Next
‘ज्ञानेश्वर मुळे म्हणजे आकाश भरारीचे आदर्श उदाहरण’
विवेक सबनीस
Monday, April 02, 2018 | 03:30 PM
15 0 0
Share this story

ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करताना (डावीकडून) सचिन ईटकर, ज्ञानेश्वर मुळे, मोहन भागवत, संदीप वासलेकर आणि मंदार जोगळेकर

पुणे :
‘स्वत:वरील व जगावरील श्रद्धा, त्यातून येणारी सकारात्मकता आणि राष्ट्रउभारणीचा ध्यास यामुळेच जगभरात काम करणारे सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांना स्वत:च्या जीवनाचा अर्थ व त्यातली सार्थकता समजली. त्या आधारे माणूस कोणत्याही परिस्थितीत आपल्या पंखांच्या बळावर आकाशात भरारी घेऊ शकतो, याचे आदर्श उदाहरण त्यांनी घालून दिले व या साऱ्याचेच दर्शन त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधून घडते,’ असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काढले. 

निमित्त होते मुळे यांनी लिहिलेल्या, तसेच त्यांच्या साहित्याचा अनुवाद असलेल्या पुस्तकांच्या प्रकाशनाचे. भागवत यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन रविवारी, एक एप्रिल रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झाले. पुण्यातील महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा या संस्थेने या समारंभाचे आयोजन केले होते. या वेळी आंतरराष्ट्रीय धोरण विश्लेषक, विचारवंत व ‘स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप’चे अध्यक्ष संदीप वासलेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माती पंख आणि आकाश, सायलेंट केऑस, अँड दी जिप्सी लर्न्ड टू फ्लाय, पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया, शांती की अफवाएँ, सकाळ.. जी होत नाही, श्रीराधा, ज्ञानेश्वर मुळे की कविताएँ, ही मुळे यांनी लिहिलेली पुस्तके या वेळी प्रकाशित झाली. ही पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’तर्फे ई-बुक स्वरूपात प्रकाशित करण्यात आली असून, ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर या वेळी उपस्थित होते. 

‘मुळे, वासलेकर आणि मी यांच्यात कोणते साम्य नसतानाही आम्ही सारे राष्ट्रउभारणी या एकाच शब्दाने बांधले गेलो आहोत,’ असे सांगून भागवत म्हणाले, ‘राष्ट्र म्हणून आपले अस्तित्व प्राचीन असून, जगाचे संतुलन ठेवताना माणुसकी व बंधुभावाची शिकवण हा आम्हाला जोडणारा अतूट दुवा आहे. जगाकडे पाहण्याची सकारात्मकता, त्यावरील श्रद्धा आणि आपल्या परंपरेचे भान, तसेच जगात आपण एकटे नसून आपल्यामागे हीच परंपरा चालू ठेवणाऱ्या मार्गदर्शकांची मांदियाळी उभी आहे, याचे भान मुळे यांना आहे. त्यांच्या सर्वच पुस्तकांमधून ते व्यक्त होते.’   

‘साहित्यिक व कविमनाचा सनदी अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मुळे यांना आपल्या संस्कृतीचे भान असल्यामुळेच आपल्या मातीच्या व जनतेच्या भाषेत बोलणारा प्रशासक असण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. लोककल्याणाच्या विचारांनी ते नकारशाहीला होकारशाहीची दिशा देत आहेत,’ अशा शब्दांत भागवत यांनी त्यांचे कौतुक केले. 

‘जगावर व भारतीय प्रशासनावर केवळ उच्चभ्रूंसाठी इंग्रजी पुस्तके लिहिली जात असताना मुळे यांनी ती मातृभाषेत लिहून लोकप्रिय केली आहेत,’ असे संदीप वासलेकर म्हणाले. ‘मुळे यांच्याशी माझी मैत्री मात्र पुण्यातच दृढ झाली असून, त्यामागे त्यांच्यातील राष्ट्रनिर्मितीची कळकळ हेच कारण आहे. अशा विचारांमधून मुळे यांनी दिल्लीत महाराष्ट्रातील खासदारांसाठी व लोकांसाठी सुरू केलेला ‘पहिले पाऊल’ हा उपक्रम मला भावला. महाराष्ट्रातून तिथे निवडून गेलेल्या खासदारांचे प्रशासकीय धोरणासंबंधीचे एक प्रशिक्षणच त्यांनी सुरू केले. स्वत:चा प्रशासनाचा अनुभव सर्वदूर पोहोचवण्यामागे त्यांच्यातील राष्ट्रउभारणी व राष्ट्रप्रेम या दोनच गोष्टी प्रकर्षाने जाणवतात,’ असे वासलेकर यांनी सांगितले. 

‘राष्ट्रउभारणीचे काम हे दीर्घकालीन असून, त्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे,’ असे सांगून वासलेकर म्हणाले, ‘या कामासाठी आपण देशवासी म्हणून आजचा व आत्ताचा विचार करतानाच पुढच्या पाच हजार वर्षांचा विचार करायला हवा आणि भारत हा जगातील चमकता तारा कसा राहील, हे पाहायला हवं. गेली हजार वर्षे भारतावर परकीय आक्रमणे झाली आहेत, हे मागे टाकून पुढचा विचार करायला हवा.’ 

स्वत:चा गौरव होताना आनंद व गोंधळल्याची भावना होत असल्याचे मुळे म्हणाले. ‘सनदी अधिकारी म्हणून माझा हा प्रवास जेव्हा ३५ वर्षांपूर्वी माझे गाव सोडताना सुरू झाला तेव्हा प्रकर्षाने जाणवले, की पुढे प्रचंड आकाश असून, या जगात आपण एकटे आहोत; पण लगेच माझ्या मागे मला दिसले ते साधेपणाच्या श्रीमंतीचा संस्कार करणारे माझे आई-वडील, ज्ञानेश्वगर ते जनाबाई, मुक्ताबाई, महात्मा फुले, शाहू, आंबेडकर, सावरकर, वि. स. खांडेकर ते चिं. त्र्यं. खानोलकर यांचे विचार व साहित्य. मग जाणवले, की या प्रवासात मी एकटा कधीच नव्हतो. उलट यांच्या साथीमुळे तो अधिक रोमहर्षक, उत्साही आणि आशावादी झाला. अनेक देशांतील लोकांशी गहिरे नाते निर्माण करणारे जगभर पसरलेले नात्यांचे जाळेच गेल्या ३५ वर्षांमध्ये मी विणले! पैशापेक्षा तीच माझी खरी संपत्ती असून, तो काळ काहीसा संघर्षाचा व अवघड तरी सुरम्य होता.’

‘मार्गदर्शकांची ही ऊर्जाकेंद्रे माझ्या आतमध्येही हुंदडत होती आणि मला सतत जागे ठेवत होती.’ असे मुळे म्हणाले. ‘परदेशात शिष्टाई व राजनैतिक कामे करताना मला शाहू, आंबेडकर यांच्याबरोबर फुले व लोकहितवादींचे विचार प्रेरक ठरले. जगभरात जिथे होतो, तेथील राष्ट्रप्रमुखांबरोबर आणि सामान्य माणसांशीही थेट जोडताना राजदूतापेक्षा जनदूत होता आले. अमेरिकेत न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी ‘कॉन्सुलेट अॅतट युवर डोअरस्टेप’सारखी वेगळी व पहिली योजना राबवता आली. रशियात २५ वर्षांपूर्वी इंडियन बिझनेस असोसिएशन स्थापन करू शकलो, तर मालदीवमध्ये भारतीय सांस्कृतिक मंच स्थापन करता आला. हे सारे भारताच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या भूमीतून मिळालेले संस्कार आहेत. आपला चांगला ऐतिहासिक, साहित्यिक व सांस्कृतिक वारसा जगाला सांगता आला,’ अशी कृतज्ञता मुळे यांनी व्यक्त केली. ‘शेक्सपीअर व टेनिसनपेक्षा मला आपले कालिदास व खानोलकर हेच जवळचे सहप्रवासी वाटतात,’ असेही ते म्हणाले. 

आपल्या प्रकाशित पुस्तकांबद्दल बोलताना मुळे म्हणाले, ‘यातून मी भारतीय संस्कृतीचे प्रातिनिधिक दर्शन दाखवताना भारतीय लोकशाहीची खोलवर रुजलेली मुळे, भारतातील विपुल साहित्य वारसा, बहुभाषिक श्रीमंती, वंचितांना शिक्षणाची संधी देणारा देश मांडत आलो आहे. शिक्षणाच्या या संधीतून मीही इथवर येऊ शकलो हे जगाला सांगता आले. या साऱ्या गोष्टींमुळेच भारत देश मोठा होऊन तो महासत्ता होईल. स्वत:चे समाज बदलण्याचे स्वप्न पूर्ण करताना मला हे जग जसे दिसले तसे मी लिहीत गेलो.’ 

‘येत्या एक डिसेंबर २०१८ रोजी मी निवृत्त होत असून, पुढेही देशाच्या प्रगतीसाठीच काम करणार आहे. त्यासाठी अकाशापलीकडच्या अवकाशात मुक्त विहार करताना मला सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादांची गरज आहे,’ अशी भावनिक सादही मुळे यांनी घातली.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन पत्रकार उज्ज्वला बर्वे यांनी केले. भाषा फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती राजे यांनी मुळे यांच्या साहित्याचा परिचय करून दिला; तर ‘महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी’चे सचिन ईटकर यांनी आभारप्रदर्शन केले.

(ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभाचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


(ही पुस्तके, तसेच ई-बुक्स ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link