Next
सूर्यमंदिरात विराजमान होणार दगडूशेठ गणपती
दगडूशेठ ट्रस्टच्या १२७व्या वर्षाचे औचित्य; सजावटीला प्रारंभ
प्रेस रिलीज
Tuesday, June 11, 2019 | 11:39 AM
15 0 0
Share this article:

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावट शुभारंभ सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर.

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने ट्रस्टच्या १२७व्या वर्षानिमित्त गणेशोत्सवात ओडिशा राज्यातील जगप्रसिद्ध कोणार्कचे सूर्यमंदिर साकारण्यात येणार आहे. यंदाची संकल्पना भारताच्या प्राचीन वेद, पुराणे, शास्त्रे यांवर आधारित आहे. त्यामुळे या गणेशोत्सवात दगडूशेठ ट्रस्टतर्फे साकारण्यात येणारी ही प्रतिकृती भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. या वर्षीच्या सजावटीच्या शुभारंभ सोहळा शिल्पकार विवेक खटावकर व वैशाली खटावकर यांच्या हस्ते पार पडला. 

सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात झालेल्या कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, दत्तोपंत केदारी, कुमार वांबुरे यांसह सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 


या विषयी माहिती देताना अशोक गोडसे म्हणाले, ‘गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील आहे. सूर्याच्या प्रभात, माध्यान्य आणि सायंकालीन अवस्थांचे मनोहारी दर्शन तसेच १२ आदित्य आणि सूर्यास प्रिय असलेल्या कमल, पुंडरिक आणि उत्पालांच्या लता-वेलींच्या डौलदार नक्षींनी व्यापलेले मंदिर भाविकांना यंदा पाहता येणार आहे. अनेक स्तंभ, मालांची तोरणे आणि सिंह, कीर्तिमुख, हंस, यक्ष, सुरसुंदरी आणि आकाशगामी गंधर्वांनी मंदिर सजविले जाणार आहे. सोन्यासारख्या प्रकाशाने व्यापलेले मंदिर गजांत लक्ष्मीने नटलेले असणार आहे. समृद्धीचे प्रतिक असलेले हत्ती, अरुणाच्या सारथ्याने प्रचंड सूर्यरथाचे धावणारे अश्व व रथचक्र हे असणार आहेत.’ 


‘मंदिराच्या प्रतिकृतीमध्ये अनेक स्तंभी पद्मपीठाच्या सुवर्णी सिंहासनावर श्रींची मूर्ती विराजमान होईल. सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानासमोरील सजावट विभागात सजावटीचे काम सुरू झाले असून, अनेक कारागीर यासाठी दिवसरात्र काम करणार आहेत. शिल्पकार विवेक खटावकर हे मंदिराचे काम करीत आहे,’ असे गोडसे यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search