Next
वैयक्तिक मेडिक्लेम पॉलिसी चांगली की फ्लोटर पॉलिसी?
BOI
Saturday, July 21, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर होणाऱ्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे मेडिक्लेम पॉलिसी घेण्याला पर्याय नाही; मात्र वैयक्तिक मेडिक्लेम पॉलिसी घ्यायची की फ्लोटर पॉलिसी घ्यायची, याबद्दल अनेकदा संभ्रमात पडायला होते. म्हणूनच त्याबद्दल जाणून घेऊ या ‘समृद्धीची वाट’ सदराच्या आजच्या भागात...
.............
बदलती जीवनशैली व त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या ही आता सर्वांच्याच चिंतेची बाब झाली आहे. अगदी तरुण वयात हृदयविकार, पाठीचे दुखणे, मधुमेह, कर्करोग यांसारख्या विकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालेले आहे. अशा वेळी या गंभीर आजारावर योग्य ते उपचार आणि प्रसंगी शस्त्रक्रिया करण्यास प्राधान्य देणे भाग असते. साहजिकच यावर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागतो. या आकस्मिक खर्चामुळे कुटुंबाची आर्थिक ओढाताण होते. कधी कधी तर महागडे उपचार घेताना असलेली शिल्लक अपुरी पडून प्रसंगी कर्ज काढावे लागते किंवा जवळील चीजवस्तू विकण्याची वेळ येऊ शकते; मात्र या आर्थिक समस्येवर आपण वैयक्तिक मेडिक्लेम पॉलिसी किंवा फ्लोटर पॉलिसी घेऊन मात करू शकतो. यासाठी आपल्याला मेडिक्लेमबाबतची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

मेडिक्लेम पॉलिसी ही ‘जनरल इन्शुरन्स’कडून दिली जाणारी विमा योजना आहे. ती रीएंबर्समेंट स्वरूपाची असून, यात मेडिक्लेम पॉलिसीधारकाला रुग्णालयात होणाऱ्या खर्चाची परतफेड विमा कंपनीकडून दिली जाते. प्रत्यक्ष झालेला खर्च आणि पॉलिसी कव्हरची असलेली रक्कम यातील कमी असलेली रक्कम परतफेड म्हणून दिली जाते. यासाठी रुग्णाचे रुग्णालयातील वास्तव्य किमान २४ तास असणे आवश्यक असते. काही उपचारांसाठी वास्तव्य २४ तासांपेक्षा कमी असले तरी चालते. उदा. मोतिबिंदू किंवा मूळव्याधीसारख्या शस्त्रक्रिया. यांसाठीच्या खर्चाचीसुद्धा परतफेड मिळू शकते; मात्र यांसारख्या शस्त्रक्रिया पॉलिसी घेतल्याच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत झाल्यास परतफेड मिळत नाही. पॉलिसी कव्हरची रक्कम व अर्जदाराचे वय विचारात घेऊन वैद्यकीय तपसणी झाल्यावर वैद्यकीय अहवालानुसार पॉलिसी दिली जाते. वैद्यकीय अहवालात काही आजार आढळून आले, तर अशा आजारांमुळे होणऱ्या हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाची पॉलिसीच्या सुरुवातीच्या तीन वर्षांच्या काळात परतफेड मिळू शकत नाही. वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांचे नियम व प्रीमियम थोड्याफार फरकाने सारखेच असतात. मेडिक्लेम पॉलिसी घेण्यापूर्वी पॉलिसीच्या अटी व शर्ती समजून घेऊन आपल्या गरजेनुसार मेडिक्लेम पॉलिसी घ्यावी.

मेडिक्लेम पॉलिसी प्रामुख्याने इंडिव्हिज्युअल (वैयक्तिक) आणि फ्लोटर स्वरूपात मिळते. यातील कोणती मेडिक्लेम पॉलिसी घ्यावी, याबाबत बहुतेकांना संभ्रम पडतो. इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कुटुंबातील पती/पत्नी/मुले यांच्यासाठी एकच मेडिक्लेम पॉलिसी दिली जाते. या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये सर्वांसाठी स्वतंत्र कव्हर असते. उदा. पती/पत्नी प्रत्येकी पाच लाख रुपये आणि दोन मुले असतील, तर मुलांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांचे कव्हर घेता येते. इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम पॉलिसी एकच असली, तरी प्रत्येकाचा वार्षिक प्रीमियम वयावर अवलंबून असतो आणि हा प्रीमियम एकत्रित दिला जातो. वैयक्तिक कव्हर आपल्या गरजेनुसार कमी-अधिक घेता येते व संबंधित व्यक्तीला त्याच्या कव्हरनुसार गरज पडल्यास खर्चाची परतफेड मिळू शकते. समजा, वरील उदाहरणात पतीचा हॉस्पिटलायझेशनचा खर्च चार लाख रुपये झाला, तर चार लाखांपर्यंत परतफेड मिळू शकेल किंवा पत्नीचा हॉस्पिटलायझेशनचा खर्च अडीच लाख रुपये झाला, तर परतफेड अडीच लाखांपर्यंत मिळू शकेल. तसेच मुलाचा खर्च तीन लाख रुपये झाला, तर त्याची परतफेड तीन लाखांपर्यंत मिळू शकेल.

याउलट, जर या कुटुंबाने पाच लाख रुपये कव्हर असणारी फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी घेतली असेल, तर हे पाच लाखांचे कव्हर संपूर्ण कुटुंबासाठी असते. त्यामुळे हॉस्पिटलायझेशनचा खर्च संपूर्ण कुटुंबासाठी एकत्रित स्वरूपात गृहीत धरला जातो. समजा, वरील उदाहरणात एका वर्षात पतीचा हॉस्पिटलायझेशनचा खर्च चार लाख रुपये झाला, तर चार लाखांपर्यंत परतफेड मिळू शकेल. त्यानंतर पत्नीचा हॉस्पिटलायझेशनचा खर्च अडीच लाख रुपये झाला, तर तेवढी परतफेड न मिळता उर्वरित एक लाख रुपयांएवढीच परतफेड मिळेल. त्यानंतर मुलांचा हॉस्पिटलायझेशनचा खर्च झाला, तर पाच लाखांची मर्यादा संपल्यामुळे परतफेड मिळणार नाही.

थोडक्यात, इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम पॉलिसीमधील प्रत्येकास त्याच्या वैयक्तिक मर्यादेपर्यंत परतफेड मिळू शकते. फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसीमधील सर्व सदस्यांना एकत्रित कव्हर असल्याने प्रत्येकास परतफेड मिळेलच असे नाही.

वरील इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम पॉलिसीतील पतीचे वय ३९, पत्नीचे वय ३७ व दोन्ही मुलांचे वय १८ वर्षांच्या आत असेल, तर वार्षिक प्रीमियम १८ हजार ३०० रुपये इतका पडू शकेल. याउलट या कुटुंबाने पाच लाख रुपये कव्हर असणारी फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसी घेतली तर वार्षिक प्रीमियम १५ हजार ५०० रुपये इतका असेल.

फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसीचा प्रीमियम कमी दिसत असला, तरी मिळणारे कव्हर चौघांना एकत्रितपणे मिळत असल्याने गरज पडल्यास प्रत्येकाला परतफेड मिळेलच असे नाही. मिळाले तरी प्रत्येकास पाच लाख रुपये मिळणार नाहीत. याउलट इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम पॉलिसीमध्ये प्रत्येकाला पाच लाखांपर्यंत परतफेड मिळू शकते, हे लक्षात घेणे जरूरीचे आहे.

दुसरे असे, की इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम पॉलिसीचा प्रीमियम प्रत्येकाच्या वयानुसार असतो. जास्त वय असणाऱ्याला जास्त आणि कमी वय असणाऱ्याला तो कमी असतो. फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसीचा प्रीमियम पॉलिसीत समाविष्ट असणाऱ्या व्यक्तींपैकी जास्त वय असणाऱ्या व्यक्तीच्या वयानुसार ठरविला जातो. अन्य सदस्यांच्या कमी वयाचा फायदा मिळत नाही. त्यामुळे इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम पॉलिसीचा प्रीमियम फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसीच्या प्रीमियमपेक्षा जास्त असला, तरी इंडिव्हिज्युअल मेडिक्लेम पॉलिसी घेणे हितावह असते.

- सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search