Next
अशी दैवते येथ होणार केवी?
BOI
Sunday, March 03, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके आणि पु. ल. देशपांडे ही महाराष्ट्राची तीन दैवतेच. सध्या त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. नुकताच मराठी राजभाषा दिनही होऊन गेला आहे. त्या निमित्ताने, मराठीच्या या तीन दैवतांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
............
ज्ञानेश्वर महाराज १३व्या शतकात होऊन गेले. त्यांच्यासह चारी भावंडे संतपदाला जाऊन पोहोचली. विशेष गोष्ट म्हणजे त्याच काळात नामदेव, जनाबाई, गोरा कुंभार, नरहरी सोनार, विसोबा खेचर, सावता माळी इत्यादी संतांची मांदियाळी निर्माण झाली. इतके संत एकाच वेळी कसे अवतीर्ण झाले, याचे आश्चर्य वाटते; परंतु इतिहासात असे घडताना दिसते. 

आता विसाव्या शतकाकडे येऊ. सन १९१९मध्ये तीन थोर मराठी साहित्यिक जन्माला आले. पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके. यंदा त्यांची जन्मशताब्दी. विं. दा. करंदीकरांची जन्मशताब्दी गेल्याच वर्षी होऊन गेली. एकाच वेळी या सगळ्यांना पृथ्वीतलावर अवतार घ्यावा असं का वाटलं? साहित्यक्षेत्रातले हे संतश्रेष्ठच! महाराष्ट्रात सर्वत्र निरनिराळ्या प्रकारे त्यांची शताब्दी साजारी होत आहे. 

गदिमा  
‘गदिमां’ची प्रत्यक्ष भेट कधी झाली नाही. कार्यक्रमांमध्ये त्यांना पाहिलं होतं. १९७७ साली, वृत्तपत्रविद्येची पदवी घेतल्यानंतर मी दैनिक ‘विशाल सह्याद्री’मध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून दाखल झालो. शनिवारी (रविवारच्या) इतर पानांचेही काम पाहावे लागे. हेमंत देसाई यानेही माझ्याबरोबर बी. जे. केले होते. तो पुढे मुंबईला ‘मटा’त लागण्यापूर्वी काही दिवस ‘सह्याद्री’त काम करत होता. १४ डिसेंबरला गदिमा गेल्याची दु:खद वार्ता आली. हेमंतने त्यांच्या घरी जाऊन सगळी माहिती आणली आणि मी ती अंकात छापली. हा झाला त्यांच्या मृत्यपश्चातचा संबंध; परंतु त्यांची तोपर्यंतची सर्व कारकीर्द ज्ञात होती. ‘गीतरामायणा’चे तर आम्ही भक्तच होतो. रेडिओवर १९५५ साली त्याचे प्रसारण सुरू झाल्यापासून आम्ही ते अखंड दोन तपे ऐकत होतो. ‘गदिमां’च्या द्वारे हे अद्भुत कार्य घडले, तो दैवी संकेतच होता. त्याला अजरामर चाली लावल्या बाबूजींनी. हजार वर्षात असा दुर्मीळ योग आला नसेल!

‘गदिमां’नी भावगीते, भक्तिगीते, राष्टभक्तिपर गाणी, चित्रपटगीते, नृत्यनाट्यासाठी गीते अशी हजारो प्रासादिक गाणी लिहिली. रसिक मराठी श्रोत्यांच्या हृदयात त्यांना अढळ स्थान आहे. त्याशिवाय मराठी-हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी कथा/पटकथा/संवादही लिहिले (१५८ मराठी आणि २५ हिंदी). हिंदीत ‘दो आँखे’, ‘नवरंग’, ‘गूँज उठी शहनाई’, ‘तुफान और दिया’ यांचा समावेश आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. ‘जोगिया’ हा काव्यसंग्रह प्रसिद्धच आहे. त्यांना ‘पद्मश्री’सह अनेक मोठमोठे पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार म्हणून १० वर्षे त्यांनी काम केले. सन १९६९मध्ये ग्वाल्हेरला नाट्य संमेलनाचे, तर १९७१मध्ये यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी किती संस्थांवर आणि कायकाय कामे केली याला गणतीच नाही. एक व्यक्ती अनेक क्षेत्रांमध्ये किती अफाट कार्य करू शकते, याचे गदिमा हे उत्तम उदाहरण आहे. ब्रह्मचारी, रामजोशी, पुढचं पाऊल, जगाच्या पाठीवर या चित्रपटांत त्यांनी भूमिकाही केल्या. तरुण वयात ते काही काळ वि. स. खांडेकरांचे लेखनिक होते. अवघ्या ५८ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी शतकांचे काम केले. ‘विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ मराठी सारस्वत’ असे त्या महाकवीला आदराने संबोधले, तर ते सार्थ ठरेल. 

बाबूजी  
पुण्यातील टिळक रोडवर अलका टॉकीजवळ सुधीर फडक्यांची ‘चित्रकुटी’ नावाची इमारत आहे. तिथे ‘सोबत’ साप्ताहिकाचे कार्यालय होते. एकदा संपादक श्री. ग. वा. बेहेरे यांना भेटायला गेलो असताना, बाबूजी तिथे आले. आम्ही चहा घेतला. मी त्यांचा रिकामा कप घेण्यासाठी हात पुढे केला, तेव्हा त्यांनी नम्रपणे नकार देऊन स्वत: उठून तो बाजूला ठेवला. ही नम्रता आणि घरी आलेल्या लोकांचे आदरातिथ्य स्वत: करणे, ही त्यांची अंगभूत खासियत होती. त्यांची राष्ट्रभक्ती आणि सावरकरप्रेम अजोड होते. आपल्या भावमधुर संगीताने साऱ्या जगाला त्यांनी डोलायला लावले. त्यांच्या गाण्यांची गोडी अक्षय-अक्षर आहे. 

तारुण्य गाठेपर्यंत बाबूजींनी अत्यंत कठीण परिस्थितीशी सामना केला. त्या काळात शास्त्रीय संगीताची आपली बैठक मात्र भक्कम केली. त्यांच्या प्रत्येक गाण्यात शास्त्रीय संगीतच लडिवाळ होऊन प्रकट झालेले आहे. स्पष्ट शब्दोच्चार हे आणखी एक वैशिष्ट्य. कोणत्याही गाण्यात इकडचा सूर तिकडे करण्याची सोय नाही. गीतरामायण रेडिओवर सुरू झाले आणि त्याला अफाट लोकप्रियता लाभली. त्या आधीच बाबूजींनी सुंदर भावगीते आणि चित्रपट संगीत द्यायला सुरुवात केली होती. शेकडो मराठी-हिंदी चित्रपट त्यांच्या संगीतामुळे गाजले. ‘ज्योति कलश छलके’ हे ‘भाभी की चूडिया’मधील त्यांचे गाणे अजूनही दर दोन-चार दिवसांनी लागते. ‘पहली तारीख’मधले ‘दिन है सुहाना आज पहली तारीख है...’ हे गाणे पूर्वी रेडिओ सिलोनवर दर महिन्याच्या पहिल्या दिवशी वर्षानुवर्षे लागत असे. सध्या तसेच ते विविध भारतीवर नियमित लागते. लाखाची गोष्ट, जशास तसे, जगाच्या पाठीवर, पुढचं पाऊल, सुवासिनी इत्यादी चित्रपटांमधली गाणी आजही तितकीच ताजीतवानी आहेत. ती ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. तीच गोष्ट भावगीतांची. भक्तिगीते, राष्ट्रभक्तिपर गीते, लावण्या इत्यादी कोणत्याही विषयात गायक आणि संगीतकार म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. सावरकरांवर चित्रपट काढणे हे त्यांचे स्वप्न होते. अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी ते पूर्ण केले. पोर्तुगीजांच्या ताब्यातील ‘दादरा नगर हवेली’ मुक्तिसंग्रामात (१९७९) त्यांचा सक्रिय सहभाग होता.  

बाबूजींच्या साठीनिमित्त पुण्यात एक सत्कार समारंभ झाला. जुन्या काळातील बहुतेक सर्व भावगीत गायक त्यावेळी हजर होते. बबनराव नावडीकर, दत्ता वाळवेकर, कुमुदिनी पेडणेकर, गजानन वाटवे, मालती पांडे आणि बरेच. त्या समारंभाला हजर राहण्याचे भाग्य मला मिळाले. प्रत्येकाने आपापली गाजलेली गाणी म्हटली. ती एक पर्वणीच होती. बाबूजींनीसुद्धा एक लावणी सादर केली. त्यावेळी नावडीकर म्हणाले, ‘बाबूजींना शुभेच्छा देण्यासाठी मी मुद्दाम हजर राहिलो. कारण लवकरच माझीसुद्धा साठी आहे. तेव्हा असेच सगळे या...!’

गीतरामायण हा तर बाबूजींच्या कारकीर्दीचा कळस ठरला. गदिमा-बाबूजींच्या द्वारा प्रत्यक्ष श्रीरामांनी जणू ते कार्य घडवून आणले. १९५५नंतर सुरुवातीला गणपतीत वाड्यावाड्यांत त्याचे कार्यक्रम झाले. मग मोठमोठ्या मैदानांत भरगच्च गर्दीत ते होऊ लागले. त्याचा रौप्यमहोत्सव झाला, (बाबूजींच्या पश्चात) सुवर्णमहोत्सव झाला. अजूनही असंख्य गायक-गायिका ‘गीतरामायण’ सादर करत असतात. बाबूजींनी आपली संगीत-परंपरा तितक्याच तोलामोलाने पुढे चालवणारा श्रीधरसारखा सुपुत्र जगाला दिला. त्याच्या संगीतरचनाही अवीट गोडीच्या आहेत. त्याने बाबूजींकडूनही काही सुंदर गाणी करून घेतली. आपल्या अवीट/अमर संगीताद्वारे बाबूजी आजही आपल्यात आहेतच आणि पुढे शेकडो वर्षे तसेच राहतील. त्यांना सादर प्रणाम!

पुलं उर्फ भाई 
‘पुलं’ गेले तेव्हा आम्ही कुटुंबीय मथुरा-वृंदावनात होतो. रात्रीच्या बातम्यांत ती दु:खद वार्ता समजली. जर्जर देहाच्या बंधनातून आत्मा मुक्त झाला. वाईट तर वाटलंच. ‘पुलं’चं सगळं चरित्र चलतचित्राप्रमाणे मनात तरळून गेलं. 

‘तुझं आहे तुजपाशी’ नाटकाचे प्रयोग १९५६-५७ साली सुरू झाले,. त्यात दाजी भाटवडेकर काकाजींच्या भूमिकेत होते. ‘पुलं’नी सुद्धा त्यात श्यामचे काम केले होते. त्या वेळी आम्ही भरत नाट्यमंदिरासमोर राहत होतो. टिळक स्मारक, बालगंधर्व ही नाट्यगृहे त्या वेळी सुरू झाली नव्हती. मे महिन्याच्या सुटीत नाटके होत. आमच्या घराला लागूनच (९० अंशांत) एका बालक मंदिराचा हॉल होता. तिथे ‘तुझं आहे’च्या तालमी चालत. हॉलमध्ये स्वच्छतागृह नव्हते. त्यामुळे आमच्या घरात आम्ही त्यांची सोय केली होती. दाजी, भाई यांचा वावर त्या निमित्ताने आमच्याकडे होत असे. ‘लेखन आणि प्रासंगिक विनोदाचे पहिले संस्कार माझ्यावर त्यामुळे घडले,’ असे मी (गमतीनेच) म्हणतो. 

‘पुलं’ची सासुरवाडी रत्नागिरीची. अप्पासाहेब ठाकूर हे त्यांचे सासरे. त्यांनी घराजवळच एक ‘गीतामंदिर’ बांधले होते. तिथे माझ्या सासऱ्यांची (फडकेशास्त्री) गीतेवर प्रवचने होत. अप्पासाहेबांना कोणीही भेटायला गेले की ते म्हणत, ‘भगवंता, यांचं भलं कर!’ माझी बायको त्यांना मुलीसारखीच होती. त्यामुळे, आमचे लग्न झाल्यावर आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जात असू, तेव्हा ते मला ‘जावई’ म्हणायचे. म्हणजे बघा, पुलं माझे ‘साडू’ झाले! 
            
‘पुलं’नी किती क्षेत्रे गाजवली! एकपात्री, नाटके, पेटीवादन, गायन, संगीत, चित्रपट, समाजासाठी मोठे दातृत्व, आणीबाणीच्या काळातील भाषणे, चतुरस्र लेखन इत्यादी इत्यादी त्यांची गाजलेली पुस्तके सर्वांनाच ठाऊक आहेत. ती नावे देण्याची गरज नाही. ‘पुलं’च्या ‘कुंडली’चा सूक्ष्म अभ्यास असलेल्या मंगलाताई गोडबोले म्हणतात, त्याप्रमाणे भाईंनी व्यक्तिचित्रे आणि प्रवासवर्णन या साहित्यप्रकारांना प्रतिष्ठा मिळवून दिली. ‘सबकुछ पुलं’ असलेल्या ‘गुळाचा गणपती’ची लोकप्रियता अद्यापही कमी झालेली नाही. त्या चित्रपटाने ‘पुलं’ना काहीच आर्थिक लाभ झाला नाही, असे नुकतेच वाचनात आले आणि सखेदाश्चर्य वाटले. कथा-पटकथाकाराची अवस्था आजही फारशी वेगळी नाही. 

रेडिओ आणि दूरदर्शनवर त्यांनी निर्माता म्हणून बहुमोल काम केले. काही पुस्तकांचे अनुवादही केले. त्यांच्या अप्रतिम संगीताने, आपण आनंदाच्या झऱ्यात न्हाऊन निघतो. ‘देवबाप्पा’मधील ‘नाच रे मोरा’ हे आजवरचे सर्वोत्कृष्ट बालगीत ठरलेले आहे. काही गाण्यांचे नुसते उल्लेख पुरेसे ठरतील : इंद्रायणी काठी, इथेच टाका तंबू, कबिराचे विणतो शेले, शकुंतले सासरी जा मुली, तुझ्या मनात कुणीतरी लपलं गं, माझिया माहेरा जा, शब्दांवाचून कळले सारे, हसले मनी चांदणे.... इत्यादी. ‘पाखरा जा’, ‘नदी किनारी गं’, ‘चल गडे नौकेत बसू’सारखी त्यांनी स्वत: म्हटलेली गाणीसुद्धा लोकांना विलक्षण आवडली. नाटकाचे मानधन, एकपात्री प्रयोग, पुस्तकाची रॉयल्टी यांमधून मिळालेले धन (कोटीच्या घरात) त्यांनी बाबा आमट्यांचे आनंदवन, मुक्तांगण, बालवाचनालये, इत्यादी संस्थांसाठी मुक्तहस्ताने अर्पण केले. शेवटचा काही काळ जरी आजाराशी लढण्यात गेला, तरी पुलं एकूण दीर्घायुषी झाले. 

राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज यांनी लिहिलेल्या, मला खूप आवडणाऱ्या चार ओळींच्या आधारे मी ‘पुलं’ना इथे आदरांजली वाहतो. 

पेटीवादन नाट्य गायन भले रक्तामधे धन्यसे
संगीते अपुल्या करी मधुघटी सर्वांस तल्लीनसे
दाना त्या उपमा नसे पुरुष हा आदर्श केवी तसे
अव्यक्ता! वद बा पुन्हा जगति या होतील पुलऽ असे।

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(गदिमा, पुलं आणि बाबूजी यांच्याबद्दलच्या कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 

(‘पुलं’च्या जन्मशताब्दीनिमित्त ‘बुकगंगा डॉट कॉम’ने त्यांची सर्व पुस्तके १५ टक्के सवलतीत, तर सर्व ई-बुक्स २० टक्के सवलतीत उपलब्ध केली आहेत. खरेदीसाठी येथे क्लिक करा. ‘गदिमां’ची पुस्तके सवलतीत घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. सुधीर फडके यांचे आत्मचरित्र, तसेच त्यांच्याबद्दलची व त्यांच्या गाण्यांबद्दलची पुस्तके घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 171 Days ago
Keeping up a tradition -- there does not seem to be a formula .
0
0

Select Language
Share Link
 
Search