Next
अखेर सुरुवात झाली...
BOI
Tuesday, April 10, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this article:

'मुक्तांगण'मध्ये अशोकजी आवाजाच्या सिद्धांताचे प्रात्यक्षिक दाखवताना

शाळेची आठवी, नववी व दहावीतील सर्व मुले हॉलमध्ये बसली होती. चुंबकाचे गुणधर्म शिकवायला सुरुवात केली. प्रत्येकाला ग्रुपमध्ये चुंबक हाताळायला दिले होते. त्यांना समान ध्रुव एकमेकांजवळ आणायला सांगितले, पण ते ध्रुव जवळ येत नव्हते. त्यांच्याच प्रयत्नाने त्यांना हसू येत होते... ईशान्य भारतात कार्य केलेल्या एका स्वच्छंदी कार्यकर्त्याचे अनुभव कथन करणाऱ्या ‘ईशान्यवाटेचा वारकरी’या लेखमालिकेचा हा दुसरा भाग..
.......................................
अरविंद गुप्ता 'मुक्तांगण'मधील कार्याची माहिती सांगतानाईशान्य भारताचा विचार मनात सुरू असतानाच पुणे विद्यापीठातील आयुकामधील मुक्तांगण व अरविंद गुप्ता यांची माहिती मिळाली. गुप्ता हे टाकाऊ वस्तूंपासून वैज्ञानिक खेळणी तयार करण्यासाठी व त्याद्वारे विज्ञान सोपे करून शिकवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी या विषयांवर भरपूर पुस्तके लिहिली आहेत. मी मुक्तांगणमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली व माझे आसामला जाण्याचे प्रयोजन सांगितले. त्यांना माझे विचार पटले व त्यांनी मला मुक्तांगणमध्ये विज्ञान खेळणी तयार करण्याचे शिकवले.

डॉ. म्हैसकर कागदाच्या टोप्या बनवून दाखवतानात्यांचे सहकारी डॉ. मृदुला व अशोक यांनी खूप छान सहकार्य केले. मार्गदर्शनही केले. तिथे वर्तमानपत्रापासून वेगवेगळ्या आकृत्या, कागदाची कोंडी, पातळ पुठ्ठ्यापासूनच्या वस्तू, तांब्याची तार व चुंबक वापरून विद्युत निर्माण करणारा संच, बॅटरी सेलचा वापर करून मोटारीचा सिद्धांत असे अनेक प्रयोग शिकवले. या सर्वांचा मला आसाममध्ये भरपूर फायदा झाला. तिथेच मला थर्ड वेव्ह कंपनीचे डाके हे शाळेत शिकवताना उपयोगी पडणारे प्रयोगांचे संच तयार करतात, असे कळाले. पुण्यात अलका टॉकीजजवळ असलेल्या त्यांच्या कुतूहल या दुकानांत वेगवेगळ्या विज्ञान प्रयोगांचे संच पाहून मला जणू हर्षवायूच झाला होता. माझ्या कार्याची दिशा आता पक्की झाली होती. मुक्तांगणमधील शाळांमध्ये विज्ञानाचे प्रयोग दाखविण्याचे निश्चित केले. असे अनेक संच घेऊन मी गुवाहाटीला मुक्ताकडे गेलो. एव्हाना २००७ साल सुरु झाले होते.

मे २००७च्या २ तारखेला मी गुवाहाटीला पोहोचलो. मुक्तापण गुवाहाटीत स्थायिक झाली होती. तिचे थोरले दीर डॉ. विभाषचंद्र दास पुरकायस्थ हे तेथील पांडू कॉलेजचे प्राचार्य होते. सेवानिवृत्तीनंतर ते पुन्हा तेथील जीझासा कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम करत होते. त्यांना भेटून मी माझा उद्देश सांगितला. त्यांना तो इतका आवडला, की त्यांनी लगेचच त्यांच्या कॉलेजमध्ये त्याची प्रात्यक्षिके दाखवायला सांगितले. दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या कॉलेजमध्ये गेलो. या क्षेत्रात मी पहिलटकरीण होतो, म्हणून खूप धडधडत होते. पण एक एक प्रयोग करून दाखवताना त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून माझा आत्मविश्वास दुणावला व निर्भयपणे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विज्ञान इतक्या सोप्या पद्धतीने शिकवता येऊ शकते, यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. हे सर्व प्रयोग ते पहिल्यांदाच पाहत होते. तुम्ही कुठे शिकलात, कसे शिकलात, आम्हाला पुन्हा शिकवा, असा त्यांचा प्रतिसाद पाहून मी आधी देवाचे आभार मानले. विभाषदांनी माझे खूप अभिनंदन केले व दुसऱ्या दिवशी तेथील विद्याभारती संस्थेच्या शाळेत हेच प्रयोग दाखवायला सांगितले. 

या शाळेची आठवी, नववी व दहावीतील सर्व मुले हॉलमध्ये बसली होती. चुंबकाचे गुणधर्म शिकवायला सुरुवात केली. प्रत्येकाला ग्रुपमध्ये चुंबक हाताळायला दिले होते. त्यांना समान ध्रुव एकमेकांजवळ आणायला सांगितले, पण ते ध्रुव जवळ येत नव्हते. त्यांच्याच प्रयत्नाने त्यांना हसू येत होते. त्यातील चुंबकाला गती दिल्यावर छोटा दिवा लुकलुकायला लागला. पण शॉक बसायच्या भितीने ते संयंत्र खाली फेकून देत होते. पुन्हा सगळे हसायला लागले. बघता बघता दोन तास कसे निघून गेले कळालेच नाही. त्यांच्या अध्यापकवर्गाने माझे खूप अभिनंदन केले. त्यांच्यापैकी कोणीही इतके सोपे प्रयोग पहिले नव्हते. 

आता माझा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता. हाफलांगमधील शाळेतही आपण चांगले प्रदर्शन करू शकू, याची खात्री वाटू लागली. दुसऱ्या दिवशी मी हाफलांगला जाण्यासाठी बसमध्ये बसलो. एरवी हा १२ तासांचा प्रवास होता. संध्याकाळी सहा वाजता गुवाहाटीहून निघालो की हाफलांगला सकाळी आठपर्यंत पोहोचत असे, पण पावसाळा सुरू झाला होता. त्यामुळे नेहमीचा रस्ता बंद झाला होता. म्हणून गुवाहाटी-तेजपूर-हाफलांग असे यावे लागले. सर्वत्र हिरवीगार झाडे, बांबूची जंगले आणि डोंगरातून वळण घेत जाणारा रस्ता. या वेळेस थोडे वेगळेपण जाणवत होते. डोंगरमाथ्यावर भरपूर जंगलतोड दिसत होती. बरेच डोंगर बोडके दिसू लागले होते. यासंबंधी डॉ. अजयकडे चौकशी केल्यावर कळाले, की ठिकठिकाणी वस्ती वाढत असल्यामुळे शेतीसाठी म्हणून झाडे काढली जात आहेत. तसेच बांबूचे आयुष्य साधारण ३० वर्षे असते. त्यांनतर बांबूला फुले येतात व नंतर बांबू भरतो. मग ही फुले अदलून-बदलून वेगवेगळ्या ठिकाणी येतात. यंदा निसर्गाचा कोप म्हणा किंवा आणखी काही, यंदा सगळीकडे बांबूला एकाच वेळी फुले आली होती. म्हणून सगळे बांबू काढून टाकले जात आहेत. 

ईशान्य भागात आदिवासींच्या जीवनात बांबू हा अविभाज्य भाग आहे. त्यांचे जीवन बांबूवर आधारित आहे. आता नवीन बांबू यायला पुढची पाच-दहा वर्षं लागणार. मग यांनी काय करायचे..? निसर्गाचे हे लहरी रूप मी पहिल्यांदाच पाहत होतो. पूर, भूकंप, दरडी कोसळणे यामुळे जनजीवनावर होणारे दुष्परिणाम माहित आहे, पण हे असे होणारे दुष्परिणाम पहिल्यांदाच पाहत होतो. पर्यावरणाच्या ऱ्हासाची ही एक नांदी होती. हाफलांगसुद्धा हळूहळू महाबळेश्वर होण्याच्या मार्गावर लागल्याचे पाहून वाईट वाटले. यावेळी माझी पत्नी प्रेमालाही माझ्याबरोबर हाफलांगला आणले होते. 

हॉस्टेलचा सगळा रस्ता मातीचा होता. पाण्याच्या ओहोळांनी  व चिखलामुळे कसेबसे स्वतःला सावरत हॉस्टेलवर आलो. तेथे चतुर्थी विश्वास म्हणून सुपरवायझर होत्या. एकूण २३ मुली होत्या. सर्वात लहान पाच वर्षांची तर मोठी १४ वर्षांची होती. सर्वांना हॉलमध्ये गोळा करून कागदाच्या भिंगऱ्या करायला शिकवले. भिंगऱ्या गरगर फिरताना पाहून सर्वांच्या चेहऱ्यावरचे लाजरे बुजरे हसणे गमतीशीर वाटत होते. सर्वांशीच मोडक्या-तोडक्या हिंदीतून संवाद साधत होतो. लहान मुली प्रॉयूमध्ये तर मोठ्या मुली त्यांच्या पारंपरिक ‘मेखला’ नेसल्या होत्या. स्वयंपाक करायची जबाबदारी पाळीपाळीने दोघींवर असते. जेवण म्हणजे फक्त भात आणि भाजी. पण जर भाजी कमी पडली, तर सर्वजण भातात पाणी व मीठ घालून खातात. 

संध्याकाळी सहा वाजता सायंप्रार्थनेची वेळ असते. सहा ते सात प्रार्थना, नंतर दहा वाजेपर्यंत अभ्यास. तिथे कायम लोड शेडिंग असते. त्यातून पावर इतके कमी, की १०० वॅटचा बल्ब हा दिव्याप्रमाणे प्रकाश देतो. बऱ्याच वेळेला संपूर्ण शट डाऊन असते. अशा वेळी मुली कंदील किंवा मेणबत्तीच्या भोवती बसून अभ्यास करतात. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा हॉस्टेलवर आलो. मुलींना मुक्तांगणमध्ये शिकवलेले दोरावर चालणारे फुलपाखरुचे खेळणे नेले होते. ते एका खिळ्यावर अडकवून एकेकीला बोलावून खेळण्याचा दोरा मागे-पुढे ओढून फुलपाखरू वर नेण्याचे शिकवले. नुसता दोरा खालीवर करून फुलपाखरू वर चढत जाताना पाहून त्यांच्या चेहऱ्यावरील आश्चर्य भाव बघण्यासारखे होते. हे खेळणे खेळायला आधी सर्वजण संकोच करत होते. नंतर हळूहळू त्यांची भीड चेपत गेली. मग त्यांच्याकडून कागदाचे पक्षी बनवून घेतले. मधेच मी थोडा बाहेर जाऊन या मुलींची खेळण्याची मजा बघत असे... 
 (क्रमशः)
- अरुण सरस्वते, दापोडी, पुणे
मोबाइल : ९४२३० ०२२१५ 

(‘ईशान्यवाटेचा वारकरी’ ही लेखमालिका दर मंगळवारी आणि शुक्रवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/cej71c या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 202 Days ago
I hope , all the articles will be put together , and published in the form of a book , at affordable price. That will encourage tourism .
0
0
Ramchandra Deshpande About
Very good communication
0
1

Select Language
Share Link
 
Search