Next
‘द शायनिंग’ : भय आणि थराराची विशेष अनुभूती
BOI
Tuesday, November 27, 2018 | 06:45 AM
15 1 0
Share this article:


शॉट लावायची पद्धत, कॅमेऱ्याची हालचाल, संगीताचा परिणामकारक वापर, उत्तम अभिनय, दृश्यमिसळ करायच्या पद्धती, प्रभावी संवाद, संकलन, पटकथा, दिग्दर्शन, विशेष दृश्य परिणाम, रंगभूषा, इत्यादी सर्वच आघाड्यांवर ‘द-शायनिंग’ हा ८०च्या दशकातला हॉलिवूडपट जबरदस्त ठरतो. स्टॅनली क्युब्रिक या अवलिया दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अतिशय नेमका परिणाम साधतो... ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘द शायनिंग’ या इंग्रजी भयपटाबद्दल....
................................
पाण्याच्या पृष्ठभागावरून दृश्य टिपत कॅमेरा हळूहळू निघतो. एकदम वेग घेतो, वर जातो आणि मग हवाई दृष्य दिसू लागतं. डोळ्याचं पारणं फेडून टाकणारा सुंदर निसर्ग. डोंगर, दरी आणि त्या दरीच्या कडेने असलेल्या रस्त्यावरून वेगाने जाणारी एक कार. कॅमेरा कारसमवेत जात राहतो. दूर दूर. खूप दूर. विरळ लोकवस्ती असलेल्या प्रदेशातील एका हॉटेलकडे. जॅकचा इंटरव्ह्यू सुरू असताना त्याच्या बायको आणि मुलाचं संभाषण. जॅकच्या आतच वास्तव्यास असणारा टोनी, त्याला सांगत असतो का काहीतरी? अशुभाचा संकेत देणारं असं...

हिवाळ्यात सुमारे पाच महिन्यांच्या अवधीकरिता, कोणताही मनुष्यप्राणी आसपास नसताना एका भव्य हॉटेलमध्ये देखरेख करण्यासाठी जॅक, त्याची बायको आणि त्याचा छोटा मुलगा या हॉटेलमध्ये राहणार असतात. नोकरी स्वीकारण्यापूर्वी तिथला मॅनेजर, पूर्वी त्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेविषयी जॅकला माहिती देतो. जॅक ती नोकरी स्वीकारतो आणि कुटुंब कबिल्यासह ‘हॉटेल ओव्हरलूक’मध्ये येऊन दाखल होतो. तिथपासून सुरू होतो एक थरारक खेळ! ‘स्टीफन किंग’लिखित ‘द शायनिंग’ नावाच्या पुस्तकावर आधारित असलेल्या, याच नावाच्या सिनेमाची ही सुरुवात. स्टॅनली क्युब्रिक या एका जिनिअसनं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १९८०मध्ये प्रदर्शित झाला. भयपट प्रकारातील ऑल टाइम क्लासिक!

हॉटेलचा शेफ डिक हलोरान, जॅकच्या कुटुंबाला हॉटेलमधल्या सगळ्या खोल्या, स्वयंपाकघर, बॉयलर रूम, संदेशवहन कक्ष, कोल्ड स्टोरेज इत्यादी गोष्टींची माहिती करून देतो. हे करत असताना जॅकच्या छोट्या मुलाला, ‘डॅनी’ला एक विशिष्ट शक्ती अवगत असल्याचं शेफ हलोरानला लक्षात येतं. याविषयी त्याचं डॅनीशी बोलणंही होतं. नंतर थोड्याच वेळात हॉटेलचा उरलासुरला स्टाफही आपापल्या गावी निघून जातो आणि आकारानं प्रचंड मोठ्या असणाऱ्या त्या हॉटेलात फक्त जॅक, त्याची बायको आणि त्याचा मुलगा, अशा तीनच व्यक्ती उरतात. अतिंद्रीय शक्तीमुळे डॅनीला, पूर्वी घडून गेलेल्या काही घटना आत्ता घडत असल्यासारख्या दिसतात. अशुभाची कल्पना आधीच येते. आपल्या अतीसूक्ष्म संवेदन टिपण्याच्या विशेष शक्तीमुळे डॅनीला हॉटेलमध्ये पूर्वी घडलेल्या घटनांसंदर्भात असणारी काही भयानक दृश्ये दिसू लागतात, तर दुसरीकडे जॅकच्या वागण्या-बोलण्यात आमूलाग्र बदल दिसायला सुरुवात होते. बायको आणि मुलाशी असणारं त्याचं वागणं बदलत जातं. 

सौम्य आणि हसतमुख असणारा जॅक, जरासा भयंकर भासू लागतो. तो खेकसतो, ओरडतो, किरकोळ कारणांवरून भांडू लागतो. त्याचं हे असं वागणं त्याच्या बायको आणि मुलासाठी आश्चर्यकारक असतं. हिवाळा असल्यामुळे टेलिफोन लाइन्स खराब झालेल्या असतात. आधार असतो, तो फक्त रेडियोचा! पूर्वी घडून गेलेली एखादी गोष्ट आपला माग ठेवून जाते, या हलोराननं म्हटलेल्या वाक्याचा डॅनीला वारंवार प्रत्यय येऊ लागतो. बऱ्याच काळाकरिता, एखाद्या वास्तूच्या आत अडकून पडलेल्या व्यक्तीला किंवा व्यक्तींच्या समूहाला बेचैनी, चिडचिडेपणा, एकमेकांचा राग येणं, संशय येणं, संताप होणं इत्यादी लक्षणं जाणवू शकतात. या प्रकारच्या मानसिक आजाराला ‘केबिन फीवर’ असं म्हटलं जातं. ‘हॉटेल ओव्हरलूक’मध्ये पूर्वी वास्तव्यास असणाऱ्या मॅनेजरने त्याच्या बायकोला आणि जुळ्या मुलींना कुऱ्हाडीने मारून टाकलेलं असतं. पूर्वी घडलेली ही भीषण दुर्घटना म्हणजे, केबिन फीवर या आजाराचाच अतिगंभीर परिणाम असावा, असं तिथल्या व्यवस्थापन मंडळाचं म्हणणं असतं. आता तशाच वातावरणात, त्याच वास्तूत वास्तव्याला असलेल्या, जॅक आणि त्याच्या कुटुंबाबाबत ती दुर्घटना पुन्हा घडणार का? अशी चिंता सुरुवातीपासूनच हॉटेल-व्यवस्थापन मंडळाला आणि प्रेक्षकांना भेडसावत राहते. 

स्टॅनली क्युब्रिकनं त्याच्या खास शैलीत हा सिनेमा बनवला आहे. काळाच्या सतत पुढे असणारा त्याचा विचार, संगीताचा अतिशय विचारपूर्वक वापर करण्याची त्याची हातोटी, अनोख्या पद्धतीनं केलेला कॅमेऱ्याचा वापर, भव्य सेट्स, घट्ट वीण असणारं संकलन या सर्व गोष्टी वाखाणण्याजोग्या आहेत. संगीताची इतकी चांगली जाण असणारे दिग्दर्शक विरळच असतात. ‘द शायनिंग’चं संगीत, टिपिकल भयपट किंवा भुतांच्या चित्रपटांमध्ये असतं तसं उगीच दचकवणारं, भेडसावणारं नाही. ते कमीत कमी जागी येतं आणि अतिशय नेमका परिणाम साधतं. प्रेक्षकांच्या मानसिकतेचा विचार करून, दृश्याला सुयोग्य साथ देईल अशा पद्धतीनं हे संगीत वापरलं गेलं आहे. कॅमेरा ज्या पद्धतीनं फिरतो ते थक्क करणारं आहे. १९८०मध्ये, तंत्र फारसं प्रगत नसताना, इतकं सफाईदार आणि अनोख्या पद्धतीनं केलेलं छायांकन पाहून आश्चर्य वाटतं. ‘भय’ या संकल्पनेचा प्रभावी वापर या चित्रपटात केला गेला आहे. यातली काही दृश्ये अचानक अंगावर येणारी असली, तरीही ती मोजक्याच ठिकाणी येतात. अशा दृश्यांच्या वेळेस खरीखुरी भीती वाटते. प्रेक्षकाला उगीचच संगीताच्या साहाय्यानं दचकवणं, हा प्रकार इथे घडत नाही. प्रेक्षक इथे मनातून घाबरतो. सुन्न होतो. पुढे काय होईल या काळजीनं ग्रस्त होतो. पूर्णपणे वेगळा सेटअप असूनही त्या घटनांशी, त्या पात्रांशी रिलेट करू पाहतो. 

जॅक टॉरेन्सची मनस्थिती दिवसागणिक अधिकाधिक विक्षिप्त होऊ लागते. छोट्या डॅनीलाही ते जाणवू लागतं. त्याच्या भयावह रूपाची अनुभूती वेंडीला, त्याच्या बायकोलाही येऊ लागते. पूर्वी होऊन गेलेल्या दुर्घटनेतल्या व्यक्ती जॅक आणि डॅनीला दिसू लागतात. संपूर्ण हॉटेलमधे जॅक, वेंडी आणि डॅनी यांच्याखेरीज इतर कुणीही वास्तव्यास नसताना, पूर्वी तिथे अस्तित्वात असणाऱ्या व्यक्तींचे भास सतत होण्यामुळे, जॅकची आणि डॅनीची मनःस्थिती ढासळू लागते. आपला नवराच आपल्या आणि मुलाच्या जीवावर उठल्याचं पाहून वेंडीचा धीर खचू लागतो. मनुष्यवस्ती पासून अनेक मैल लांब असणाऱ्या त्या भुताळी हॉटेलमध्ये बाहेरून कुणाची मदत येणं, हे जवळपास अशक्य असतं. जॅक आणि डॅनीला होणारे भास कितपत भयंकर रूप धारण करतात? ते निव्वळ भास असतात की तिथं खरोखरच भुतांचा संचार असतो? शेवटी नेमकं काय होतं? जॅक करत असलेलं लेखनाचं काम पूर्ण होतं का? वेंडी जॅकच्या विकृत रूपासमोर तग धरते का? डॅनीच्या जिवाला जॅकपासून धोका पोहोचतो का, इत्यादी गोष्टी प्रत्यक्ष पडद्यावरच पाहण्यासारख्या आहेत. 

संथपणे सुरू झालेल्या आणि तितक्याच संथ वेगाने पुढे सरकणाऱ्या या सिनेमाचा क्लायमॅक्स आणि शेवट अंगावर येणारे आहेत. बरेचसे प्रसंग विकृत आहेत. यात हिंसाचार आहे. थोडी-फार नग्नता आहे; पण या प्रकारचे प्रसंग चित्रित करायला, अपेक्षित परिणाम साधायला प्रचंड स्किल लागतं. प्रसंग बटबटीत किंवा असह्य न होता, प्रेक्षकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणं, त्याचा त्यातला रस टिकवून ठेवणं हे मोठं आव्हान असतं. हे आव्हान स्टॅनली क्युब्रिक नावाचा मास्टर क्राफ्ट्समन अत्यंत हुशारीने पेलतो आणि ‘द शायनिंग’ नावाचा, अंगावर काटे फुलवणारा खेळ मोठ्या रंजकपणे उभा करतो. शॉट लावायची पद्धत, कॅमेऱ्याची हालचाल, संगीताचा परिणामकारक वापर, उत्तम अभिनय, दृश्यमिसळ करायच्या पद्धती, प्रभावी संवाद, संकलन, पटकथा, दिग्दर्शन, विशेष दृश्य परिणाम, रंगभूषा, इत्यादी सर्वच आघाड्यांवर ‘द-शायनिंग’ जबरदस्त ठरतो. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज सुमारे ३८ वर्षं उलटली असली, तरी अद्याप याचं गारूड चित्रपट चाहत्यांच्या डोक्यावरून उतरलेलं नाही. हॉरर जॉनरचे चाहते असाल, चित्रपट या माध्यमाकडे अभ्यासू दृष्टीने पाहत असाल, तर ‘द-शायनिंग’ चुकवू नका. 

(टीप : हा चित्रपट प्रौढांकरिता आहे. यात हिंसाचार, नग्नता आणि विकृत प्रकार असल्याने लहान मुलांसमवेत तो पाहू नये.) 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)  
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Ravindra a mehendale About 263 Days ago
Very nice review.
0
0

Select Language
Share Link
 
Search