Next
भिक्षावृत्तीपासून परावृत्त करणारी तरुणाईची ‘सुरक्षा’
BOI
Friday, November 16, 2018 | 03:45 PM
15 2 0
Share this article:भारतातल्या अनेक समाजसुधारणांचं माहेरघर असलेल्या पुण्यातल्या तरुणाईनं नवं अभियान सुरू केलं आहे. कोंढव्यातल्या लुल्लानगरमध्ये राहणाऱ्या विशाल ओव्हाळ, संदीप बधे आणि अमोल वाघमारे या तरुणांनी रस्त्यांवर भीक मागणाऱ्या भिक्षेकऱ्यांना भिक्षावृत्तीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न चालवला आहे. ‘भिक्षेकऱ्यांना भीक देऊ नका, लहान मुलांची तस्करी थांबवा’ असं आवाहन ते सुरक्षा सोशल ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून करत आहेत. ‘लेणे समाजाचे’ सदरात आज या संस्थेच्या कार्याबद्दल माहिती घेऊ या.
............
पहिला प्रसंग. तुम्ही पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर उभे आहात. अचानक समोरून धोतर-सदरा, नेहरू टोपी घातलेले, खांद्यावर भगवी पताका घेतलेले आजोबा आणि त्यांच्यासोबत नऊवारी साडी नेसलेल्या आजी तुमच्या जवळ येतात, तुमच्याकडे भीक मागतात.

दुसरा प्रसंग. लुल्लानगरसारख्या गजबजलेल्या चौकात ट्रॅफिक सिग्नलला तुम्ही थांबला आहात. शेजारच्या फुटपाथवरून अचानक तीन-चार लहान मुलं येतात. त्यांच्या अंगात मळलेले, फाटलेले कपडे असतात. एखाद्याने ओठ आणि नाकाच्या मधल्या जागेत काळ्या पेनाने मिशी काढलेली, तर दुसऱ्यानं हनुमानासारखं अंग रंगवलेलं. तिसरी त्यांच्यापेक्षा मोठी ताई हातात एक लेकरू घेऊन पुढ्यात उभी राहते. चेहरा अगदी केविलवाणा करून चौघंही चार जणांकडे भीक मागतात. ती ताई तुमच्याकडे आलेली असते. 

प्रसंग तिसरा. स्वारगेट एसटी बस स्थानकाबाहेर तुम्ही पीएमपीएमएलच्या बसची वाट पाहत असता. एक ग्रामीण पोषाख घातलेला माणूस जवळ येतो. ‘दादा, मी जालन्याहून आलोय. सोबत बायको-मुलं आहेत. (असं म्हणत तो समोरच एक प्रवासी बॅग आणि कडेवर लहान मूल घेऊन उभ्या असलेल्या एका स्त्रीकडे बोट दाखवतो. सोबत दुसरं लहान मूलही असतं.) मी चांगला शिकलेला आहे. इथं पाव्हण्यांकडं आलो होतो; पण माझं पाकिट मारलं गेलं. पाव्हण्यांचा फोन-पत्ता, पैसे सगळं त्यातच गेलं. जालन्याला जायचं तिकीट काढण्यापुरते, जेवणापुरते पैसे द्या ना....,’ अशी आर्जवं करत तो थोडी मोठी भीक मागतो.  

तुमचं मन संवेदनशील असतं आणि भीक मागणाऱ्या वेगवेगळ्या वयांच्या व्यक्तींच्या चेहऱ्यांवरचे केविलवाणे भाव ते टिपतं. पहिल्या प्रसंगात तुम्ही कितीही घाईत असलात, तरीही खिशातून पैसे काढता आणि त्यांच्या हातांवर टेकवता. दुसऱ्या प्रसंगात तुम्ही जरी टाळलंत, तरी तुमच्या गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली तुमची आई, बहीण, बायको किंवा गर्लफ्रेंड त्या ताईच्या हातावर पैसे टेकवते. तिसऱ्या प्रसंगात तुम्ही जरा त्याच्या कुटुंबाकडे पाहून खात्री करून घेता की, हे खरंच परगावचे, गरीब, नडलेले आहेत का? आणि मग तुम्ही त्याच्या हातावर पैसे ठेवता. 

तिन्ही प्रसंगांनंतर तुमच्या मनात समाधान असतं दान दिल्याचं आणि पुण्य कमावल्याचं; पण या सत्कर्माबरोबरच तुम्ही केलेला अपराध तुमच्या गावीही नसतो. भीक मागणं हा भारतात गुन्हा आहे आणि गुन्हेगाराला भीक देणाराही त्यामध्ये बरोबर वाटेकरी आहे, ही माहिती आपल्याला नसते. 

हे सगळं सांगण्याचं कारण असं, की भारतातल्या अनेक समाजसुधारणांचं माहेरघर असलेल्या पुण्यातल्या तरुणाईनं नवं अभियान सुरू केलं आहे. कोंढव्यातल्या लुल्लानगरमध्ये राहणाऱ्या विशाल ओव्हाळ, संदीप बधे आणि अमोल वाघमारे या तरुणांनी रस्त्यांवर भीक मागणाऱ्या भिक्षेकऱ्यांना भिक्षावृत्तीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न चालवला आहे. ‘भिक्षेकऱ्यांना भीक देऊ नका, लहान मुलांची तस्करी थांबवा’ असं आवाहन ते सुरक्षा सोशल ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून करत आहेत.

सुरुवात झाली प्रश्नांनी...
विशाल आणि अमोल हे दोघेही नेहमी गाडीवरून जाताना ट्रॅफिक सिग्नलला उभ्या असलेल्या मुलांकडे पहायचे. लहान मुलं पाहून त्यांच्याही मनात कळवळा निर्माण व्हायचा; पण मुलांची वाढलेली संख्या पाहून ही एवढी मुलं येतात कुठून हा प्रश्न दोघांनाही सतावत होता. 

पत्रकार असलेले अमोल त्याबाबत म्हणाले, ‘आजूबाजूला सगळेच जण पाहत असतात; पण ज्याचं मन संवेदनशील असतं, त्याला प्रश्न पडतात. आम्हाला दोघांनाही या भिक्षेकऱ्यांबद्दल प्रश्न पडायचे आणि आम्ही त्याबद्दल नेहमी चर्चा करायचो. ही मुलं येतात कुठून, या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करायचो. जागोजागी मुलं पाहिली, की आम्ही ‘चाइल्डलाइन’च्या १०९८ या हेल्पलाइनवर फोन करून कळवायचो. आमची तक्रार नोंदवून घेतली जायची आणि ‘आम्ही प्रयत्न करतो’ असं उत्तर तिथून मिळायचं. बरं वाटायचं; पण तीच मुलं त्याच ठिकाणांवर दिसायची.’

यातून काही साध्य होत नाही हे कळल्यावर दोघांनीही थेट ‘चाइल्डलाइन’चं कार्यालय गाठलं. प्रॉपर्टी कन्सल्टंट असलेले विशाल त्याबाबत म्हणाले, ‘लहान मुलांच्या कल्याणासाठी काम करण्याची जबाबदारी असलेल्या ‘चाइल्डलाइन’चं पुण्यातलं काम पाहणाऱ्या संस्थेने मनुष्यबळाचा मुद्दा पुढे केला. आम्ही त्यांना स्वयंसेवक म्हणून काम करण्याची तयारी दर्शवली. तरीही ते म्हणाले, की तयारी दाखवणारे खूप असतात; पण प्रत्यक्ष काम करणारे मिळत नाहीत. तेव्हा मात्र आम्ही दोघांनीही त्यांच्यासोबत काम करण्याचं ठरवलं आणि कामाला सुरुवात केली.’

या प्रश्नाबद्दल अभ्यास करताना विशाल यांच्या लक्षात आलं, की रस्त्यावर दिसणारी मुलं ही बहुतांशी अपहरण केलेली असतात. मोठमोठ्या शहरांतून, गावांतून मुलांच्या अपहरणाचं प्रमाण वाढलं आहे. ती मुलं दुसऱ्या ठिकाणी भीक मागण्यासाठी उभी केली जातात.

‘कोणतेही कष्ट न करता, पुण्य कमावण्याच्या धार्मिक संकल्पनेच्या आधारावर भावनिक माणसाला सहज लुटता येतं, हे सूत्र वापरून या मुलांच्या माध्यमातून मोठा धंदा केला जातो, हे आमच्या लक्षात आलं. त्याचंच रूपांतर मानवी तस्करी, व्यसनाधीनता आणि अन्य वाममार्गांत होतं. ही समस्या झाली; पण त्यावर उपाय काय? तर या मुलांना भीक न देणे हाच उपाय. सामान्य नागरिकाने त्यांना भीक देणं बंद केलं, की हे प्रमाण कमी होईल, हे लक्षात आल्यावर आम्ही जनजागृती करण्याचं ठरवलं.....,’ विशाल सांगत होते. 

सुरक्षा ऑर्गनायझेशनच्या कार्यकर्त्या अॅडव्होकेट अमिना मुजावर यांनी यामागच्या कायदेशीर बाबी सांगितल्या. त्या म्हणाल्या, ‘‘भीक मागण्यास प्रतिबंध कायदा १९५९’नुसार भीक मागणे हा भारतात गुन्हा आहे. त्यामुळे भीक मागणाऱ्याला पोलिस ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करू शकतात. बेरोजगारी, महागाई, आळशीपणा अशा अनेक कारणांमुळे आपल्याकडे लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्या वयोगटांतील व्यक्ती भीक मागतात. त्यातल्या अगदी थोडक्या व्यक्तींवर परिस्थितीमुळे भीक मागण्याची वेळ आलेली असते. उर्वरित लोक धंदा म्हणून भीक मागतात. आमच्या संघटनेचं काम करताना आम्हाला या धंद्याचं प्रत्यक्ष स्वरूपच पहायला मिळालं.’

दरम्यानच्या काळात अमोल यांनी पुणे शहरात रस्त्यांवर १० हजार ४२७ मुलं राहत असल्याची माहिती माहिती अधिकारांतर्गत मिळवली. 
महापौरांच्या हस्ते अनावरण

पहिला उपक्रम कोंढव्यात 
सुरक्षा संस्थेने कोंढव्यातील लुल्लानगर परिसरात असलेल्या गेरा जंक्शन या चौकात जनजागृती फलक लावून कामाला सुरुवात केली. १७ जुलै २०१७ रोजी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते या फलकाचं अनावरण करण्यात आलं. ‘भीक मागणं हा गुन्हा असून, भीक मागण्याच्या प्रवृत्तीला प्रोत्साहन देऊ नका,’ असं आवाहन या फलकावर करण्यात आलं आहे. महापौरांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. या छोट्याशा फलकाची दखल त्या भागातले नवे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी घेतली आणि विशाल, अमोल यांना कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये बोलवून घेतलं. 

त्याबाबत विशाल म्हणाले, ‘आम्ही दोघंही सामान्य मध्यमवर्गीय पांढरपेशा कुटुंबातले असल्यामुळे आम्हाला वाटलं, की काही तरी चूक झाली आपल्याकडून; पण गायकवाड साहेबांनी आमच्या प्रयत्नांचं कौतुकच केले. आम्ही त्यांना काम करायची आणि त्यांनी आम्हाला सर्वतोपरी मदत करायची तयारी दाखवली. त्यातूनच आमचा दुसरा उपक्रम प्रत्यक्षात आला. नुसती जागृती कामाची नाही, हे लक्षात आलं. भिक्षेकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते, हे गायकवाड साहेबांशी बोलल्यावर समजलं. त्यातून भिक्षेकऱ्यांवर कारवाई करण्याचं पुढचं पाऊल निश्चित झालं.’

जनजागृती करताना आपणच वेळ देऊन हे काम करावं असा विचार पक्का झाल्यामुळे विशाल आणि अमोल यांनी ऑक्टोबर २०१७मध्ये सुरक्षा सोशल ऑर्गनायझेशनची स्थापना करून रीतसर नोंदणी केली.

कोंढव्यातील कारवाई

कायदेशीर कारवाईचा बडगा
ऑक्टोबर २०१७मध्ये लुल्लानगर परिसरात केलेल्या पहिल्या कारवाईदरम्यान पोलिसांनी १६ भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना न्यायालयासमोर हजर केलं. ‘सुरक्षा’च्या स्वयंसेवकांनी पोलिसांबरोबर या कारवाईत भाग घेतला. न्यायालयानं त्या भिक्षेकऱ्यांना विश्रांतवाडीतल्या भिक्षेकरी स्वीकार केंद्रामध्ये पाठवलं. या व्यक्तींनी भीक मागू नये आणि कष्ट करून जीवन जगावं, यासाठी या केंद्रात प्रयत्न केले जातात. चरितार्थासाठी उपयोगी येतील अशी कौशल्यंही शिकवली जातात. भिक्षावृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशनही केलं जातं. 

समाजाच्या साथीनं मोठी कारवाई
‘कोंढव्यातल्या मशिदींबाहेर अनेक भिक्षेकरी बसतात हे आमचं आणि पोलिसांचं निरीक्षण सारखं होतं. त्यामुळे तिथेच पहिली मोठी कारवाई करायचा निर्णय झाला. सामाजिक सलोख्याचा मुद्दा लक्षात घेऊन त्या परिसरातले सर्वपक्षीय नगरसेवक, सर्व मशिदींचे पदाधिकारी यांची बैठक कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये झाली. त्यांना पोलिसांनी भूमिका समजावून सांगितली. सर्वांनीच कारवाईची कल्पना उचलून धरली आणि कारवाईला सक्रिय सहकार्यही केलं. मशिदींच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईसाठी कार्यकर्तेही दिले. तीन नोव्हेंबर २०१७ रोजी लुल्लानगर जंक्शन, ज्योती चौक, कौसरबाग मशीद, तालाब मशीद या ठिकाणी कारवाई करून पोलिसांनी ४० जणांना ताब्यात घेतलं. आम्ही सगळ्यांनी त्यासाठी सहकार्य केलं,’ असं विशाल यांनी सांगितलं. 

भिक्षेकरी स्वीकार केंद्र, विश्रांतवाडी

जामीन एक लाख ३५ हजारांचा
भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतल्यावर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. नातेवाईकांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांचा असा एकूण एक लाख ३५ हजारांचा जामीन भरून ४० पैकी २७ भिक्षेकऱ्यांची सुटका करून घेतली. उरलेल्या १३ जणांना स्वीकार केंद्रात पाठवण्यात आलं. या ४० जणांत आठ वर्षांच्या मुलापासून ७५ वर्षांच्या म्हाताऱ्यांचाही समावेश होता.

पोलिसांचं सहकार्य आणि सुरक्षा सोशल ऑर्गनायझेशनच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न यामुळे हे काम सुरू आहे. पुण्यातली बहुतांश महत्त्वाची वृत्तपत्रं आणि टीव्ही चॅनेल्सनी बातम्या देऊन या मोहिमेला पाठबळ दिलं. ‘पुण्यातल्या विश्रामबाग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने शनिपार, बाजीराव रस्ता, अलका टॉकीज चौक, नारायण पेठ, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता या भागातही ‘सुरक्षा’च्या कार्यकर्त्यांनी भिक्षेकऱ्यांवर कारवाई केली. त्याचबरोबर महंमद पैगंबर जयंतीच्या मिरवणुकीत कॅम्पातील महात्मा गांधी रस्त्यावर आणि गणेशोत्सवात दगडूशेठ गणपती मंदिर परिसरातही जनजागृती करण्यात आली. सामाजिक सुरक्षा विभागाच्या प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे यांच्या सहकार्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डेक्कन, गुडलक चौक, बंडगार्डन रस्ता, जहांगीर रुग्णालय चौक, येरवडा, रामवाडी, चंदननगर या भागांतही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात आम्ही १८ कारवाया केल्या असून, त्यामध्ये २५० भिक्षेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे,’ असंही विशाल यांनी सांगितलं.

फेसबुक पेजमुळे मुंबईतही धडक
‘आमच्या कामाची माहिती आम्ही फेसबुक पेजवरून देत होतो. त्यामुळे देशभरातून आम्हाला फोन आले. मुंबईतही असं काम करण्याची आणि मदत करण्याची तयारी काहींनी दर्शवली. त्यामुळे आम्ही तिथे केवळ जनजागृतीचं काम सुरू केलं. दादर रेल्वे स्टेशन, सीएसटी स्टेशन आणि मुंबई सेंट्रल इथं आम्ही जनजागृती केली. हिंदी टीव्ही मालिकांतील अभिनेता गौरव चौधरी यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाला. त्याच्यासोबतच रिया साखरे, इक्रम करीम, रेश्मा गोखले, बीनल जसानी, संदीप नलावडे अशी आमची २० जणांची टीम मुंबईत तयार झाली. आम्ही एकमेकांना फेसबुकवर ओळखत होतो; पण एकत्र भेटून हे अभियान यशस्वी केलं. स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलिसांनी आम्हाला खूप सहकार्य केलं,’ असं अमोल यांनी आवर्जून सांगितलं. दिवाळीसाठी भेट
‘एकीकडे भिक्षावृत्तीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करताना आम्ही दुसरीकडे भिक्षेकऱ्यांच्या सक्षमीकरणाकडेही लक्ष दिलं आहे. या वर्षीच्या दिवाळीत आम्ही नरकचतुर्दशीला भिक्षेकरी स्वीकार केंद्राला भेट दिली. दिवाळीची भेट म्हणून १६ महिलांना साड्या, ३८ पुरुषांना टॉवेल आणि सर्वांना मिठाई दिली. पुण्यातल्या कामात खजिनदार संदीप बधे, रेखा दुधाणे, अजहर कादरी, नितीन चंदन, महंमद अली शेख हे कार्यकर्ते मदत करतात,’ असे अमिना मुजावर यांनी सांगितले.
भिक्षावृत्तीपासून परावृत्त करणं, त्याचबरोबर लहान मुलांची तस्करी रोखणं यासाठी प्रयत्न करणारी ही सगळी मंडळी तरुण आहेत. समस्या सोडवण्याची जबाबदारी सरकारवर न ढकलता क्रियाशील सहभागातून प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा ऑर्गनायझेशनच्या कामाला आणखी बळ मिळो.

संपर्क : विशाल ओव्हाळ,
अध्यक्ष, सुरक्षा सोशल ऑर्गनायझेशन
मोबाइल : ९७६४० ०७८५२.
पत्ता : फ्लॅट नं. नऊ, अमर ग्रॅफिकॉन, प्लॉट ९७, लुल्लानगर, पुणे – ४११०४०.

- अमोल अशोक आगवेकर 
ई-मेल : amolsra@gmail.com

(विशाल ओव्हाळ यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील ‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध आहेत.)

 
15 2 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
sunil kamble About 207 Days ago
Best work vishal
0
0
Yusuf Bagwan Market About 279 Days ago
Shiwaji Market Camp pune , Vice president
0
0
Balthazar singh About 334 Days ago
Really your calling is great Visual.Keep it up.
0
0
Amol About 334 Days ago
Great Workcl Vishal
0
0
Sunil Kamble About 334 Days ago
NICE WORK KEEP IT UP
0
0
नितिन रानपीसे About 334 Days ago
खूपच छान प्रयत्न करत आहात, तुमच्या प्रयतनाना यश एवो हीच कामना , जय भीम
0
0
Santosh nagtilak About 335 Days ago
Great job
2
0
Smita About 335 Days ago
Nice keep it up, we are proud of you.
1
0
Sumit gaikwad About 335 Days ago
Good work vishal sir.. Be proud of u😊😊😊
1
0
Vishnu wadkar About 335 Days ago
Great job
1
0
Girish Dabholkar About 335 Days ago
Very good initiative, actue concern of India, proper steps can change face of India. Great work Vishal and others !!
2
0
Sarita ovhal About 335 Days ago
Great work.keep it up.👌
3
0

Select Language
Share Link
 
Search