Next
प्रतिभा रानडे, हॉवर्ड लव्हक्राफ्ट
BOI
Sunday, August 20, 2017 | 04:00 AM
15 0 0
Share this article:

१९व्या शतकातल्या स्त्री-समस्यांचा सखोल अभ्यास करून ‘स्त्रीप्रश्नाची चर्चा : एकोणिसावे शतक’ या पुस्तकाद्वारे स्त्री-शिक्षण, वैधव्य, बालविवाह, स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि स्त्रीमुक्तीच्या पाउलखुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रतिभा रानडे आणि बऱ्याच पंडितांच्या मते इंग्लिश भयकथा लिहिणाऱ्यांचा बादशाहा समजला जाणारा हॉवर्ड लव्हक्राफ्ट यांचा २० ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये दोघांचा थोडक्यात परिचय...
................       

प्रतिभा रानडे
२० ऑगस्ट १९३७ रोजी पुण्यात जन्मलेल्या प्रतिभा रानडे या ज्ञानकोशकार गणेश रंगो भिडे यांच्या कन्या आणि उत्तम ललित लेखिका म्हणून आपल्याला माहिती आहेत. पती पंढरीनाथ उर्फ फिरोज रानडे यांच्या सरकारी नोकरीनिमित्त त्यांना भारतभर आणि विदेशातही भ्रमण करता आलं आणि त्यांनी त्या अनुभवांवर पुष्कळ लिखाण केलं.

त्यांना अमृता प्रीतम आणि दुर्गाबाई भागवत यांसारख्या भारतातल्या दोन मोठ्या लेखिकांचा सहवास लाभला. अमृता प्रीतम यांच्या ‘बंद दरवाजा’ पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला, तर ‘ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’ हे पुस्तक लिहून वाचकांना दुर्गाबाई भागवतांसारख्या श्रेष्ठ विदुषीची सविस्तर भेट घडवून दिली.

फोर्ड फाउंडेशनच्या विद्यावृत्तीच्या मदतीने त्यांनी १९व्या शतकातल्या स्त्री-समस्यांचा सखोल अभ्यास करून ‘स्त्रीप्रश्नाची चर्चा : एकोणिसावे शतक’ या पुस्तकाद्वारे स्त्री-शिक्षण, वैधव्य, बालविवाह, स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा प्रश्नांची चर्चा मांडली आणि स्त्रीमुक्तीच्या पाउलखुणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

अबोलीची भाषा, ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी, ज्ञानकोशकार गणेश रंगो भिडे, फाळणी ते फाळणी, शुक्रवारची कहाणी, अफगाण डायरी, अखेरचा बादशाहा, बुरख्याआडच्या स्त्रिया काल आणि आज, पाकिस्तान अस्मितेच्या शोधात, पाकिस्तान डायरी, झांशीची राणी लक्ष्मीबाई अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद, राज्य सरकार यांचे पुरस्कार मिळाले आहेत.

त्या मुंबई महानगर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.
................................

हॉवर्ड लव्हक्राफ्ट
      
२० ऑगस्ट १८९० रोजी ऱ्होड आयलंडमध्ये जन्मलेला लव्हक्राफ्ट म्हणजे भयकथा (हॉरर) लिहिणारा आद्य लेखक आणि बऱ्याच पंडितांच्या मते भयकथा लिहिणाऱ्यांचा बादशाहाच! ‘एडगर अॅलन पो’च्या कथा वाचत मोठा झालेल्या लव्हक्राफ्टला खगोलशास्त्राचं वेड होतं. त्याविषयी लिहितालिहिता तो हळूहळू कथांकडे वळला आणि अद्भुत आणि रहस्यमय लेखन करता करता त्यानं भयकथा (हॉरर) प्रकारचं लेखन सुरू केलं.

‘दी कॉल ऑफ कथुलूह्’ ही त्याची पहिली भयकथा १९२८ साली ‘वीअर्ड टेल्स’ या मासिकात प्रसिद्ध झाली होती. ऑक्टोपसचं डोकं, माणसासारखा देह आणि ड्रॅगनसारखी शेपटी आणि पंख असणारा हा वेगळ्या आकाशगंगेतला सैतानी प्राणी लव्हक्राफ्टनं जन्माला घातला होता. त्यावर अनेक कथा त्यानं लिहिल्या. आणि पुढेसुद्धा अनेकांनी या प्राण्याच्या कथा लिहिल्या आणि त्यावर सिनेमेही निघाले होते. त्याच्या भयकथांमध्ये विकृत, अघोरी आणि खल प्रवृत्तीची माणसं आढळतात.

दी कॉल ऑफ कथुलूह्, अॅट द माउंटन्स ऑफ मॅडनेस, दी केस ऑफ चार्ल्स डेक्स्टर वॉर्ड, नेक्रोनॉमिकॉन अशी त्याची अनेक गाजलेली पुस्तकं आहेत.

१५ मार्च १९३७ रोजी त्याचा मृत्यू झाला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search