Next
मुलांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पा..
BOI
Saturday, May 26, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


वयात येणं हा प्रत्येकाच्याच आयुष्यात येणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. प्रत्येकालाच त्याला सामोरं जावं लागतं. याविषयीची शास्त्रीय माहिती योग्य वेळेत मिळाली तर मुलं चुकीच्या दिशेला जाण्यापासून रोखली जाऊ शकतात. म्हणूनच मुलांना योग्य माहिती देणे हे पालक म्हणून आपलं काम आहे... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू वयात येणाऱ्या मुलांच्या समस्यांबद्दल...
.............................
सविता काकू स्वतःहून भेटायला आल्या. आल्यावर त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. त्या एका खाजगी कंपनीत नोकरी करत होत्या. त्यांचे पतीदेखील एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. त्यांना निखिल आणि वैदेही अशी दोन जुळी मुलं होती. ते दोघंही आठव्य़ा इयत्तेत शिकत होते. सविता काकूंना त्या दोघांबद्दल काहीतरी बोलायचं होतं म्हणून त्या आल्या होत्या.

‘माझी दोन्ही मुलं सध्या आठवीमध्ये शिकतात. दोघं तशी हुशार, चुणचुणीत, गप्पीष्ट आहेत. दोघांचं एकमेकांशी छान पटतं. भांडणं, मारामाऱ्या, चेष्टा-मस्करी सगळं चालतं दोघांमध्ये, पण गेल्या काही दिवसांपासून दोघांच्याही वागण्यात खूप बदल झालाय. वैदेही खूप चिडचिडी झालीये, तर निखिल खूपच गप्प गप्प झालाय. घरातलं सगळं वातावरणच पार बदलून गेलंय. शाळेतूनसुद्धा वैदेहीच्या खूप तक्रारी येत आहेत. आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. निखिलही हल्ली बाबांशी खूप वाद घालतो. काय झालंय दोघांनाही काहीच समजत नाही. त्यांच्यामुळे घरात सगळ्यांचीच चिडचिड वाढली आहे. आमचं काही चुकतंय का, आम्ही वागण्यात काही बदल केला पाहिजे का.., असं अचानक काय झालं.. या सगळ्याचं  मला खूप टेन्शन येत होतं, म्हणून मी भेटायला आले आहे. कसं वागावं.. बोलावं काही कळेनासं झालंय. मला थोडं मार्गदर्शन करा..

काकूंचं बोलणं झाल्यावर त्यांच्याकडून आणखी काही गोष्टी सविस्तरपणे जाणून घेतल्या. आलेल्या अंदाजावरून दोघांची समस्या स्पष्ट झाली. त्यामुळे सविता काकूंना या गोष्टीची जाणीव करून दिली, की तुमची मुलं आता वयात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सवयी, आवडी-निवडी यांमध्ये काही बदल हे होतील. या वयात मुलांमध्ये अनेक प्रकारचे बदल होतात. त्याबद्दल त्यांना सविस्तर माहिती दिली. निखिल आणि वैदेही दोघांमध्येही हे बदल वयात येण्यामुळे झाले होते. त्यामुळेच वैदेही चिडचिड करत होती, तर निखिल एकदम गप्प झाला होता. कदाचित स्वतःमधील हे बदल स्वीकारणं दोघांनाही अवघड जात असावं, असं काकूंच्या बोलण्यातून जाणवलं. त्यामुळे काकूंना पुढील वेळी दोघांना स्वतंत्रपणे सत्रासाठी पाठवण्यास सांगितलं.  

ठरल्याप्रमाणे वैदेही आणि निखिल दोन स्वतंत्र सत्रांमध्ये भेटून गेले. या सत्रांमध्ये त्यांना त्यांच्यात झालेले बदल, म्हणजेच वयात येणं म्हणजे नेमकं काय.., याचा सविस्तर अर्थ समजावून सांगितला. वयात येणं याचा शास्त्रीय अर्थ काय.. या वयात शरीरात, मनात, भावनांमध्ये का व कसे बदल होतात, ते नैसर्गिक बदल आपण कसे स्वीकारावेत, त्यांना कसं सामोरं जावं, याबाबत सविस्तर माहिती दिली. 

वयात येणं हा प्रत्येकाच्याच आयुष्यात येणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. होणारा बदल आहे आणि प्रत्येकालाच त्याला सामोरं जावं लागतं. याविषयीची शास्त्रीय माहिती योग्य वेळेत मिळाली तर मुलं चुकीच्या दिशेला जाण्यापासून रोखली जाऊ शकतात. म्हणूनच मुलांना योग्य माहिती देणं हे पालक म्हणून आपलं काम आहे. म्हणजे त्यांच्या वर्तन समस्या वाढणार नाहीत.

(केसमधील नावे बदलली आहेत.)

- मानसी तांबे – चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search