Next
हवी उद्योजकतेची मानसिकता!...
प्रसन्न पेठे
Thursday, July 26, 2018 | 04:23 PM
15 0 0
Share this story

विशेष काहीही श्रम न करता केवळ नशिबाची साथ मिळाली म्हणून यशस्वी होणारी व्यक्ती कोट्यवधीमध्ये एखादीच असेल; पण बाकी सर्वांनाच कष्ट केल्याशिवाय उत्तम फळ मिळत नाही. कित्येकांना तर पसंतीची नोकरी तर दूरच, मुळात नोकरीच मिळणं कठीण झाल्यामुळे बेकाराचं जिणं जगण्याची पाळी येते. त्यामुळे समाजाला गरज आहे ती स्वकर्तृत्वाने काही घडवून दाखवणाऱ्या माणसांची. आणि त्यासाठी व्यवसाय करण्याची मानसिकता मराठी समाजात निर्माण करण्याची. प्रकाश भोसले यांचं ‘उद्योजकता’ हे पुस्तक याबाबतीत नक्कीच प्रेरणादायी ठरणारं... त्या पुस्तकाचा हा परिचय...   
.............
प्रकाश भोसले यांच्या ‘उद्योजकता’ या पुस्तकाचं प्रथमदर्शनी लक्षात येणारं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण पुस्तकात उजव्या बाजूच्या म्हणजे विषम संख्येच्या पानांवर (७, ९, ११, १३, १५....) मजकूर आणि सम संख्यांच्या पानांवर (६, ८,१०, १२, १४.....) खास सजावट केलेल्या चौकटींमध्ये पटकन संदेश देणारी, कमी शब्दांत खूप आशय पोहोचवणारी वाक्यं छापली आहेत. त्याचा निश्चितच प्रभाव पडतो. 

पुस्तकाच्या सुरुवातीलाच भोसले यांनी ज्यू लोकांची महती आणि मुख्य म्हणजे त्यांच्या अंगचे गुण सांगितले आहेत. हे लक्षात घेण्यासारखं आहे, की जगात सर्वांत अल्पसंख्य (०.२%) फक्त एक कोटी असलेले ज्यू लोक हे जगाच्या ७०% अर्थव्यवस्था, मिलिटरी आणि मीडिया आपल्या कब्जात ठेवून आहेत. दुसऱ्या महायुद्धात त्यांचा इतका भीषण नरसंहार होऊनदेखील त्यांना हे जमू शकलं आणि मग त्यांच्या बारा पट लोकसंख्या असणाऱ्या जगभरातल्या १२ कोटी महाराष्ट्रीयन माणसांना हे का जमू शकत नाही? जमू शकलं नाही? आपण नक्की कुठे कमी पडलो आणि पडतोय, हे भोसले यांनी सुरुवातीलाच चांगल्या प्रकारे समोर आणलं आहे. वाचकांच्या डोळ्यांत अंजन घालण्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांचंही उदाहरण दिलं आहे. त्यांनी मुघल बादशहाकडे नोकरी करून वतनदार म्हणून ऐषारामात न राहता स्वराज्यस्थापनेचं अत्यंत कठीण व्रत स्वीकारून यशस्वी केलं. म्हणून आज आपण हिंदू आणि मराठी म्हणून शिल्लक तरी आहोत.

तिसऱ्या प्रकरणात भोसले यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक असणारे अत्यंत महत्त्वाचे असे ३० गुण विशद केले आहेत. चौथ्या प्रकरणात गरिबीतून श्रीमंत बनण्याचे ४५ उपाय सांगितले आहेत.

पुढे व्यवहाराचा विचार करता जगात यशस्वी कुणाला म्हणायचं याची चर्चा करताना भोसले यांनी काही माणसांची उदाहरणं दिली आहेत. श्रीमंती आणि गरिबी यातला फरकही सांगितला आहे. गरीबीचे तोटे सांगत त्यांनी श्रीमंतीचे फायदेही सांगितले आहेत. श्रीमंत होण्यासाठी त्रास, कष्ट नक्कीच आहेतच पण हातात पैसा येतो तेव्हा श्रीमंतीचा उपभोगही घेता येऊ शकतो, हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिलं आहे. 

मराठी माणूस स्पर्धात्मक जगात मागे का पडतो, आर्थिक आघाड्यांवर मागे का राहतो, बेकारी आणि गरिबी का नशिबी येते, अशा प्रश्नांची चर्चा करताना भोसले यांनी मराठी माणसाच्या मागासलेपणाच्या ४४ कारणांची जंत्रीच दिली आहे. संकुचित मनोवृत्ती, मागास विचारपद्धती, व्यसनाधीनता, महिलांचा सहभाग आणि सन्मान कमी, खेकडा वृत्ती, कमी वाचन, कष्टाची लाज आणि जाती प्रथा, ही त्यातली अत्यंत महत्वाची कारणं! हे प्रकरण अंतर्मुख करणारं आहे. 

पुढच्या काही प्रकरणांत भोसले यांनी चाणक्य नीती, पैशाचं अनन्यसाधारण महत्त्व, ई कॉमर्स म्हणजे काय, त्याचा फायदा, करिअर काउन्सेलिंगचं महत्त्व, एमबीए करूनच यशस्वी होतात का?, निर्णयक्षमता का हवी?, आर्थिक निरक्षरता कशी घातक, आयुष्यात ध्येयाचं महत्त्व, टाइम मॅनेजमेंटचं महत्त्व, चिकाटीचं महत्त्व अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांचा ऊहापोह केला आहे. 

थोडक्यात, आयुष्यात सगळं काही हवंय, आर्थिक सुबत्ता हवीय, ऐशआराम हवाय; पण त्यासाठी मेहनत आणि कष्ट करायची तयारी नसेल तर काहीही फायदा नाही. श्रमाला, शिक्षणाला, ठोस ध्येयनिश्चितीला आणि सर्वांच्या सहकार्याने माणसं जोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याला पर्याय नाही. त्याची तयारी पालकांनी मुलांना त्याचं महत्त्व पटवून देऊन करायला हवी. तरच मराठी माणसाची प्रगती होईल, भरभराट होईल, हे भोसले यांनी अत्यंत तळमळीनं या पुस्तकातून मांडलं आहे.  

जरूर वाचावं असं हे पुस्तक.   

पुस्तक : उद्योजकता       
लेखक : प्रकाश भोसले         
प्रकाशक : ई ब्रँडिंग इंडिया टेक्नॉलॉजीज, मुंबई    
संपर्क : प्रकाश भोसले, ४०३, अलोक को-ऑप सोसायटी, प्लॉट नंबर सी-४१, शांतीनगर, मीरारोड (पू)., मुंबई
पृष्ठे : १९७
मूल्य : २२० रुपये 

(‘उद्योजकता’ हे पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Nitin Vilas Gaikwad About 233 Days ago
खूपच प्रेरणादायी पुस्तक आहे
0
0

Select Language
Share Link