Next
‘रुबी’मध्ये ‘लव्ह युअर लिम्ब्ज’ अभियानाला सुरुवात
प्रेस रिलीज
Friday, March 22, 2019 | 03:24 PM
15 0 0
Share this article:

पुणे : पाय गमावले जाण्याच्या वाढत्या समस्येवर उपाय म्हणून रुबी हॉल क्लिनिकमध्ये ‘लव्ह युअर लिम्ब्ज’ या अभियानाला सुरुवात करण्यात आली. पाय गमावले जाण्याची समस्या व पाय वाचवण्यासाठी उपयुक्त ठरणारे उपचार यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, दर वर्षी १० लाखांहून अधिक अॅम्प्युटेशन्स करावी लागतात. यातील ७० टक्के अॅम्प्युटेशन्स मधुमेहाशी निगडित असतात. या शिवाय अन्य स्रोतांतून आलेल्या आकडेवारीनुसार गुडघ्याखाली अवयवांचे अॅम्प्युटेशन सर्वाधिक प्रमाणात करावे लागते. यापैकी ७१ टक्के अॅम्प्युटेशन्स रक्तवाहिन्यांत निर्माण होणाऱ्या दोषांमुळे होतात. त्याला डायव्हस्क्युलर अॅम्‍प्‍युटेशन म्हणतात. एका अहवालानुसार, दर वर्षी एक लाख ८५ हजार लोक अॅम्प्युटेशन डायबेटीसने ग्रस्‍त असतात. याचा अर्थ दररोज सुमारे ३०० ते ५०० अॅम्प्युटेशन्स केली जातात.

हे सर्व लक्षात घेता, या अभियानाच्या प्रारंभावेळी उपस्थिती असलेल्या आघाडीच्या डॉक्टरांनी पेरिफरल आर्टरी डिसीजवर (डीसीबी) उपचार करण्यासाठी ड्रग-कोटेड बलून (डीसीबी) तंत्राचा स्वीकार करण्याच्या गरजेवर भर दिला. या मुळे अॅम्प्युटेशन्स टाळली जाऊन रुग्णांचे पाय वाचू शकतात. जर्मनीतील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल लॅपजिकमधील वरिष्ठ फिजिशिअन डॉ. स्वेन ब्राउनलिश हे या चर्चेचे प्रमुख होते. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील व्हस्क्युलर अॅंड एंडोव्हस्क्युलर सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. धनेश कामेरकर यांनीही अन्य काही डॉक्टरांसमवेत या चर्चेत भाग घेतला.

‘पीएडी’ म्हणजेच जवळपासच्या (पेरिफेरल) रक्तवाहिन्या अरुंद होत जाणे. यामुळे पाय, जठर, हात आणि डोक्याकडील रक्तप्रवाह कमी होत जातो. रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते आणि या समस्येवर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये उपचार झाले नाहीत, तर परिणामी शस्त्रक्रियेद्वारे पाय काढून टाकावे लागतात. म्हणजेच अॅम्प्युटेशन करावे लागते. म्हणूनच या स्थितीवरील उपचारांमध्ये परिणामकारक ठरलेल्या ड्रग-कोटेड बलून ‘बिलो दी नी’ शस्त्रक्रियांची शिफारस डॉक्टर्स करतात.

जर्मनी येथील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल लॅपजिकमधील इंटरव्हेन्शनल अँजियोलॉजी विभागातील वरिष्ठ फिजिशिअन डॉ. स्वेन ब्राउनलिश म्हणाले, ‘पेरिफेरल आर्टरी डिसीजचे सर्वाधिक आढळणारे स्वरूप म्हणजे डायबेटिक फूट. अनियंत्रित मधुमेह आणि कमी झालेल्या रक्तप्रवाहामुळे रुग्णांच्या पायात किंवा पावलात अल्सर किंवा जखम होते. यावर उपचार झाले नाहीत, तर याची परिणती पाय काढून टाकण्यात होऊ शकते. म्हणूनच ड्रग-कोटेड बलून तंत्राचा वापर ही आता काळाची गरज होऊन बसली आहे.’

‘या इंटरव्हेन्शनल (हस्तक्षेपात्मक) तंत्रज्ञानाचा वापर करून रक्तवाहिन्यांचे असामान्य आक्रसणे टाळता येते, पेशींचे विभाजन बंद होते आणि उपचारानंतर अडथळे पुन्हा निर्माण होण्याचा धोका कमी करता येतो. एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून मी असे रुग्ण सातत्याने तपासतो आणि वापरण्यास अत्यंत सोपे असल्याने या तंत्राला पसंती देतो,’ असे डॉ. ब्राउनलिश यांनी सांगितले.

पीएडी हा आजार मधुमेहाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो आणि या रुग्णांना चालताना प्रचंड वेदना होतात. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील व्हस्क्युलर अॅंड एंडोव्हस्क्युलर सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. धनेश कामेरकर म्हणाले, ‘भारतात मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे आणि डायबेटिक फूटने ग्रासलेल्या रुग्णांच्या आकड्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. ड्रग-कोटेड बलून तंत्र भारतात आणणे म्हणूनच स्वागतार्ह आहे आणि रुग्णांवरील उपचारांमध्ये या तंत्राचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. लोकांना त्यांचे पाय वाचवण्यासाठी योग्य व वेळीच उपचार करण्याच्या गरजेबद्दल शिक्षित करण्याच्या दृष्टीने ‘लव्ह युअर लिम्ब्स’ अभियानासारखे उपक्रम खूपच महत्त्वाचे आहेत.’

रुबी हॉल क्लिनिकच्‍या टो अँड फ्लो क्लिनिकमध्ये व्हस्क्युलर सर्जन्स, मधुमेहतज्ज्ञ, ऑर्थोपीडिक व प्रोस्थेटिस्ट्स तज्ज्ञ आदी खास तज्ज्ञांचा समावेश असलेले पथक काम करत आहे. या मुळे डायबेटिक फूट असलेल्या मधुमेहाच्या रुग्णाला व्यक्तिगत स्वरूपाची व संपूर्ण सेवा मिळू शकेल.

ड्रग-कोटेड बलून (डीसीबी) तंत्रामध्ये टोकावर एक छोटासा फुगा असलेले उपकरण रक्तवाहिनीद्वारे पायात घातले जाते आणि रक्तवाहिनीचा आक्रसलेला भाग येईपर्यंत ते उपकरण पुढे जात राहते. आक्रसलेल्या भागात फुगा पोहोचला की तो बाहेरून फुगवला जातो आणि हा फुगा फुगल्यामुळे रक्तवाहिनीच्या भित्तिकांवर जमलेला थर (प्लाक) सपाट होतो. अशा रितीने रक्तवाहिनी पुन्हा खुली होते आणि रक्तप्रवाह पूर्ववत होते. मग त्या फुग्यातील हवा काढून टाकून तो पुन्हा शरीरातून बाहेर काढला जातो. एकदा ही प्रक्रिया पार पडली की, प्रजननविरोधी औषधांचे आवरण असलेला एक नवीन फुगा त्याच रक्तवाहिनीद्वारे पायात सोडला जातो आणि तो यापूर्वी उपचार केलेल्या अरुंद भागापर्यंत नेला जातो. आता फुगा फुगवला जातो आणि फुग्यावरील औषध रक्तवाहिनी तसेच आसपासच्या उतींमध्ये सोडले जाते. ठराविक काळानंतर फुग्यातील हवा सोडली जाते आणि तो शरीरातून बाहेर काढला जातो.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search