Next
‘वृक्षारोपण मोहिमेत जनतेचा सहभाग वाढवावा’
वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्या संबधितांना सूचना
प्रशांत सिनकर
Saturday, December 29, 2018 | 10:32 AM
15 1 0
Share this story

ठाणे : ‘यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या दोन, चार आणि १३ कोटी वृक्षारोपण मोहिमेतील किती झाडे जिवंत आहेत याविषयीची माहिती ३१ जानेवारी २०१९ पर्यंत सर्व विभागांनी वन विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी; तसेच २०१९मध्ये ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्यादृष्टीने जनतेचा सहभाग कसा वाढवता येईल याचे नियोजन करावे,’ अशा सूचना वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी दिल्या आहेत.

येथील नियोजन भवनाच्या सभागृहात कोकण विभागाच्या वृक्ष लागवडीचे नियोजन आणि तयारीचा आढावा खारगे यांनी नुकताच घेतला. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, सर्व जिल्हाधिकारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल) उमेश अग्रवाल, वन विभागाचे अधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यादृष्टीने लोकशिक्षण व प्रबोधन होणे गरजेचे असण्यावरही आहे खारगे यांनी भर दिला.

३३ कोटी वृक्ष लागवडीसाठी भूमी बँक तयार करणे, मार्च २०१९पर्यंत रोपांसाठी खत, माती भरून खड्डे तयार करणे, नद्यांच्या  किनाऱ्यांपासून एक किमी अंतरावर वन, शासकीय, खासगी जमिनींवर वृक्षारोपण करणे, खासगी क्षेत्रावर फळ, बांबू लागवडीस प्रोत्साहन देणे, सामाजिक वृक्ष लागवडीचा सहभाग मोठा असावा यासाठी विविध संस्था, उद्योग, व्यावसायिक यांच्याशी करार करून त्यांना सहभागी करून घेण्याच्या सूचना खारगे यांनी या बैठकीत दिल्या आहेत.

‘रानमळा धर्तीवर वृक्ष लागवड, कन्या वन समृद्धी योजना, भाऊसाहेब फुंडकर फळझाड योजना, नरेगा अशा विविध योजनेतील वृक्ष लागवडीस गती द्यावी, कृषी विभागानेदेखील शेतकऱ्यांना फळझाड लागवडीसाठी उत्तेजन द्यावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

‘एक कोटी व्यक्तींची हरित सेना उभारण्यात येत असून, त्यासाठीही २८ फेब्रुवारी २०१९पर्यंत जास्तीत जास्त नोंदणी करावी. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली पालिकांनी त्यांच्या पाणीपुरवठा स्थळांवर त्रिपक्षीय करार करून मोठ्या प्रमाणावर रोपे लावावीत; तसेच कांदळवन लागवडही त्या त्या क्षेत्रात होणे आवश्यक आहे,’ असे खारगे यांनी नमूद केले.
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link