Next
तमिळनाडूतील उगवता ‘रजनीकांत’
BOI
Monday, November 19, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

जी अफाट लोकप्रियता रजनीकांत यांनी अनुभवली, त्याच वाटेवरून आता विजय हा अभिनेता वाटचाल करत आहे. विजयच्या ताज्या ‘सरकार’ या चित्रपटाने केवळ नऊ दिवसांत २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या दोन्ही अभिनेत्यांमध्ये अनेक बाबतींत थक्क करणारे साधर्म्य आहे. तमिळनाडूच्या दृष्टीने त्यांना ‘उगवता रजनीकांत’ मिळाला आहे, असे म्हणायला आणखी वाव मिळाला आहे.
..................
‘मी जेव्हा जेव्हा कोइमतूर विमानतळावर येतो, तेव्हा दोन घटना मला आठवतात. अन्नामलै हा एक सुपर-डुपर हिट चित्रपट होता. त्या वेळी मी एका स्नेह्याच्या लग्नाला उपस्थित होतो. शिवाजी सर (शिवाजी गणेशन) आणि मी एकत्रच प्रवास केला आणि विमानतळावर उतरलो. विमानतळाच्या बाहेर माझ्या नावाने चित्कार करणारी गर्दी उसळली होती. परंतु मी शरमिंदा आणि अस्वस्थ झालो होतो. कारण एका दिग्गजाच्या शेजारी मी उभा होतो. शिवाजी गणेशन हसत पाहत होते. ते मला म्हणाले, ‘ही तुझी कीर्ती आहे. कठोर परिश्रम कर आणि चांगले चित्रपट कर. आम्ही आमच्या काळात चांगले चित्रपट दिले होते. आता तुझी वेळ आहे.

काही वर्षांनंतर मला त्याच विमानतळावर जायचे होते. तेव्हा मला एक संदेश आला, की मी आता विमानतळावर येणे टाळावे. कारण दुसरा एक अभिनेता कोइमतूरमध्ये असणार होता. त्याच्यासाठी उसळलेली गर्दी कल्पनेबाहेर होती. ‘त्याला येऊन जाऊ द्या, त्यानंतर तुम्ही या,’ असे मला सांगण्यात आले. त्या क्षणी शिवाजी सरांचे शब्द मला आठवले...आता तीच वेळ अन्य कोणासाठी आली आहे. वेळ सिनेमातील असो किंवा राजकारणातील, सर्व काही बदलते...’

सुमारे एक वर्षापूर्वी, म्हणजे ३० डिसेंबर २०१७ रोजी सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या चाहत्यांसमोर केलेल्या दीर्घ भाषणातील हा एक उतारा. आपल्या राजकारण प्रवेशाची घोषणा करण्यासाठी त्यांनी तीन दिवस चाहत्यांशी संवाद साधला आणि शेवटच्या दिवशी जे भाषण केले, त्या वेळी त्यांनी हा किस्सा सांगितला होता. चित्रपट क्षेत्रातील आता आपली वेळ संपली असून, आपला उत्तराधिकारी आला आहे, हे सांगण्यासाठी त्यांनी हा किस्सा सांगितला होता. अन् त्यांनी त्या दुसऱ्या अभिनेत्याचे नाव घेतले नसले, तरी ते कोणाबद्दल बोलत आहेत हे सर्वांना माहीत होते.

तो होता विजय...आता-आतापर्यंत ज्याच्या नावापुढे इळैय दळपती (तरुण नेता) हे बिरुद लागायचे आणि आता थेट दळपती (नेता) हेच बिरुद लागते तो विजय. गेल्या वर्षी ‘मेर्सल’ आणि आता ‘सरकार’ या चित्रपटांमुळे एकाच वेळेस वाद, चर्चा आणि यश या तिन्हींचा अनुभव घेणारा अभिनेता. 

रजनीकांत हे आता चित्रपटांच्या दृष्टीने कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात असून, राजकारण हे त्यांच्या पुढील वाटचालीचे क्षेत्र असेल, असे त्यांनी स्वतःच म्हटले आहे. त्यामुळे तमिळ सिनेसृष्टीचा अनभिषिक्त (अनभिषिक्त कसला, अभिषिक्तच!) बादशहा ही त्यांची जागा कोण पटकावणार, यावर पैजा लागत आहेत. खरे तर ‘बाबा’ अयशस्वी झाला, तेव्हाच ‘रजनीकांत संपला’ अशी हाकाटी सुरू झाली होती; मात्र दोनच वर्षांनी ‘चंद्रमुखी’ चित्रपटातून त्यांनी यशस्वी पुनरागमन केले आणि नंतर ‘शिवाजी दी बॉस’, ‘एंदिरन’ व ‘कबाली अशा एकामागोमाग एक यशस्वी चित्रपटांची माळ लावली. तर सांगायचे असे, की त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची चर्चा तेव्हापासून सुरू आहे; मात्र या संपूर्ण दशकभरात एकच बाब समान राहिली, ती म्हणजे या उत्तराधिकाऱ्यांच्या यादीत पहिले नाव राहिले ते विजयचेच. 

अभिनेता रजनीकांत यांना ‘सुपरस्टार’ हे बिरुद लागले ते १९७८मध्ये आलेल्या ‘भैरवी’ या चित्रपटापासून. १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धात रजनीकांत यांनी व्यावसायिक नायक म्हणून आपला प्रवास सुरू केला आणि दर वर्षी सरासरी १० चित्रपटांत काम केले. ‘मन्नन’, ‘दळपती’, ‘अन्नामलै’, ‘बाशा’, ‘मुथ्थू’ आणि ‘पडैयप्पा’ अशा त्यांच्या चित्रपटांनी यशाचे नवे मापदंड निर्माण केले. हे यश एवढे अफाट होते, की कधी-काळी रजनीकांतची जागा कोणी घेऊ शकेल, अशी कल्पनाही कोणाला करवत नव्हती. तमिळमध्ये याला ‘इमालय वेट्री’ असा शब्द आहे – म्हणजे हिमालयाएवढे यश!

...मात्र गेल्या काही वर्षांत ज्या झपाट्याने विजयने यश मिळविले आहे, त्यामुळे आता रजनीच्या जागी तो बसू शकेल ही शक्यता जवळ आली आहे. इंग्रजी धाटणीत सांगायचे, तर रजनीच्या चपला आता विजयला बसू शकतील, असे अनुमान करायला जागा आहे. 

विजयच्या ताज्या ‘सरकार’ने उत्पन्नाचे नवे विक्रम रचले आहेत. जगभरात या चित्रपटाने केवळ नऊ दिवसांत २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘सरकार’ने २०१८मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या १० भारतीय चित्रपटांमध्ये स्थान मिळविले आहे. एकामागोमाग १०० कोटी रुपयांची कमाई करणारे दोन चित्रपट देणारा विजय हा कोलिवूडचा (तमिळ चित्रोद्योग) पहिला अभिनेता आहे. ‘सरकार’मधील एका दृश्यावरून प्रेरित होऊन तमिळनाडूत अनेक ठिकाणी लोकांनी राजकीय पक्षांकडून फुकट मिळालेल्या मिक्सर, ग्राइंडर व टीव्हीसारख्या वस्तू फोडल्याचे वृत्त आहे. रजनीकांतच्या ‘बाशा’ चित्रपटानंतर, त्या चित्रपटातील रजनीची प्रेरणा घेऊन, तमिळनाडूतील अनेक ऑटोचालकांनी गर्भवती महिलांना फुकट ऑटोवारी देऊ केली होती, त्याचीच ही पुनरावृत्ती.

या दोन्ही अभिनेत्यांमध्ये अनेक बाबतींत थक्क करणारे साधर्म्य आहे. एक म्हणजे लहान मुले आणि स्त्रियांना चित्रपटगृहांत खेचून आणण्याची त्यांची क्षमता. विजयच्या बरोबरीला विक्रम, सूर्या आणि अजित या अभिनेत्यांचाही स्वतःचा चाहता वर्ग आहे. परंतु संपूर्ण कुटुंबाला आकर्षित करण्याचे कसब विजयकडे आहे. दुसरे म्हणजे तमिळनाडूबाहेर त्यांची लोकप्रियता. रजनीकांत ऐन भरात असताना पार हिंदी पट्ट्यापर्यंत त्याची लोकप्रियता होती, तशीच लोकप्रियता आज विजयला केरळ आणि अगदी परदेशातही आहे. तिसरे म्हणजे विनोद, नृत्य आणि हाणामारी या सर्व क्षेत्रांतील कसब. 

तमिळ चित्रोद्योगातील जाणकारांच्या मते, अजित आणि विजय हे दोघेही मोठे तारे आहेत; मात्र विजयचा चित्रपट फसला, तरी त्यातील गुंतवणुकीचा ७०-८० टक्के परतावा मिळतो. अन्य नटांच्या बाबतीत हेच प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत खाली येते. एके काळी रजनीकांत आणि कमल हासन किंवा विजयकांत यांच्यात हाच फरक होता. रजनीप्रमाणेच विजयनेही स्वतःच्या चाहत्यांमार्फत समाजसेवेची कामे सुरू केली आहेत. रजनीप्रमाणेच माध्यमांपासून आणि वादापासून दूर राहणे, हा त्याच्यातील आणखी एक गुण. 

यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे विजयची प्रेरणाच रजनीकांत आहेत. आताच्या ‘सरकार’ आणि याआधीच्या ‘पोक्किरी’सारख्या चित्रपटांतून त्याने रजनीकांतचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उल्लेख करून, त्यांची लकब वापरून आपण रजनीकांतची जागा घेत असल्याचेच दाखवूनही दिले आहे. आज ४५ वर्षांचा असलेल्या विजयने अगदी नवखा असताना ‘कुमुदम’ नावाच्या मासिकात ‘नान ओरु रजिनी रसिगन’ नावाची एक मालिका लिहिली होती. त्यात त्याने रजनीकांतचा आपल्यावरील प्रभाव पूर्ण मान्य केला होता. त्यात त्याने एकदा म्हटले होते, ‘रजनीकांत यांच्या घरात त्यांची स्वतःची एक खोली आहे. त्यात ते बसून ध्यान करतात. तेथे मोठमोठे आरसे लावलेले आहेत. त्याच्यासमोर बसून ते म्हणतात, ‘तू कोण आहेस? तू स्वतःला कोण समजतोस? या जगात तू एक यःकश्चित् प्राणी आहेस...’ स्वतःचे पाय जमिनीवर ठेवण्यासाठी त्यांनी केलेला हा उपाय आहे. मला असेच व्हायचे आहे.’ अन् हे त्याने प्रत्यक्ष करून दाखवले आहे. म्हणूनच आधी ‘मेर्सल’ आणि आता ‘सरकार’वरून राजकीय वादळ उठलेले असताना तो शांत असतो. रजनीकांतच्या बाबतीतही हेच! 

गंमत म्हणजे रजनीकांत यांनी १९९६ साली द्रमुकला पाठिंबा देऊन आता त्यांच्या विरोधातच राजकीय शड्डू ठोकला आहे. त्याचप्रमाणे विजयने २०११ साली अण्णा द्रमुकला पाठिंबा दिला होता आणि आता तेच अण्णा द्रमुक सरकार विजयच्या ‘सरकार’वर खप्पा आहे. आज वय विजयच्या बाजूने असल्यामुळे तो सध्या तरी चित्रपटातूनच बोलेल; मात्र रजनीकांतप्रमाणे योग्य वेळ येताच तो राजकारणात येणार नाही असे नाही. 

तेव्हा तमिळनाडूच्या दृष्टीने त्यांना ‘उगवता रजनीकांत’ मिळाला आहे, असे म्हणायला आणखी वाव मिळाला आहे. ‘सरकार’च्या यशाचा हाच संदेश आहे.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search