Next
रत्नागिरीतील सुभाष गॅरेजचा सुवर्णमहोत्सव
गॅरेजचे संस्थापक बंधू बाष्टे यांचा अमृतमहोत्सव
BOI
Wednesday, April 03, 2019 | 03:16 PM
15 0 0
Share this article:



रत्नागिरी :
रत्नागिरीतील सुभाष श्रीराम तथा बंधू बाष्टे यांच्या ‘सुभाष ऑटो रिपेअर्स’ या गॅरेजच्या स्थापनेला आता ५० वर्षे पूर्ण होत आहेत. रत्नागिरीत सुरू झालेल्या ‘आयटीआय’च्या पहिल्या तुकडीतून उत्तीर्ण झालेल्या बाष्टे यांनी रत्नागिरीत सुरू केलेल्या गॅरेजने चांगला नावलौकिक मिळविला. त्यांच्याकडून मिळणारी वैशिष्ट्यपूर्ण सेवा हे त्याचे कारण. बाष्टे यांनी आपल्या वयाची ७५ वर्षेही नुकतीच पूर्ण केली आहेत. त्यांचा अमृतमहोत्सव आणि गॅरेजचा सुवर्णमहोत्सव या औचित्याने अनेक हितचिंतकांनी भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या. 

सुभाष बाष्टे हे ‘मोटार जगत’चे सल्लागारही आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर राज्यात सुरू झालेल्या जिल्हावार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रत्नागिरी येथील ‘आयटीआय’चाही समावेश होता. तेथे सुरू झालेल्या मोटार वाहन दुरुस्ती अभ्यासक्रमाच्या पहिल्या तुकडीतून बंधू उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील प्रख्यात मेकॅनिक आनंद स्वादी यांच्या वर्कशॉपमध्ये उमेदवारी केली. १९९६९च्या गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून रत्नागिरीत त्यांनी स्वतःचे गॅरेज सुरू केले. मोटारीच्या रचनेचे व दुरुस्तीचे सखोल ज्ञान, नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास, व्यावसायिक सचोटी आणि स्वागतशील स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीत नावलौकिक मिळविला. मोटारीव्यतिरिक्त इतर अनेक विषयांत असलेली गोडी, शहराच्या स्थानीय इतिहासाचे ज्ञान आणि सामाजिक वाटचालींचे सूक्ष्म निरीक्षण यामुळे बंधू विविध क्षेत्रांतील जाणकारांमध्येही लोकप्रिय झाले. त्यांची व्यावसायिक व सामाजिक योग्यता लक्षात घेऊन साप्ताहिक आरसा आणि मोटार जगत यांच्यातर्फे त्यांना २०११मध्ये मोटार जगत जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

जिल्हा परिषदेनजीक असलेल्या बंधूंच्या गॅरेजमध्ये वाढदिवसानिमित्त झालेल्या अनौपचारिक आणि उत्स्फूर्त छोटेखानी मित्रमेळाव्याला वकील राजशेखर मलुष्टे, विलास पाटणे, अशोक भिसे, ‘मोटार जगत’चे संपादक राजेंद्रप्रसाद मसुरकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य मंदार सावंतदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते. बंधूंचे सुपुत्र गौतम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

‘गॅरेजचा सुवर्णमहोत्सव आणि संस्थापकांचा अमृतमहोत्सव असा दुग्धशर्करा योग्य जुळून येणे, ही बंधूंसाठीच नव्हे, तर रत्नागिरीकरांसाठीही संस्मरणीय गोष्ट आहे,’ असे मलुष्टे म्हणाले. बंधू हे मोटार क्षेत्रातील ज्येष्ठ, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असल्याचे पाटणे यांनी सांगितले. ‘केवळ मोटारगाडीचेच नव्हे, तर इतिहास आणि अन्य अनेक विषयांचे ते जाणकार आहेत,’ अशा शब्दांत मसुरकर यांनी त्यांचा गौरव केला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search