Next
रोबोटिक्सवर व्याख्यान
प्रेस रिलीज
Monday, August 21, 2017 | 11:20 AM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘ऑटोमोबाइल उद्योग क्षेत्रातील कठीण कामे, शहर नियोजन, पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठीचा अभ्यास, सीमेवरील प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्यासाठी संरक्षण, शेतीतील घटक आणि पिकांच्या वाढीचा अभ्यास, अंतराळ मोहीमा, वैद्यकीय क्षेत्रातील किचकट शस्त्रक्रिया या सगळ्यात आज रोबो तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरले जात आहे. सध्या रोबो तंत्रज्ञानात मानवनिर्मित बुद्धिमत्ता विकसनावर संशोधन सुरू असून, भविष्यात रोबो तंत्रज्ञान सर्वच क्षेत्रात क्रांती घडवेल,’ असा आशावाद ‘फ्ल्यूइड रोबोटिक्स इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम भालेराव यांनी व्यक्त केला.

मराठी विज्ञान परिषदेचा पुणे विभाग (मविप), मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्र व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने सेनापती बापट रस्त्यावरील मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या सभागृहात 'रोबोटिक्स : काल, आज आणि उद्या' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. 

या वेळी विज्ञान परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. यशवंत घारपुरे, एमकेसीएलचे उदय पांचपोर, विज्ञानशोधिकेचे संचालक अनंत भिडे, सहसंचालिका नेहा निरगुडकर आदी उपस्थित होते. एमकेसीएल, विज्ञानशोधिका आणि मविप यांनी १२ व्याख्यानांची ही मालिका आयोजित केली असून, त्यातील हे पहिले व्याख्यान होते. 

असीम भालेराव म्हणाले, ‘आज रोबो तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात येत आहे. या तंत्रज्ञानामुळे ज्या गोष्टी मानवाला शक्य नाहीत, त्या शक्य होऊ लागल्या आहेत. मानवी जीवनाचा दर्जा उंचावत आहे. स्वयंचलित गाड्यांची निर्मिती होऊ लागली आहे. उद्योगात अनेक अवजड कामे रोबो करीत आहे. उत्पादन क्षमता, अचूकता वाढत आहे. परंतु, याला काही मर्यादा आहेत. ज्ञानेंद्रिय विकसित नसल्याने सध्याचे रोबो तंत्रज्ञान मानवी सुचनांवर अवलंबून आहे. रोबो तंत्रज्ञानामुळे काही प्रमाणात नोकऱ्या जातील, मात्र, त्याच प्रमाणात नव्या नोकऱ्यांचीही निर्मिती होईल. शिक्षण क्षेत्रात रोबो तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे अभ्यासाच्या पद्धतीही बदलू शकतात. पर्यावरणाच्या रचनेचा सखोल अभ्यास रोबो तंत्रज्ञानाच्या मदतीने करता येईल.’

 ‘नवतंत्रज्ञान समजून घेण्यासाठी ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे. तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होत असून, सर्वसामान्यांच्या आयुष्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. या नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात कसे करायचे याविषयी या व्याख्यानमालेत मार्गदर्शन केले जाणार आहे. मराठी विज्ञान परिषद नियमित विज्ञानप्रसार करण्यासाठी प्रयत्नशील आहे,’ असे प्रा. यशवंत घारपुरे यांनी सांगितले.

अनंत भिडे म्हणाले, ‘मुलांमध्ये नवतंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी विज्ञानशोधिका नियमितपणे उपक्रम राबवित आहे. प्रात्यक्षिकांतून विज्ञानशिक्षण हा आमचा गाभा आहे. शालेय वयात याप्रकारचे ज्ञान त्यांना मिळाले, तर चांगले शास्त्रज्ञ भारताला मिळू शकतील.’ 
नेहा निरगुडकर यांनी आभार मानले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search