Next
गेल्या चार वर्षांत देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक
‘व्हायब्रंट गुजरात’ परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दावा
BOI
Saturday, January 19, 2019 | 11:59 AM
15 0 0
Share this article:

‘व्हायब्रंट गुजरात’ या जागतिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.

गांधीनगर : ‘भारतात गेल्या चार वर्षांच्या आमच्या कारकीर्दीत परकीय गुंतवणूक सर्वाधिक झाली आहे’, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी,१८ जानेवारी २०१९ रोजी ‘व्हायब्रंट गुजरात’ या जागतिक परिषदेत केले. गुजरातमधील गांधीनगर येथे या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, जगभरातील राजकीय आणि अर्थ क्षेत्रातील नेते, तज्ज्ञ, व्यावसायिक येथे उपस्थित आहेत. या परिषदेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 


ते पुढे म्हणाले, ‘गेल्या चार वर्षांत २६३ अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक देशात झाली. ही गेल्या १८ वर्षांच्या कालावधीतील एकूण परकीय गुंतवणुकीच्या ४५ टक्के गुंतवणूक ठरली आहे. परकीय गुंतवणुकीचे ९० टक्के प्रस्ताव हे नियमनरहित थेट मार्गाने मंजूर झाल्याने परकीय गुंतवणूकदारांचा भारताकडील ओघ वाढत आहे. जगातील पहिल्या दहा परकीय गुंतवणूकीसाठीच्या पसंतीच्या देशांच्या यादीत भारताचा समावेश आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवहार सोपे केले आहेत. डिजिटल पेमेंटच्या वापराने सरकारी योजनांचा थेट लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. स्टार्टअप्ससाठी अत्यंत पोषक वातावरण उपलब्ध केले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक स्टार्टअप्स येथे आले आहेत. स्टार्टअप्ससाठीची भारत ही जगातील सर्वात मोठी परिसंस्था ठरली आहे. त्यामुळे भारतात व्यवसाय करणे ही मोठी संधी आहे, असे मी खात्रीने सांगू शकतो.’


‘पुढील वर्षी भारताचे नाव जगातील पहिल्या ५० गुंतवणूकसुलभ देशांच्या यादीत आणण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. सध्या भारत या क्रमवारीत ७७व्या स्थानी आहे. गेल्या चार वर्षात भारताचे स्थान ६५ क्रमांकांनी पुढे आले आहे. २०१४ मध्ये भारत १४२ व्या स्थानावर होता. व्यवसाय करण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि गतिमान करण्यावर तसेच त्यासाठीचा खर्च कमी करण्यावरही आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी, अन्य कर आकारणी नियमातील शिथिलता, सुलभता यामुळे खर्च कमी होण्याबरोबरच प्रक्रियाही अधिक सोप्या आणि प्रभावी झाल्या आहेत,’ असेही मोदी यांनी नमूद केले. 

ते म्हणाले, ‘गेल्या चार वर्षांत आर्थिक विकासदर ७.३ टक्क्यांवर राहिला आहे. त्यामुळे सकल राष्ट्रीय उत्पादनाचे प्रमाणही १९९१ पासून सर्वाधिक आहे. देशात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे रोजगाराचा प्रश्नही अतिशय महत्त्वाचा आहे. रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधा निर्मिती या दोन्ही गोष्टींवर आम्ही भर दिला असून, या दोन्ही बाबी गुंतवणूकीशी निगडीत आहेत. ‘मेक इन इंडिया’ द्वारे होणाऱ्या गुंतवणूकीला पाठबळ देण्यासाठी आम्ही ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘स्किल इंडिया’ हे उपक्रम राबवले आहेत. औद्योगिक पायाभूत सुविधा, धोरणे आणि पद्धती जागतिक दर्जाच्या बनवून भारताला उत्पादनाचे जागतिक केंद्र बनवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.’ 

‘रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, दूरसंचार, डिजिटल नेटवर्क आणि ऊर्जा निर्मिती या क्षेत्रात गुंतवणूक वाढवून या सुविधा अत्याधुनिक करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातून ‘नवभारत’ आकाराला येईल आणि तो आधुनिकतेबरोबरच सहृदयता जपणाराही असेल, असे आमचे स्वप्न आहे,’असेही मोदी यांनी नमूद केले.


‘रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्स्फॉर्म आणि अधिक परफॉर्म’ असा मंत्र आम्ही देशाच्या प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार आर्थिक सुधारणा, कारभार आणि परिवर्तनाची प्रक्रिया पार पडत आहे. जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था अशी ओळख असलेल्या भारताची अर्थव्यवस्था आणि देशाची प्रगती अधिक झपाट्याने व्हावी यासाठी ठोस रचनात्मक सुधारणा करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे भारतात गुंतवणूकीसाठी ही उत्तम वेळ आहे. गुंतवणूकदारांनी भारतातील संधींचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन मोदी यांनी केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search