Next
‘कमलताईंसारखी शिक्षिका आईसारखे संस्कार करते’
BOI
Tuesday, October 02, 2018 | 10:55 AM
15 0 0
Share this article:

पुस्तक प्रकाशनावेळी बोलताना मधुभाई. (डावीकडून) राजेंद्रप्रसाद मसुरकर, जयू भाटकर, कमल बावडेकर व डॉ. श्रीरंग कद्रेकर.

रत्नागिरी : ‘सरोवरातील कमळाचा कंद वर येऊन फुलल्यानंतर त्याचे सौंदर्य अधिक खुलते. तसेच कमलताईंनी आयुष्याचा कंद फुलवत आतापर्यंत जीवन जगताना अनुभवलेले क्षण, प्रसंग ‘कमलकुंज’ पुस्तकातून उलगडले आहेत. आई नसते, तिथे कमलताईंसारखी शिक्षिका असेल तर ती आईसारखेच संस्कार करते,’ असे गौरवोद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी काढले.

रत्नागिरीतील मारुती मंदिर-जोगळेकर कॉलनी येथील लक्ष्मी-विष्णू सभागृहात ३० सप्टेंबर २०१८ रोजी श्रीमती बावडेकर यांच्या ‘कमलकुंज’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रकाशनानंतर ते बोलत होते. अवेश्री प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या वेळी व्यासपीठावर दूरदर्शनचे सहायक संचालक जयू भाटकर, दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर आणि प्रकाशक राजेंद्रप्रसाद मसुरकर होते.

मधुभाई म्हणाले, ‘सर्वसामान्य माणूस हा पैसा, श्रीमंती, मुलांचे शिक्षण, परदेशात नोकरी याला प्रेयस मानतो. कमलताई बावडेकर यांच्यासारख्या असामान्य व्यक्ती श्रेयस विचार करतात आणि समाजहित पाहतात, पुढच्या पिढीला अलंकृत करण्याचे काम करतात. ८४ वर्षांच्या कमलताई परिपक्व असल्याने आपण लोकांसाठी काय केले, त्यांना किती आनंद दिला असा जगण्याचा हिशोब करतात. त्या चिंतनातून ‘कमलकुंज’ फुलले आहे. कमलताई वेगळ्या गुणवत्तेच्या आहेत. मी त्यांची तुलना जुन्या काळातील स्नेहलता दसनूरकर यांच्याशी करीन. त्यांनी जीवनाकडे वेगळ्या अंगाने पाहिले. त्या पद्धतीचे लेखन कमलताईंनी केले आहे.’

जयू भाटकर म्हणाले, ‘बाई आम्हाला शाळा क्रमांक तीनमध्ये शिकवायला होत्या. चौथी शिष्यवृत्तीसाठी पैसे भरले नाहीस तर वर्गात घेणार नाही, असे सांगण्यात आले होते. मामाने पैसे दिले. परीक्षेत यशस्वी झाल्यावर बाईंनी माझा शाळेत मोठा सत्कार घडवला. आज त्यांच्या पुस्तक प्रकाशनाला व मराठी सारस्वतातील ‘कोकणाग्रज’ मधुभाईंच्या उपस्थितीत मला व्यासपीठावर उपस्थित राहण्याची संधी मिळाली, हे अविस्मरणीय आहे.’अवेश्री प्रकाशनातर्फे हे पुस्तक वेदवती मसुरकर यांनी प्रकाशित केले असल्याचे राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी सांगितले. ‘लेखकांकडून पैसे न घेता विक्री व्यवस्थेतून पैसे उभे करून पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प आहे. रत्नागिरीकरांनी या उपक्रमासाठी सहकार्य करावे,’ असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी ‘कोमसाप’चे अध्यक्ष महेश केळुसकर म्हणाले, ‘महाराष्ट्रात प्रभुकुंज, कृष्णकुंज प्रसिद्ध आहे. आता रत्नागिरीचे ‘कमलकुंज’ही प्रसिद्ध होईल. ज्ञान देण्याचा ध्यास, वसा कमल बावडेकर यांनी पुढे नेला. आजच्या काळाला उपयोगी पडेल असे अनेक अनुभव त्यांनी पुस्तकात लिहिले आहेत.’ 

विनय परांजपे यांनी पुस्तकाचा ‘खणखणीत’ असा उल्लेख करून बावडेकर बाईंचे अभिनंदन केले. ‘जगण्याचा उत्सव कसा करायचा, हे त्यांच्याकडून शिकावे. त्यांनी आणखीही पुस्तके लिहावीत,’ अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. दीप्ती कानविंदे यांनी सूत्रसंचालन केले. मिलिंद साखळकर यांनी आभार मानले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search