Next
‘आरोग्य, रस्ते विकासाला सरकारचे प्राधान्य’
BOI
Thursday, August 16, 2018 | 12:48 PM
15 0 0
Share this article:

सोलापूर‍ : जिल्ह्यातील आरोग्य, रस्ते यांच्या विकासाला राज्य सरकारचे प्राधान्य असून, या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विजय देशमुख यांनी १५ ऑगस्ट २०१८ रोजी सोलापूर येथे केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७१व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. देशमुख यांनी सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी ध्वज फडवला. पोलिस पथकाची मानवंदना स्वीकारल्यावर देशमुख यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त एम. बी. तांबडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ‘रस्ते विकास आणि आरोग्य सुविधा अतिशय महत्त्वाच्या आहेत. सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यात या दोन बाबींचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील आरोग्य सुविधा विस्तारण्यावर आणि जास्तीत जास्त गावे चांगल्या रस्त्याने सोलापूर शहराशी जोडण्यावर सरकारचा भर आहे. जिल्ह्यातील दवाखान्यांची संख्या वाढावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर शहरात लवकरच १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय आणि बालकांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येणार आहे.’

‘ग्रामीण भागातील नागरिकांचा शहराशी संपर्क वाढावा, यासाठी जिल्ह्यातील ९१ किलोमीटरच्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुमारे ५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सोलापूरहून पुणे, नाशिक, हैदराबादसाठी ३२ शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या आहेत,’ असेही देशमुख म्हणाले. ‘जिल्ह्यातील रेंगाळलेल्या प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. एकरुख आणि शिरापूर उपसा सिंचन योजनेसाठी ८८७ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. कारंबा पंपगृहाचे काम लवकरच सुरू होईल. यामुळे शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटेल,’ असा विश्वास पालकमंत्री देशमुख यांनी व्यक्त केला. ‘जिल्हा परिषदेकडून विविध योजनांची अंमलबजावणी चांगल्या पध्दतीने सुरू आहे. यामुळे ग्रामीण भागात विकास गतीने होत आहे,’ असे देशमुख म्हणाले. जिल्ह्यात उद्दिष्टाच्या दीडपट वृक्षारोपण करण्यात यश आल्याबद्दल पालकमंत्री देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.
 
या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले, कोषागार अधिकारी राहुल कदम, श्रीधर निंबाळकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम, कार्यकारी अभियंता विलास मोरे, क्रीडाअधिकारी नितीन तारळकर, अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे, उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, शिवाजी जगताप, श्रावण क्षीरसागर यांच्याबरोबर पोलीस, महसूल, आरोग्य, जिल्हा परिषद, पोलीस आयुक्त, अधिक्षक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, मध्यवर्ती इमारतीत अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. या वेळी जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, उपसंचालक रवींद्र माने, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा होमकर यांनी केले.

युवा माहिती दूत उपक्रमाच्या लोगोचे अनावरण
राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्दिष्टाने युनिसेफ व राज्याचा उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे युवा माहिती दूत उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री विजय देशमुख यांनी या वेळी दिली. या वेळी या उपक्रमाच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले. ध्वजवंदनानंतर बहुद्देशीय सभागृहात हा कार्यक्रम झाला. या वेळी विविध परीक्षांत उत्तम यश मिळविणारे विद्यार्थी आणि गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search