल,’ असे रावल यांनी सांगितले.

संतोष सावंत यांनी प्रास्ताविक केले, तर रावराणे मंडळातर्फे मान्यवरांचे स्वागत व नगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search