Next
‘जैवशास्त्र आणि अभियांत्रिकी परस्परावलंबी’
डॉ. महेश सिंदीकर यांचे मत; मराठी विज्ञान परिषदेतर्फे व्याख्यान
BOI
Thursday, June 20, 2019 | 02:14 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘परदेशात अभियांत्रिकीमध्ये जीवशास्त्राचा समावेश आहे आणि तो विषय विद्यार्थांसाठी अनिवार्य आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपल्या अभ्यासक्रमात हा विषय समाविष्ट केला आहे. आताच्या सुधारित अभ्यासक्रमात जीवशास्त्राचा आणि अभियांत्रिकीचा अंतर्भाव दिसून येतो. अभियांत्रिकीत जीवशास्त्राची आणि जीवशास्त्रात अभियांत्रिकीची आवश्यकता भासते. कारण हे दोन्ही विषय एकमेकांवर अवलंबून आहेत,’ असे मत डॉ. महेश सिंदीकर यांनी व्यक्त केले. 

मराठी विज्ञान परिषदेचा पुणे विभाग व इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अभियांत्रिकीसाठी जैवविज्ञानाची आवश्यकता’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. सिंदीकर बोलत होते. या वेळी विज्ञान परिषदेचे विनय र. र., इन्स्टिट्यूटचे राजेंद्रकुमार सराफ आदी उपस्थित होते.

डॉ. सिंदीकर म्हणाले, ‘जैवशास्त्र आणि अभियांत्रिकीचा संगम केला, तर आपल्याला आठ विविध नवीन विषय यामध्ये अभ्यासायला मिळतात. यात जैव-अभियांत्रिकी, जैव-स्थापत्य अभियांत्रिकी, जैव-धातुविज्ञान, पेशी-संवाद, जैव-विद्युत अभियांत्रिकी, जैव-यंत्र अभियांत्रिकी, जैव-उपकरण अभियांत्रिकी, जैव-माहितीशास्त्र यांचा समावेश आहे. जैवअभियांत्रिकीचा उगम पाहिल्यास आपल्या स्वयंपाक घरातून झालेला दिसतो.’

‘दैनंदिन जीवनातील जीवशास्त्रातले घटक पाहून आपण अभियांत्रिकीमध्ये त्या प्रकाराच्या वस्तू निर्माण केल्या आहेत. रोबो झुरळ हे त्याच एक उत्तम उदाहरण आहे. भूकंप झालेल्या ठिकाणी लोकांची शोध मोहिमेसाठी मनुष्य जाणे शक्य नाही; मात्र अशा ठिकाणी जाणारा एकमेव प्राणी म्हणजे झुरळ. हे लक्षात घेत रोबो झुरळ याची निर्मिती करण्यात आली. व्यक्तीच्या श्वासोच्छवासाने हा रोबो झुरळ अशा अडकलेल्या माणसांची माहिती पुरवतो. हा रोबो झुरळ बनवण्यासाठी जिवंत झुरळांचा अभ्यास करणे खूपच गरजेचे होते. अशाच पद्धतीचा प्रयोग कृत्रिम हृदय, पाय, हात अशा गोष्टी बनवण्यात अभियांत्रिकीमध्ये यश आले आहे. या कृत्रिम गोष्टी बनवताना त्या त्या जिवंत घटकाचा अभ्यास करणे त्यांचे हालचाल अभ्यासणे खूप गरजेचे आहे,’ असे डॉ. सिंदीकर यांनी नमूद केले. 

राजेंद्रकुमार सराफ यांनी प्रास्ताविक केले. विनय आर. आर. यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search