Next
अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी
BOI
Friday, August 02, 2019 | 01:09 PM
15 0 0
Share this article:

पुणे : समाज घडविण्याचे काम करणाऱ्या अण्णा भाऊंना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न सन्मान द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट) केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सारसबागेसमोरील त्यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या अभिवादन महासभेत बोलताना मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांनी ही मागणी केली.

साठे म्हणाले, ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी समाज परिवर्तनासाठी आपले आयुष्य झिजवले. मातंग समाजासह इतर वंचित समाजाच्या व्यथा त्यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या. आजही मातंग, दलित समाज मागासलेला आहे. समाजाचे परिवर्तन करण्यासाठी अण्णा भाऊ यांची जन्मशताब्दी सामाजिक परिवर्तन वर्ष म्हणून साजरी करणार आहे.’ 


या वेळी शहराध्यक्ष अशोक कांबळे,  नगरसेविका सोनाली लांडगे, महाराष्ट्राचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष महेंद्र कांबळे, शहर संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, शैलेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.  


‘देशातील विविध समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना अजूनही मातंग समाज पाठीमागे राहिलेला आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचे विविध प्रश्न सोडविले पाहिजेत; तसेच समाजातील व्यक्तींनी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वाचून त्यांचे विचार अमंलात आणले, तर समाज प्रगती करेल. समाजाच्या विकासासाठी महामंडळाला भरघोस निधी सरकारने द्यावा. कर्जवाटप लवकरात लवकर सुरु करावे,’ असेही साठे यांनी नमूद केले. 

परशुराम वाडेकर म्हणाले, ‘साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची जयंती प्रत्येक कार्यकर्ता मोठ्या उत्साहात साजरी करतो; परंतु त्यांचे विचार अंमलात आणत नाही. जोपर्यंत त्यांचे विचार कार्यकर्त्यांना समजणार नाहीत, तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही. त्यामुळे अण्णा भाऊ समजून घ्यायला हवेत. त्यांच्या प्रत्येक कादंबरीत महिला नायिका होती. कारण पुरूषांबरोबर महिलांनादेखील समान हक्क मिळाले पाहिजेत, ही त्यांची भावना होती. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी आपल्या लेखणीतून आणि भाषणातून आवाज उठवला होता.’

अशोक कांबळे म्हणाले, ‘रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यामध्ये अण्णा भाऊंचे साहित्य आणि त्यांचा जीवनप्रवास तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.’

महिपाल वाघमारे व बाबुराव घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा कांबळे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search