Next
जनसेवा ग्रंथालयाच्या वर्धापनदिनी कवितांचा पाऊस!
काव्यसंमेलनाला उत्तम प्रतिसाद; काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
BOI
Wednesday, September 18, 2019 | 05:12 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालयाच्या ३५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या काव्यसंमेलनाद्वारे विविधरंगी कवितांचा जणू पाऊसच रसिकांना अनुभवायला मिळाला. रत्नागिरीतील निमंत्रित आणि जिल्हाभरातील नवोदित कवींनी या संमेलनात रंग भरला. कविवर्य कृ. ब. निकुंब यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्यांनाही या कार्यक्रमात गौरवण्यात आले.कधी श्रावणधारा, तर कधी प्रियकर-प्रेयसीचे हितगूज, तर कधी चिंतन करायला लावणाऱ्या... अशा अनेकविध रूपांतील कविता या संमेलनात सादर झाल्या. काव्यलेखन स्पर्धेतील विजेते कवी, सहभागी उल्लेखनीय कवी आणि निमंत्रित कवी या संमेलनात सहभागी झाले होते. १५ सप्टेंबरला झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाभरातून अनेक कवींनी हजेरी लावली होती. निमंत्रित कवी म्हणून प्रख्यात कवी नितीन देशमुख, गझललेखक देविदास पाटील, लेखिका-कवयित्री डॉ. चित्रा गोस्वामी, नवोदित कवी प्रसाद पाष्टे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या मध्यंतरात काव्यलेखन स्पर्धेतील पहिले तीन विजेते अनुक्रमे डॉ. प्रशांत शिरकर, प्रा. वसुंधरा जाधव आणि श्रीनिवास सरपोतदार यांना सहभागी कवींसह प्रशस्तिपत्र, पुस्तक, पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. निमंत्रित कवींनाही परंपरेप्रमाणे पुस्तकभेट देऊन गौरवण्यात आले.

श्रीनिवास सरपोतदार

काव्यसंमेलनाची सुरुवात कवयित्री डॉ. चित्रा गोस्वामी यांच्या ‘पाऊस’ या कवितेने झाली. त्यानंतर युवा कवी प्रसाद पाष्टे याने ‘ती’ आणि ‘पुस्तक आणि वाचकाचा संवाद’ अशा कविता सादर केल्या. कवितेत पुस्तक वाचकाशी संवाद साधताना म्हणते...

सध्या जाती-धर्माच्या नावाने
डाव्या-उजव्या बाजूने मांडलं जातंय खरं.. 
ते तुमच्यापर्यंत पोहोचतंही.. 
पण मित्रा, 
शिवाजी महाराज, विवेकानंद, बुद्ध
शाहू, फुले, आंबेडकर यानांही तू
वाचून बघ.. 
यात तुला ‘तो’ नक्की भेटेल.. 
‘तो’ भेटणे सुद्धा कठीण झालेय.. 
होय!, मी माणसांचीच गोष्ट बोलतोय!!

या कवितेत चिंतनशील झालेल्या रसिकांना कवी नितीन देशमुख यांच्या ‘स्मृती’ आणि ‘श्रावण’ या कवितांनी ताल धरायला लावला. यातील ‘स्मृती’ कवितेत गावापासून दूर गेलेल्या, पण गावाकडची आस लागलेल्या चाकरमान्याची मनोवस्था रंगवली होती... 

घन गर्जत अवचित जाता बरसून जाई
नकळत उघडले आठवणींचे दार
पोचलो जाऊनी गावी माझ्या थेट
बोलावत होती ओली पाऊलवाट
साकवांवरी कुणी ओलांडिला ओढा
ते झाड वडाचे झुकलेले.. भिजलेले.. 

‘श्रावण’ या कवितेत 

करीत सुस्मित ठुमकत नाचत.. श्रावण येतो आहे.. 
सरसर सरीच्या संगे वेडा, उन्हात भिजतो आहे.. 
नाचत श्रावण येतो आहे.. 

अशा शब्दांनी रंग भरला. 

संमेलनाध्यक्ष देविदास पाटील यांनीही आपली कविता सादर केली.

जे ओठ तुझे होते, ते ओठ कुठे गेले
हातात चहाचे तू का सांग दिले पेले
स्वप्नात पुन्हा माझ्या हे स्वप्न तुझे आले
उघडून कसे उघडू मी डोळे मिटलेले.. 

प्रियकराची अवस्था सांगणारी गझलही त्यांनी सादर केली.

तू बोलताना तुला ऐकत रहावेसे वाटते
तू एकसारखे मग बोलत रहावेसे वाटते
तू जी आग आहेस ती आग माझी शांत करते
तू जिवाला सारखे जाळत रहावेसे वाटते.. 

सहभागी उल्लेखनीय कवींमध्ये वृषाली काळे (राजापूर), रूपाली पाटील (खेड), सायली गोखले, मच्छिंद्र झापडेकर, वैशाली हळबे, प्रा. वसुंधरा जाधव, डॉ. शिरकर, श्रीनिवास सरपोतदार यांनी ‘पाऊस’ या विषयावरील कवितांचे सादरीकरण केले. 

कार्यक्रमाला जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश दळवी, कार्याध्यक्षा सुमित्रा बोडस, सु. द. भडभडे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य, वाचक सभासद आणि रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पालये यांनी केले आणि आभारप्रदर्शन कार्यवाह राहुल कुळकर्णी यांनी केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search