Next
हेच भाषेचे लोकशाहीकरण!
BOI
Monday, July 29, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

ग्रेटचेन मॅककुलोच या लेखिकेचे ‘बीकॉज इंटरनेट - अंडरस्टँडिंग दी न्यू रूल्स ऑफ लँग्वेज’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. ते पुस्तक म्हणजे ‘नेट’क्या भाषिक बदलांचे दस्तावेजीकरण आहे. इंटरनेटला आलेले महत्त्व आणि त्याच्यामुळे अनौपचारिक लेखनामध्ये झालेली प्रचंड वाढ यामुळे भाषेत परिवर्तन शक्य झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या निमित्ताने...
............
जगातील कोणत्याही भाषेच्या वर्णमालेत # हे चिन्ह तुम्हाला आढळणार नाही; मात्र आजच्या पिढीतील कोणत्याही युवकाशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल, तर या चिन्हाला वळसा घालून तुम्ही जाऊ शकत नाहीत. संगणक आणि सोशल मीडियाच्या वातावरणात वाढणाऱ्या या पिढीला तिची स्वतःची भाषा या चिन्हाने दिली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. इंटरनेट आणि सोशल मीडिया या दोन्हींचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे ऑनलाइन समुदाय (कम्युनिटीज). या समुदायांमध्ये संवादाची भाषा वेगाने उत्क्रांत होत आहे. त्यातही सोशल मीडिया ही असंपादित आणि मुक्त शब्दांची एक प्रयोगशाळा बनली असून तेथे आपण शब्दांना विविध रूपे धारण करताना तत्क्षणी (रिअल टाइम) पाहू शकतो. या रूपांतरात हॅशटॅगचा (#) मोठा वाटा आहे.

या हॅशटॅगची सुरुवात झाली २००७ साली आणि त्यांचा प्रसार झाला तो मुख्यत्वे ट्विटरमुळे. बघता-बघता त्यांनी लोकांना एवढे वेड लावले, की इंटरनेट वापरायचे म्हणजे हॅशटॅग वापरणे आवश्यक आहे असा समज रूढ झाला. सुरुवातीला फेसबुकवर हॅशटॅगना स्थान नव्हते, परंतु इतरांच्या स्पर्धेत मागे पडू नये यासाठी फेसबुकनेही एका टप्प्यावर त्यांना स्थान दिले. यावरून हॅशटॅगचे महत्त्व लक्षात यायला हरकत नाही. एक वेळ तर अशी आली, की हॅशटॅगच्या वापरामुळे इंग्रजी भाषा लयाला जाते की काय, अशी चिंता भाषातज्ज्ञांना वाटू लागली. (तशी ती त्यांना एसएमएसमधील लघुरूपांमुळेही वाटली होती; मात्र आता एसएमएसचा वापर इतका कमी झाला आहे, की इंग्रजीचे ते गंडांतर टळले असे या तज्ज्ञांनी जाहीर करायला हवे.)

पारंपरिक नजरेने पाहणाऱ्याला हा सगळा सावळागोंधळ वाटू शकतो; मात्र या गोंधळामागे एक सुव्यवस्थित योजना आहे. नेटवरील संभाषणे ही अॅाप्स आणि व्यासपीठाच्या (प्लॅटफॉर्म) आकारानुसार व नियमानुसार बदलतात. @ आणि # ही सोशल मीडियावरील आयुधे वापरण्याचे नियमही वेगळे. त्यानुसार आपली भाषाही त्याच ढंगाची बनत जाते. फक्त इंटरनेट आपण दररोज वापरत असल्यामुळे त्याच्यामुळे आपल्या जीवनात किती फरक पडतो, हे आपल्याला चटकन कळत नाही.

उदाहरणार्थ, आपल्या स्टेटसचे शब्द आणि व्याकरण, तसेच टिप्पण्या आणि प्रत्युत्तरांची पद्धतही संकेतस्थळांनुसार बदलत जाते. ट्विटरवरील टिप्पण्या वेगळ्या, फेसबुकवरील मनोगत वेगळे, व्हॉट्सअॅपवरील प्रत्युत्तरे वेगळी...! ट्विटरवर आपले वाक्य २८० अक्षरांतच बंदिस्त करावे लागते. मग वाक्याला आपोआपच नेमकेपणा येतो. फेसबुकवर ना शब्दांची मर्यादा ना अक्षरांची. मग तेथे अघळपघळपणा आपसूक येतो. इन्स्टाग्रामसारख्या व्यासपीठावर सगळेच शब्दांच्या पलीकडचे. तेथे हॅशटॅग एकट्याच्या बळावर पुरून उरते. म्हणूनच ‘इन्स्टा’चा सतत वापर करणाऱ्या व्यक्ती केवळ हॅशटॅगमध्येच बोलतात, असे गमतीने म्हटले जाते.

ग्रेटचेन मॅककुलोचया सर्वांचा धांडोळा ग्रेटचेन मॅककुलोच या लेखिकेने घेतला आहे. त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘बीकॉज इंटरनेट - अंडरस्टँडिंग दी न्यू रूल्स ऑफ लँग्वेज’ हे पुस्तक अशा ‘नेट’क्या भाषिक बदलांचे दस्तावेजीकरण आहे. इंटरनेटला आलेले महत्त्व आणि त्याच्यामुळे अनौपचारिक लेखनामध्ये झालेली प्रचंड वाढ यामुळे भाषेतील हे परिवर्तन शक्य झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मॅककुलोच या इंटरनेट भाषातज्ज्ञ आहेत. अशा प्रकारचे काही काम किंवा पद असू शकते, हेही अनेकांना माहिती असण्याची शक्यता नाही. त्यांचे हे पुस्तक शैक्षणिक आणि इंटरनेट संस्कृतींमधून वेचलेल्या नमुन्यांचा एक संग्रह आहे, असे म्हटले तरी चालेल. या पुस्तकात काही प्रमाणात इंटरनेटचा इतिहास आणि भाषाशास्त्राचा परिचय आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावरील टॅगचा वापर करून बोलीभाषेतील नवीन शब्द कसे निर्माण होत आहेत, याचा मासलाही दिला आहे. मुख्य म्हणजे तंत्रज्ञानामुळे मुले आळशी आणि मंदबुद्धी होत असल्याचे व्याकरणतज्ज्ञांचे जे मत आहे, ते खोडून काढण्यात या पुस्तकाने मोठे काम केले आहे. याच्या उलट, इंटरनेट आपल्याला लेखनात अधिक सर्जनशील करत असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे.

आपण शाळेच्या वर्गात शिकलेल्या औपचारिक आणि भावनाहीन भाषेला आभासी (व्हर्च्युअल) जगात काहीही स्थान नसेल, असे मॅककुलोच यांनी म्हटले आहे. उदाहरणार्थ, मोठ्याने ओरडण्याची किंवा किंचाळण्याची मुद्रा व्यक्त करण्यासाठी इंग्रजीत शब्दाची सर्व अक्षरे कॅपिटलमध्ये लिहिली जात आहेत. हावभावांसाठी इमोजींचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. शब्दांचे लघुरूप वापरून आपल्याला जे म्हणायचे आहे ते सौम्यपणे सांगितले जाते. उदाहरणार्थ, मराठी संकेतस्थळांवर ह. ह. पु. वा. म्हणजे ‘हसून हसून पुरेवाट’, लो. लो. हा. (लोळून लोळून हासलो), ह. ह. खा. प. (हसून हसून खाली पडलो) ही सर्रास दिसणारी रूपे आहेत. तसेच एखादा विषय जिव्हाळ्याचा असेल तर आपण तो शब्द दीर्घ करतो. उदा., ओऽ जोशीऽ. यात केवळ ती क्रिया करण्याचा संदेश नाही, तर त्या क्रियेमागची तीव्रताही तेवढ्याच ताकदीने समोर येते. 

या भाषेचा आपल्यावर किती परिणाम झाला आहे, याचा जरा विचार करा. मित्र (फ्रेंड), स्टेटस, वॉल, भिंत, पेज आणि प्रोफाइल यांसारखे शब्द आपण रोजच्या वापरात किती वापरतो याची एकदा उजळणी करा. अनफ्रेंड आणि सेल्फी यांसारखे शब्द इंग्रजी भाषकांनाही काही वर्षांपूर्वी अनोळखे होते. ते आपण किती सहजतेने स्वीकारले, ते पाहा. सोशल मीडिया संकेतस्थळांवरून इतर अनेक नवीन शब्दांनीही आपल्या जीवनात प्रवेश केला आहे. उदाहरणार्थ, ट्रोल. आता-आतापर्यंत स्कँडिनेव्हियन देशांमधील लोककथेतील पात्रासाठी असलेला हा शब्द आता आपण किती सहजपणे वापरतो? ऑनलाइन आक्षेपार्ह किंवा चिथावणीखोर टिप्पण्या देणारी व्यक्ती असाच आपण त्याचा अर्थ घेतो की नाही? ते जाऊ द्या, सोशल मीडियासाठी समाजमाध्यमे हा शब्द वापरू लागलो आहोत. जणू काही पारंपरिक माध्यमे समाजासाठी नाहीतच!

खरी गोष्ट अशी आहे, की भाषेच्या उत्क्रांतीत योगदान देणे हे सोशल मीडियामुळे कधी नव्हे एवढे सोपे झाले आहे. एखादा शब्द जनतेत रुळविण्यासाठी तुम्हाला आता मान्यताप्राप्त लेखक अखण्याची गरज नाही. ‘ऋषीणां वाचम् अर्थो अनुधावति’ या उक्तीप्रमाणे लोकप्रिय शब्दांना आपोआप अर्थ प्राप्त होत आहे. इंटरनेटच्याच भाषेत सांगायचे म्हणजे भाषा हा मानवतेचा सर्वांत नेत्रदीपक मुक्त-स्रोत प्रकल्प आहे. त्यात प्रत्येक व्यक्ती आपापली भर घालत आहे आणि इंटरनेट हे आपली भाषा पूर्वीपेक्षा वेगाने आणि कित्येक पट रंजक पद्धतीने बदलत आहे. हेच भाषेचे लोकशाहीकरण आहे. 

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search