Next
‘आदिवासी कथा हे पुनर्कथनाचा अवकाश देणारे अभिजात साहित्य’
अतुल पेठे यांचे प्रतिपादन
BOI
Monday, December 10, 2018 | 11:17 AM
15 0 0
Share this article:

‘जंगलाच्या सान्निध्यात उमललेले ज्ञान, आदिवासी बोधकथा - एक पुनर्कथन’ या पुस्तकाचे प्रकाशन  अतुल पेठे यांच्या हस्ते झाले. या वेळी (डावीकडून) सुहास परांजपे, प्रदीप प्रभू, अतुल पेठे, वाहरू सोनावणे व अरविंद पाटकर उपस्थित होते.

पुणे : ‘आदिवासींच्या कथा हे वेगळा अवकाश देणारे अभिजात साहित्य असून, त्या आपल्या जीवनात उर्जामय जादू निर्माण करतात;तसेच त्यांच्यामध्ये पुनर्कथन करण्याचा अवकाश आहे’, असे मत नाट्यकर्मी अतुल पेठे यांनी व्यक्त केले.

मनोविकास प्रकाशनातर्फे तयार केलेल्या, आदिवासी कथा, आदिवासींची चित्रे यांचे संकलन असलेल्या ‘जंगलाच्या सान्निध्यात उमललेले ज्ञान, आदिवासी बोधकथा - एक पुनर्कथन’, या पुस्तकाचे अतुल पेठे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्या वेळी ते बोलत होते. कवी वाहरू सोनावणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर, आशिष पाटकर, लेखक प्रदीप प्रभू, सुहास परांजपे या वेळी उपस्थित होते.

आदिवासी पाड्यांवर पिढ्यानपिढ्या सांगण्यात येत असलेल्या आणि वारली चित्रांच्या माध्यमातून सांगितल्या जाणाऱ्या कथा संकलीत करून, प्रदीप प्रभू आणि शिराझ बलसारा यांनी ‘विस्डम फ्रॉम द वाईल्डरनेस’, या इंग्रजी पुस्तकाची निर्मिती केली होती. त्या पुस्तकाचे सुहास परांजपे व स्वातीजा मनोरमा यांनी पुनर्कथन केले असून, ‘जंगलाच्या सान्निध्यात उमललेले ज्ञान, आदिवासी बोधकथा - एक पुनर्कथन’, या नावाने ते मनोविकास प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले.

पेठे म्हणाले, ‘आपल्या जगण्यातील उर्जामय जादू हरवली असल्याने, आपल्या साहित्यामधूनही ती हरवली आहे;मात्र आदिवासींच्या या कथा अद्भुत असून, त्यामुळे मराठी साहित्यामध्ये मोलाची भर पडली आहे. वृत्ती, वागणे आणि जगणे यांचा संगम असणाऱ्या या कथा सहआनंद देतात.’

‘जगण्याचा दृष्टीकोन बदलणाऱ्या, या कथा वनवासी नव्हे, तर आदिवासी आहेत. या कथांमध्ये पुनर्कथन करण्याचा अवकाश असून, आज हीच बहुपेडी संस्कृती गरजेची आहे’,असे पेठे म्हणाले.

या कथांवर लवकरच सुदर्शन रंगमंच येथे तीन दिवसांचा वाचन महोत्सव करणार असल्याचेही पेठे यांनी जाहीर केले.

वाहरू सोनावणे म्हणाले, ‘माणसासहित, प्राणी, पक्षी आणि अचेतन गोष्टी, या आदिवासी जीवनाचा भाग असून, त्या कथांमधून जगण्याचे एक मूल्य म्हणून पुढे येतात. एका बाजूला आदिवासींना माणूसपण नाकारले जाते आणि दुसऱ्या बाजूला आदिवासींच्या कथांना, प्रस्थापित सांस्कृतिक संदर्भ देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यापासून सावध राहिले पाहिजे.’

पाटकर यांनी चळवळी आणि कार्यकर्ते यांचा आढावा घेऊन, कार्यकर्त्यांना लिहिण्याचे आवाहन केले.

प्रभू म्हणाले, ‘आदिवासी संस्कृती, ही सहनिवास संकल्पनेवर आधारीत असून, त्याच प्रवाहात बोलल्या जाणाऱ्या कथा एकत्र करण्यात आल्या आहेत. पुढारलेल्या आदिवासींना मागास ठरविण्याचा प्रयत्न होत असून, आदिवासींनी ब्रिटीशांविरोधात लढाई केल्याच्या १०० घटना आहेत; मात्र त्याचे दस्तऐवजीकरण झाले नसल्याचेही प्रभू यांनी सांगितले.  

परांजपे म्हणाले, ‘आदिवासींचे जीवन, मूल्य, प्रेम आणि त्यांच्यावरील अत्याचार, याचे दर्शन म्हणजे या कथा आहेत. त्यांचा आशय भाषांतर करून ताकदीने उभा रहात नसल्यानेच, त्याचे पुनर्कथन केले आहे. त्यामुळे मराठी साहित्यात नवे दालन खुले झाले आहे.’ ‘या पुस्तकाची निर्मिती हे आव्हान होते’, असे परांजपे यांनी सांगितले.

मोहन देस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search