Next
बॉलीवूडमध्ये देशप्रेमावरील चित्रपटांचा जोश ‘हाय’
‘उरी’च्या यशानंतर तब्बल नऊ चित्रपट येणार
BOI
Wednesday, March 13, 2019 | 03:30 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ या उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित चित्रपटाने तुफान यश मिळवले. प्रदर्शनाच्या नऊ आठवड्यानंतरही आज चित्रपटगृहात सुरू असलेला हा सिनेमा चांगली कमाई करत आहे. या धर्तीवर देशप्रेमावरील आणखी नऊ चित्रपट येऊ घातले आहेत. हे पाहता बॉलीवूडमध्ये सध्या देशप्रेमावरील चित्रपटांची लाट आली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

‘उरी’च्या यशानंतर ‘केसरी’, ‘मेजर’, ‘रॉ’, ‘बाटला हाऊस’, ‘पानीपत’, ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘मिशन मंगल’, ‘८३’ आणि कारगिल युद्धाचा हिरो विक्रम बत्रा यांच्यावरील बायोपिक अशी चित्रपटांची लाटच आगामी काळात येत आहे. २०१६मध्ये ‘उरी’मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला होता. या घटनेवर आधारित ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट जानेवारी १९मध्ये आला. चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगली पकड मिळवली. त्यातच १४ फेब्रुवारीचा ‘पुलवामा’ हल्ला आणि लगोलग आठ दिवसांत भारतीय सैन्याने केलेला दुसरा सर्जिकल स्ट्राईक या सगळ्या वातावरणात देशातील जनता असताना देशप्रेम हा मुद्दा या काळात अग्रस्थानी होता. याचाच परिणाम म्हणून पुलवामा हल्ल्यानंतरच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे नऊ आठवड्यांपेक्षा अधिक काळ होऊनही ‘उरी’ हा चित्रपट अजूनही सिनेमागृहांमध्ये सुरू आहे आणि तो तेवढ्याच जोमात सुरू आहे. 

देशप्रेमावरील चित्रपट हा ट्रेंड बॉलीवूडमध्ये फार पूर्वीपासून असल्याचे दिसते. ‘कारगिल’ युद्धाच्या काळातही बॉर्डर, एल. ओ. सी कारगिल, लक्ष्य यांसारखे देशप्रेमावर आधारित अनेक सिनेमे आले होते. मुळात देशातील घडामोडींवर आधारित चित्रपट हे प्रेक्षकांच्या अधिक जवळ जाणारे असतात. अशा चित्रपटांकडे त्यांचा ओढा असतोच. त्यातही देशासाठी लढणारे सैनिक यांच्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या मनात कायम आदर असतो. त्यामुळे त्यांच्यावर असलेल्या चित्रपटांना प्रेक्षक असतोच. 

या बाबी लक्षात घेता आताचा पुलवामा हल्ला आणि त्यानंतर केलेला दुसरा सर्जिकल स्ट्राईक शिवाय येणाऱ्या काळातील देशव्यापी निवडणुका असे सगळे वातावरण देशात असताना या धर्तीवर देशप्रेमावरील चित्रपट जास्त चालण्याची शक्यता वाढते. यामुळेच असेच एकापाठोपाठ अनेक चित्रपट सध्या येऊ घातले आहेत, काही येण्याच्या तयारीत आहेत.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search