Next
सामान्य नागरिकांनी योद्ध्याची कामगिरी बजावावी
अपारंपरिक युद्धात विजय मिळविण्यासाठी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे आवाहन
BOI
Friday, March 15, 2019 | 06:10 PM
15 0 0
Share this article:

ब्रिगेडियर हेमंत महाजन

रत्नागिरी :
‘दहशतवादाविरोधातील लढाईत आपला देश चांगली कामगिरी करतो आहे. त्यामुळे प्रत्यक्ष दहशतवाद्यांचे प्रमाण कमी झाले आहे; मात्र दहशतवादाचे स्वरूप बदलले असून, लोकांची मने बदलणे, देशविरोधी विचार पसरवणे यांसारख्या माध्यमातून युद्धच केले जात आहे. या युद्धात सामान्य नागरिकच योद्ध्याची भूमिका बजावू शकतात. समाजात वावरताना सतर्कता बाळगणे, नीतिमूल्ये, नियम यांचे पालन करणे, करचुकवेगिरी न करणे आणि सोशल मीडियावर देशविरोधी मेसेज/व्हिडिओ अजिबात फॉरवर्ड न करणे अशा अनेक गोष्टी नागरिकांनी केल्यास हा लढा सुकर होईल,’ असे प्रतिपादन (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले. 

ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचा सत्कार करताना अॅड. दीपक पटवर्धन

‘पुलवामा हल्ला आणि बालाकोट कारवाईनंतर...’ या विषयावर रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे व्याख्यान १३ मार्च रोजी आयोजित केले होते. सुमारे पावणेदोन तास चाललेल्या या व्याख्यानात महाजन यांनी बालाकोट येथील हवाई हल्ल्याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच दहशतवादाचे बदलते स्वरूप, दहशतवादाविरोधात भारत करत असलेली कार्यवाही आणि सामान्य नागरिकांची भूमिका या विषयावर आपली मते मांडली आणि दहशतवादाचे अनेक पैलू उलगडले. व्याख्यानाच्या सुरुवातीला नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले आणि महाजन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाजन यांनी स्वतः लिहिलेली अनेक पुस्तके नगर वाचनालयाला भेट दिली.

ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची स्वतःची पुस्तके नगर वाचनालयाला भेट दिली.

‘पुलवामा येथे ‘सीआरपीएफ’च्या ताफ्यावर झालेला भ्याड हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोट, चकोटीसह एकूण तीन दहशतवादी प्रशिक्षण तळांवर नियोजनबद्ध हल्ले केले. त्यामध्ये शूर जवानांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांचे, तसेच हवाईदलप्रमुख एअर मार्शल बी. एस. धनोआ यांचे त्याबद्दल कौतुक आहे. त्याचबरोबर असा निर्णय घेणाऱ्या कणखर राजकीय नेतृत्वाचेही कौतुक नक्कीच करायला हवे. कारण जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत साऱ्यांनीच पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले; मात्र त्यात यश आले नाही. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तराचा निर्णय घेण्याचे धैर्य दाखविले ते उत्तम झाले,’ असे महाजन म्हणाले. ‘देशाकडे असलेली शस्त्रे ही केवळ २६ जानेवारीच्या पथसंचलनावेळी दाखविण्यासाठी नाहीत, तर योग्य वेळ आल्यानंतर वापरण्यासाठी आहेत,’ असेही ते म्हणाले. 

‘भारताशी पारंपरिक युद्धांमध्ये झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले. त्यामुळे पाकिस्तानने अपारंपरिक पद्धतीने युद्धाला सुरुवात केली. त्यामध्ये दहशतवादी घुसवण्यासह देशातील लोकांच्या मनामध्ये देशविरोधी वातारण तयार करण्याच्या प्रयत्नांचाही समावेश आहे. काश्मीर १९८०पासून अशांत आहे. तेव्हापासून तेथे दहशतवादविरोधी पथक आणि लष्कर काम करते आहे. तेव्हा प्रत्यक्ष ताबारेषेवरून (एलओसी) वर्षाला चार-पाच हजार दहशतवादी घुसखोरी करायचे. आता कडक सुरक्षाव्यवस्थेमुळे ते प्रमाण खूपच कमी झाले आहे. ९५ टक्के दहशतवादी ‘एलओसी’वरच मारले जातात; मात्र असे असले तरीही बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार या देशांच्या सीमांवरून, तसेच समुद्रमार्गाने घुसखोरी होऊ लागली आहे. त्यांच्या माध्यमातून हल्ले करून भारतातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणूनच नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे. प्रत्येकाने सैन्यात जाण्याची गरज नाही; पण आपण आहोत त्या ठिकाणी राहून देशभक्ती करू शकतो,’ असे महाजन म्हणाले. 

‘पाकिस्तानमध्ये दहशतवाद हा सर्वांत मोठा उद्योगधंदा आहे. पाकची आयएसआय ही गुप्तहेर संघटना भारतात कारवाया करून भ्याड हल्ले करते. काही पैशांसाठी विकल्या जाणाऱ्या लोकांमुळे त्यांना हल्ले करणे सोपे जाते. हे रोखण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. १९८०पासून आजपर्यंत ३८ हजारांहून अधिक दहशतवादी मारले गेले असून, १० हजारांहून अधिक जवानांनी बलिदान दिले आहे. तरीही अजून दहशतवाद संपलेला नाही आणि तो इतक्यात संपणारही नाही. त्यामुळेच नागरिकांनी आपापल्या पातळीवर जागरूक राहून देशसेवेत हातभार लावावा,’ असे महाजन यांनी सांगितले. ‘बालाकोट कारवाईचे सर्व पुरावे आंतरराष्ट्रीय पातळीवर देण्यात आले आहेत. त्यामुळे पुरावे नाहीत, असे केवळ राजकारण केले जात आहे. देशातील काही तज्ज्ञांनाही विकत घेतले जाते. हे लोक पैशांसाठी देशविरोधी भूमिका टीव्हीवर, सोशल मीडियावर मांडतात. तसेच अगदी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्येही देशविरोधी लेख लिहितात. हे दुर्दैवी आहे. हे वैचारिक दहशतवादीच आहेत. त्यांचे हे विचार सोशल मीडियातून फॉरवर्ड केले जातात. तसेच देशविरोधी व्हिडिओही व्हायरल केले जातात. असे शेअरिंग नागरिकांनी केले नाही, तर खूप उपयोग होईल. अनेक लोक करही भरत नाहीत आणि देशप्रेमाच्या गप्पा मारतात. देशप्रेम केवळ एक दिवस फक्त मेणबत्ती जाळून नव्हे, तर तर ३६५ दिवस दाखवले पाहिजे आणि ते आपल्या दैनंदिन वागण्यातून होऊ शकते,’ असे मत महाजन यांनी मांडले. 

‘चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा आहे. त्यामुळे चीनच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी चिनी बनावटीचे स्मार्टफोन न घेणे, चिनी फटाके न वाजवणे, चिनी माळा आणि दिवे खरेदी न करणे अशा गोष्टी सामान्य माणसांनी करायला हव्यात. असंख्य दर्जेदार भारतीय कंपन्यांची उत्पादने विकत घेऊन त्यांना मोठे करायला हवे. नागरिकांनी असे आर्थिक निर्बंध घातले, तर परकीय आर्थिक दहशतवादावर विजय मिळवता येईल,’ असे आवाहन महाजन यांनी केले. 

सामान्य नागरिकांनी हे करावे..
सामान्य नागरिकांनी काय करायला हवे, अशा अनेक साध्या, पण महत्त्वाच्या गोष्टींची महाजन यांनी उजळणी केली. ‘राष्ट्रीय एकात्मता टिकवणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. झुंडशाही न करणे, बस, रेल्वेसारख्या सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान न करणे, आपापले काम व्यवस्थित करणे ही देशभक्ती. रस्त्यावरील सिग्नल पाळण्यापासून रस्त्यावर न थुंकण्यापर्यंतची प्रत्येक गोष्ट म्हणजे देशभक्ती. स्त्रियांचा आदर करणे, भ्रष्टाचाराला उत्तेजन न देणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, करचुकवेगिरी न करणे या गोष्टी अत्यंत  महत्त्वाच्या आहेत आणि सामान्य माणूस त्या नक्की करू शकतो,’ असे महाजन यांनी कळकळीने सांगितले. प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. 

(ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या व्याख्यानाचा काही अंश पाहा सोबतच्या व्हिडिओत...)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search