Next
ये जिंदगी उसी की है...
BOI
Sunday, January 07 | 06:45 AM
15 0 0
Share this story

सी. रामचंद्रहिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकारांपैकी एक असलेले सी. रामचंद्र यांची जन्मशताब्दी येत्या १२ जानेवारी रोजी आहे. तसेच पाच जानेवारी हा त्यांचा स्मृतिदिनही नुकताच होऊन गेला आहे. त्या निमित्ताने, ‘ये जिंदगी उसी की है...’ या त्यांनी संगीत दिलेल्या गीताचा आस्वाद घेऊ या... ‘सुनहरे गीत’ या सदरात... 
...........
नमस्कार रसिकहो! तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा! ‘कहीं दूर जब दिन ढल जाए....’ या गाण्याचे स्वर ऐकत, २०१७च्या आठवणी आठवत तुम्ही त्या वर्षाला निरोप दिला असेल. नवीन आशा, आकांक्षा, नवीन संकल्प घेऊन नवीन वर्षाला सामोरे गेला असाल आणि म्हणता म्हणता या नवीन वर्षातले पाच-सहा दिवस संपलेसुद्धा! या नवीन वर्षातील पहिल्या रविवारी आणखी एक ‘सुनहरे गीत’ घेऊन मी तुमच्यापुढे आलो आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकारांपैकी एक नाव म्हणजे सी. रामचंद्र ऊर्फ अण्णा चितळकर! १२ जानेवारी १९१८ हा त्यांचा जन्मदिनांक आणि पाच जानेवारी १९८२ ही त्यांच्या निधनाची तारीख! या वर्षी त्यांच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने हा थोर संगीतकार व गायकाच्या कारकीर्दीकडे एक धावता दृष्टिक्षेप टाकू या.

अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबे गावी रामचंद्र नरहरी चितळकर अर्थात सी. रामचंद्र यांच्या जन्म झाला. त्यांच्या वडिलांनी म्हटलेली गाणी, नाट्यपदे बालपणापासून त्यांच्या कानावर येत होती. वडिलांमुळेच सी. रामचंद्र यांना गाण्याची, संगीताची गोडी लागली. शालेय जीवनात तर त्यांनी इंग्रजी शब्दांची स्पेलिंग पाठ करण्यासाठी त्यांनाही चाल लावली होती. नागपूरमध्ये श्रीराम संगीत विद्यालयात त्यांनी सप्रे मास्तरांकडे संगीताचे शिक्षण घेतले. नंतर पुण्यात आल्यावर पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्या गंधर्व विद्यालयातही गायनाचे, संगीताचे धडे गिरवले. नंतर सोलापूर, कोल्हापूर करत त्यांनी मुंबईच्या मायानगरीत प्रवेश केला. मिनर्व्हा चित्रसंस्थेत ते दाखल झाले. मराठी चित्रपटसृष्टीतही त्यांनी कालांतराने प्रवेश केला. 

१९४२मध्ये प्रदर्शित झालेला ‘सुखी जीवन’ हा सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट! या चित्रपटाला त्यांनी ‘राम चितळकर’ या नावाने संगीत दिले होते. १९४३मध्येही त्यांनी याच नावाने एकूण पाच चित्रपटांना संगीत दिले. १९४४पासून मात्र त्यांनी ‘सी. रामचंद्र’ या नावानेच संगीत देण्यास सुरुवात केली; मात्र गायक म्हणून गाणे गाताना ते ‘चितळकर’ एवढेच नाव लावत असत. मा. भगवान यांच्याशी त्यांची पहिल्यापासून मैत्री होती ते सी. रामचंद्र यांना प्रेमाने ‘अण्णा’ म्हणत असत व कालांतराने अनेक चित्रपट कलावंत त्यांना ‘अण्णा’ या नावानेच संबोधत असत.

सी. रामचंद्र यांनी संगीत दिलेला ‘आझाद’ हा चित्रपट एका वेगळ्या कारणाने प्रसिद्ध आहे. या चित्रातील एकापेक्षा एक अशी नऊ सुमधुर गीते अण्णांनी फक्त एका आठवड्यात संगीतबद्ध करून करून दिली होती. सी. रामचंद्र यांच्या संगीताच्या अशा अनेक सुरस कथा आहेत. त्यांच्या संगीताने नटलेल्या अलबेला, यास्मिन, निराला, नौ-शेरवाँ-ए-दिल, नास्तिक, शारदा, अमरदीप, इन्सानियत अशा अनेक चित्रपटांची नावे सांगता येतील. चित्रपट संगीताव्यतिरिक्त अण्णांची आणखी एक महत्वाची ओळख म्हणजे ‘ए मेरे वतन के लोगों...’ या सुप्रसिद्ध देशभक्तिपर गीताची मधुर चाल सी. रामचंद्र यांनीच तयार केली होती.

‘ओ बेटाजी...’ (अलबेला), ‘मैं हूँ एक खलासी....’ (उस्ताद पेड्रो), ‘कितना हँसी है मौसम....’ (आझाद), ‘दाने दाने पे लिखा....’ (बारीश) अशी काही स्वतः संगीत दिलेली गाणी अण्णांनी गायली होती. एस. डी. बर्मन, रोशन, उषा खन्ना या संगीतकारांनीही आपण संगीत दिलेली काही गाणी अण्णांकडून गाऊन घेतली होती.

‘माझ्या जीवनाची सरगम’ हे त्यांचे आत्मचरित्र खूपच गाजले होते. त्यामध्ये कवी सी. रामचंद्र यांचे दर्शनही आपल्याला घडते. घरकुल, संत निवृत्ती ज्ञानदेव, चूलमूल, छत्रपती शिवाजी, धर्मपत्नी, धनंजय अशा काही मराठी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते.

अशा या अफाट कर्तृत्वाच्या कलावंताच्या संगीतकलेतील एक सुनहरे गीत आज पाहू या. १९५३चा फिल्मिस्तान चित्रसंस्थेचा ‘अनारकली’ चित्रपट. काव्य राजेंद्रकृष्ण यांचे, स्वर लता मंगेशकर यांचा आणि पडद्यावर अभिनेत्री बीना रॉय! प्रीती-प्रेमी-प्रेमिका त्यांचे जीवन याबद्दल राजेंद्रकृष्ण काय लिहितात? ते म्हणतात -

प्यार ही में खो गया, ये ज़िंदगी... 

जी व्यक्ती प्रेम केल्यामुळे सर्वस्वाने कोणाची तरी झाली आहे आणि प्रेमात इतकी तन्मय झाली आहे, की जणू स्वतःला हरवून बसली आहे. तिचे जीवन तिचे राहत नाही. ते ‘त्याचे/तिचे’ होऊन जाते (ज्याच्यावर ती प्रेम करते). अशी ही व्यक्ती चहूबाजूंना प्रीतीचेच वातावरण आहे असे का म्हणणार नाही. कारण तिला सर्वत्र प्रेमच दिसत असते. म्हणून ती म्हणते – 

ये बहार, ये समा, कह रहा है प्यार कर
किसी की आरज़ू में अपने दिल को बेक़रार कर
ज़िंदगी है बेवफ़ा...
ज़िंदगी है बेवफ़ा, लूट प्यार का मज़ा
ये ज़िंदगी... 

हा वसंत ऋतू (बहार) हा समय (आम्हा प्रेमिकांना) सांगत आहे, ‘प्रेम करा!’ मन:पूर्वक प्रेम करा! कोणाच्या तरी (अर्थात आपल्या प्रेमिकेच्या/प्रियकराच्या) अभिलाषेने तुमचे स्वतःचे हृदय अस्वस्थ होऊ दे, बेचैन होऊ दे! हे जीवन बेभरवशी आहे. (म्हणूनच ते आहे तोपर्यंत) प्रेमाची मजा लुटून घ्या! 

धड़क रहा है दिल तो क्या, दिल की धड़कनें ना सुन
फिर कहां ये फ़ुर्सतें, फिर कहाँ ये रात-दिन
आ रही है ये सदा...
आ रही है ये सदा, मस्तियों में झूम जा
ये ज़िंदगी ... 

(या प्रीतीने) हृदयाची स्पंदने वाढली म्हणून काय झाले? ती तू मोजत बसू नकोस! (व त्यामध्ये वेळ वाया घालवू नकोस) पुन्हा असे फुरसतीचे (प्रेमाचे) क्षण कोठे मिळणार आहेत? आणि प्रेमाने रंगलेल्या रात्री व दिवस पुन्हा कधी मिळणार? (म्हणूनच) तो बघ, एक आवाज येऊन सांगत आहे, की , प्रेमाच्या उन्मादात बुडून जा! 
इथपर्यंतचे हे सुखद प्रेमगीत आपण चित्रपटाच्या एका भागात बघतो आणि या गीताचा दुसरा भाग सुरू होतो तो अखेरीस! प्रेमातील विरहाच्या अवस्थेतील ताटातुटीच्या प्रसंगातील भावना मांडताना राजेंद्रकृष्ण लिहितात -

दो दिल यहाँ न मिल सके, मिलेंगे उस जहान में
खिलेंगे हसरतों के फूल, मौत के आस्मान में
ये ज़िंदगी चली गई जो प्यार में तो क्या हुआ
ये ज़िंदगी ... 
सुना रही है दास्तां, शमा मेरे मज़ार की
फ़िज़ा में भी खिली रही, ये कली अनार की
इसे मज़ार मत कहो, ये महल है प्यार का
ये ज़िंदगी ...

(आम्हा प्रेमिकांची) अंत:करणे या (निष्ठुर) जगात एकमेकांशी मिळू शकली नाहीत (आमचे व त्यांचे मीलन झाले नाही; पण ...) तरीही आमच्या या (अपुऱ्या) आकांक्षांची/इच्छांची फुले आकाशात फुलतील (आमचे एक प्रकारे मीलन तेथे होईल.) माझ्या थडग्यावरील (मजार) ही दीपकळी (शमा) हीच कहाणी कथन करील, की प्रतिकूल वातावरणात उजाड माळावर ही अनारकली प्रफुल्लितच राहिली. तिच्या या थडग्याला थडगे म्हणू नका, हे प्रीतीचे राजमंदिर आहे. 
अनारकलीला भिंतीत चिणून टाकण्याचा अकबराचा आदेश अमलात येत असताना, भिंतीची एक एक वीट रचली जात असताना या गीताचा हा दुसरा भाग सुरू होतो आणि अखेरच्या टप्प्यावर -

ऐ ज़िंदगी की शाम आ, तुझे गले लगाऊं मैं
तुझी में डूब जाऊं मैं
जहाँ को भूल जाऊं मैं
बस एक नज़र मेरे सनम, अल्विदा, अल्विदा
अल्विदा... अल्विदा...
अल्विदा... अल्विदा...

हे जीवनाच्या तिन्हीसांजे, ये, आता मी तुझ्याच गळ्यात पडते, तुझ्यातच बुडून जाते. (या रुक्ष अन्यायी) जगताला मी विसरून जाते. बस - माझ्या प्रियकरा, प्रीतीने भरलेला फक्त एक कटाक्ष तू माझ्याकडे टाक! येते मी आता, माझा हा अखेरचा निरोप (अलविदा)

स्वरसम्राज्ञीचा मधुर स्वर, प्रभावी शब्दरचना आणि सी. रामचंद्र यांचे श्रवणीय संगीत, चाल, वाद्यमेळ! लोकप्रिय गाण्यात पहिला क्रमांक मिळवणारे हे सुनहरे गीत!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

(दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
संग्राम About
सी रामचंद्र यांची गाणी खूप छान आहेत! वाचून मस्त वाटले! अशा लेखात संगीतकाराने वापरलेली वाद्ये, त्या वापरण्या मागचे प्रयोजन, त्याच्या मागचे किस्से, orchestration, symphony वगैरे आले तर अजून मजा येईल!
0
0

Select Language
Share Link