Next
गुरुजी नागपुरात, यजमान अमेरिकेत; ‘गुगल ड्युओ’च्या साह्याने धार्मिक विधी
BOI
Sunday, March 25, 2018 | 12:00 AM
15 0 0
Share this story

नागपूर : तंत्रज्ञानाने जग जवळ आले आहे, हे वाक्य अलीकडे सारखे ऐकायला, वाचायला नि अनुभवायलाही मिळते. तशीच एक घटना नुकतीच घडली. नागपुरातील युवा पुरोहित नचिकेत काळे यांनी नागपुरात बसून अमेरिकेतील जोशी दाम्पत्याच्या मुलाच्या जावळ काढण्याच्या विधीचे पौरोहित्य केले. गुगल ड्युओच्या साह्याने हा विधी यथासांग पार पडला. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या मदतीने परंपरा जपण्याचे समाधान या गुरुजींना आणि जोशी कुटुंबीयांना मिळाले आहे.

परंपरागत चालत आलेल्या धार्मिक विधींमध्ये काळानुसार आवश्यक ते बदल केले जाऊ लागले आहेत. त्याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल. मूळचे हैदराबादचे असलेले श्रवण जोशी आणि त्यांची पत्नी हे दाम्पत्य सध्या अमेरिकेतील कॅरोलिना प्रांतात वास्तव्याला आहे. त्यांना मुलगा ध्रुवचे जावळ काढण्याचा विधी करायचा होता; मात्र अमेरिकेत पौरोहित्य करणारे कुणी नव्हते. मग त्यांनी भारतात संपर्क साधला. नागपूरचे नचिकेत काळे यांनी जावळासाठीचा विधी ऑनलाइन करण्याची तयारी दाखविली. त्यानुसार गुढीपाडव्याच्या दिवशीचा मुहूर्त ठरला. अमेरिकेत असलेल्या यजमान जोशी दाम्पत्याला नचिकेत गुरुजींनी नागपुरातून इंटरनेटच्या साह्याने ‘गुगल ड्युओ’च्या माध्यमातून सूचना देऊन, जावळ काढण्याच्या विधीचे पौरोहित्य केले. हा विधी पावणेदोन तास चालला. यजमान सातासमुद्रापार असले, तरी तंत्रज्ञानामुळे तसे जाणवले नाही. जणू समोर बसूनच विधी सांगत असल्याप्रमाणे संपूर्ण कार्यक्रम यथासांग पार पडल्याची प्रतिक्रिया काळे यांनी व्यक्त केली. यजमान जोशी यांनीही इंटरनेटच्या माध्यमातून हा विधी करणे सोयीचे ठरल्याची भावना व्यक्त केली.

नचिकेतशास्त्री काळे २६ वर्षांचे असून, अकोला येथील प्रल्हाद आश्रम चतुर्वेद पाठशाळेत सात वर्षे राहून त्यांनी वैदिक शिक्षण घेतले. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शालेय शिक्षणही तेथेच घेतले. यापूर्वी २०१०मध्ये काळे यांनी शिकागो आणि बेंगळुरू येथील यजमानांना स्काइपच्या माध्यमातून पूजा सांगितली होती. ‘लोकांच्या मागणीनुसार आता स्वत:चे वेब पोर्टल काढण्याचा विचार सुरू आहे,’ असे काळे यांनी सांगितले.

(परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घालणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link