Next
तुमचं मूल एकलकोंडं होत नाहीये ना?
BOI
Saturday, May 12, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story


उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदावर नोकरीत असणे, म्हणजे आपल्या मुलांना वेळ देण्यापासून सुटका, असे समीकरण हल्ली अनेक कुटुंबांमध्ये मांडले जाताना दिसते. कामासोबतच आपल्या मुलांना पुरेसा ‘क्वालिटी टाइम’ देणे, त्यांच्याशी नियमितपणे संवाद साधणे, याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तसे झाले नाही, तर मुले एकलकोंडी होतात. त्याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विपरीत परिणाम होतो. ‘मनी मानसी’ या सदरात या वेळी पाहू या मुलांच्या एकलकोंडेपणाच्या समस्येबद्दल... 
..........
चार वर्षांच्या सुजयला घेऊन त्याच्या शाळेतील बाई भेटायला आल्या. त्यांनी सुजयची ओळख करून दिली. तो गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या गटात होता. बाईंनी त्याच्याशी थोडा संवाद साधण्याबाबत सुचवले. त्यामुळे त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; पण त्याच्याकडून संवादाला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. तो त्याच्याच तंद्रीत होता. एकटाच काहीतरी बडबडत होता. आजूबाजूच्या वातावरणाशी त्याचा काही संबंध नव्हता. त्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याला दोन-तीन वेळा हाक मारली. तेव्हा त्याने पाहिले; पण विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्याला देता आले नाही. मग बाईंनी त्याला त्याच्या गटात बसवले आणि पुन्हा मला भेटायला आल्या.

‘सुजय गेल्या सहा महिन्यांपासून माझ्या गटात आहे; पण तो आता जसा होता ना, तसाच तो कायम असतो. वर्गातही तो असाच असतो. स्वतःच्याच नादात, एकटाच बडबडत बसलेला असतो. वर्गात कोणाशी काहीच बोलत नाही. त्याला मित्र मैत्रिणी नाहीतच. अभ्यासाकडेही त्याचे अजिबात लक्ष नसते. गाणी, प्रार्थना श्लोक यांपैकी काहीही त्याला म्हणता येत नाही. काही खेळत नाही, की बोलत नाही. आईला भेटायला बोलावलं; पण दोघा पालकांना वेळच नाही. पालकसभेलासुद्धा आले नाहीत. त्याला सोडायला आणि न्यायला त्याला सांभाळणाऱ्या मावशीच येतात. त्यांच्याकडेही निरोप देऊन झाला; पण काही उपयोग नाही. मुलाचं फार वाईट वाटतं. आता तुम्हीच बघा,’ एवढे बोलून त्या थांबल्या. त्यानंतर त्यांच्याकडून आवश्यक ती आणखी माहिती घेतली. त्यातून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला, की तो स्वतःशी बोलताना कार्टून्स, गोष्टीतली पात्रे यांची नावे घेऊन बोलतो. आमचे बोलणे झाल्यावर बाई वर्गात निघून गेल्या.

त्यानंतर पुढचे काही दिवस सुजयचे फक्त निरीक्षण केले. त्याच्याशी संवाद साधण्याचा पुन्हा-पुन्हा प्रयत्न केला. त्याच्या काही छोट्या टेस्ट्स घेतल्या. सगळ्यालाच त्याचा प्रतिसाद कमी होता. तो नेहमीप्रमाणे स्वतःमध्येच मग्न होता. एकटाच बोलत होता. या साऱ्याचे गांभीर्य लक्षात आल्यावर मुख्याध्यापिकांच्या मदतीने त्याच्या आई-वडिलांशी संवाद साधून त्यांना भेटीसाठी त्वरित बोलावण्यात आले. सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ, चिडचिड केली; मात्र मुख्याध्यापिकांनी काहीशा कडक शब्दांत सांगितल्यानंतर मात्र ते भेटीला तयार झाले. वेळ ठरवली. 

ठरल्या दिवशी त्या मुलाचे आई-वडील भेटायला आले. त्यांना भेटायला बोलावल्याचा राग आला होता. त्यांचा राग त्यांच्या वागण्या-बोलण्यातून स्पष्ट दिसत होता. आल्यापासून ते चिडूनच बोलत होते. त्यांना थोडेसे बोलू दिल्यावर मात्र त्यांना थांबवले. आणि भेटीसाठी ताबडतोब बोलावण्यामागील कारण सांगितले. त्याच्या शिक्षिका, मुख्याध्यापिका अशा सर्वांनी त्याच्याबाबतची निरीक्षणे त्यांना नीट, सविस्तरपणे सांगितली. त्याच्या या वर्तनाचे गांभीर्य या सत्रादरम्यान त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला; पण त्याच्या या समस्या आई-वडिलांना मान्यच नव्हत्या. प्रत्येक गोष्टीला ते नकार देत होते. त्यामुळे मुख्याध्यापिकांची परवानगी घेऊन त्यांना पुढील दोन दिवस रोज एक-एक तास त्याचे निरीक्षण करण्यासाठी शाळेत बोलावण्यात आले. काहीसे नाखुशीनेच ते येण्यास तयार झाले. ठरल्याप्रमाणे दोन दिवस त्यांनी लांबूनच त्याचे निरीक्षण केले. त्यानंतर मात्र खरोखरच समस्येचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले. नंतर ते स्वतःहून वेळ घेऊन भेटायला आले. 

या सत्रात त्याच्या आईला खूप रडू आले. वडिलांनीही मनापासून माफी मागितली व संपूर्ण सहकार्याची तयारी दाखवली. यानंतरच्या सत्रातून मिळालेल्या माहितीवरून असे लक्षात आले, की त्या मुलाचे आई-वडील दोघेही उच्चशिक्षित होते आणि बऱ्याच मोठ्या हुद्द्यावर यशस्वीपणे कार्यरत होते; पण त्यामुळे ते सुजयला वेळच देऊ शकत नव्हते. सुजय दिवसभर मावशींबरोबर असायचा. त्या कामात असल्या, की त्या त्याला टीव्ही लावून द्यायच्या. त्यामुळे लहानपणापासूनच टीव्ही, कार्टून्स, गोष्टी आणि काही प्रमाणात मावशी, एवढेच त्याचे विश्व होते. संवाद, समाजात मिसळणे, समवयस्क मुलांमध्ये खेळणे अशा अनेक गोष्टींचा सतत अभाव असल्याने तो एकलकोंडा झाला होता. त्याचा परिणाम त्याच्या सर्वांगीण विकासावर व पर्यायाने व्यक्तिमत्त्वावर होऊ लागला होता.

समस्येचे गांभीर्य लक्षात आल्यावर मात्र आई-वडिलांनी सुजयसाठी भरपूर वेळ द्यायला सुरुवात केली. त्याला संवाद साधायला शिकवले. त्याचा एकटेपणा दूर करण्यासाठी सुचवलेले सर्व प्रयत्न त्यांनी नेटाने केले. आई-वडिलांचा ‘क्वालिटी टाइम’ सुजयला मिळू लागला. त्यामुळे टीव्ही, कार्टून्स यांचे प्रमाण आपोआपच कमी झाले. आपले आई-वडील आपल्यासाठी वेळ देत आहेत, बोलत आहेत, हे समजल्यामुळे त्याच्या स्वभावातील एकलकोंडेपणा कमी होऊ लागला. तो इतरांशी बोलायला शिकला. या साऱ्याला वेळ नक्कीच लागला; पण आई-वडिलांनी वेळीच प्रयत्न सुरू केल्याने पुढील समस्या टळली आणि सुजय एकदम चांगला झाला. आई-वडिलांनी आपल्या मुलांकडे गांभीर्याने लक्ष देणे, त्यांच्यासाठी वेळ देणे कसे आणि किती आवश्यक आहे, याची तीव्रता या केसवरून कळते.

(केसमधील नाव बदलले आहे.) 

- मानसी तांबे-चांदोरीकर 
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link