Next
मुहब्बत ऐसी धडकन है...
BOI
Sunday, September 30, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी २८ सप्टेंबर २०१८ रोजी नव्वदीत पदार्पण केले. त्यांनी गायलेल्या हजारो सुंदर गाण्यांनी भारतीयांच्या मनावर अधिराज्य केले आहे. ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यापैकीच एका गीताचा... ते गीत आहे ‘अनारकली’ चित्रपटातील ‘मुहब्बत ऐसी धडकन है...’
.........
२८ सप्टेंबर २०१८ रोजी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नव्वदीत पदार्पण केले. ‘सुनहरे गीत’ सदरात त्यांनी गायलेल्या अनेक गीतांचा समावेश आहे. हजारो ‘सुनहरी गीते’ गायलेल्या या गायिकेच्या गीतांना वगळून ‘सुनहरे गीत’चे लेखन कधी होऊ शकेल का? त्या आवाजाची, स्वराची पातळी, उंची, लवचिकता इत्यादींबद्दल काही सांगण्याची माझी प्रज्ञा नाही. 

आणि त्या स्वरांच्या मालकिणीबद्दल म्हणजे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याबद्दल काही लिहावे म्हटले, तर....?

संगीतकार प्यारेलाल यांनी एका मुलाखतीत सांगितलेला प्रसंग आठवतो. निर्माते-दिग्दर्शक गुलजार हे ‘मीरा’ चित्रपटाची निर्मिती करत होते, त्या वेळची गोष्ट - त्या चित्रपटासाठी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल हे संगीत देणार होते. त्यांनी लतादीदींना गायला बोलावले. तेव्हा दीदी म्हणाल्या, ‘मी मीराबाईंच्या रचना एवढ्या गायल्या आहेत, की आता पुन्हा मी वेगळे काय गाऊ?’ पुढे तो चित्रपट लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी सोडला. 

हा प्रसंग सांगण्याचा उद्देश हा, की जसे दीदी तेव्हा म्हणाल्या, त्याप्रमाणे मलाही असे म्हणावेसे वाटते, की गेल्या पन्नास वर्षांत लता मंगेशकर या व्यक्तिमत्त्वाबद्दल, या गायिकेबाबद्दल मोठमोठ्या लेखकांनी, कलावंतांनी लिहिलेले मी एवढे वाचले आहे, की मी त्यांच्याबद्दल आणखी वेगळे काय लिहावे? 

मला त्यांची गाणी आवडत होती, आवडत आहेत व आवडत राहणार आहेत. त्यांनी गायलेली गीते अन्य कोणी गायली, तर ती ऐकताना लतादीदींच्या आवाजाचे महत्त्व जास्त जाणवते. त्यांच्या स्वरांची जादू केवळ भारतीयांवर नाही, तर जगभरातील लोकांवर आहे. त्यामुळेच लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये गाण्याचा कार्यक्रम सादर करणाऱ्या त्या पहिल्या आशियाई कलावंत ठरल्या! अनेक देशांनी त्यांना नागरिकत्व बहाल केले. इंग्लंडच्या राणी, अमेरिकेचे अध्यक्ष त्यांना भेटीचे खास आमंत्रण देतात. अल्बर्ट हॉलमधील त्यांच्या कार्यक्रमाची सहा हजार तिकिटे पाकिस्तान वकिलातीने घेतली होतो. पॅरिस, कॅनडा, जर्मनी येथून माणसे विमानाने तेथे आली होती. 

लतादीदींच्या लोकप्रियतेचे हे असे अनेक प्रसंग आहेत. परंतु आज ज्या स्थानाला त्या पोहोचलेल्या आहेत, त्यामागे त्यांचे प्रचंड परिश्रम आहेत. गळ्याची श्रीमंती त्यांच्याजवळ आहे. त्यांच्या वडिलांकडून मिळालेला वारसा आणि निसर्गदत्त अशी स्वरांची देणगी... केवळ एवढे असून भागात नाही. असे म्हणतात, की झरा वाहता हवा, गळा गाता हवा! लतादीदींनी रियाज, सराव यात कोठेही कामचुकारपणा केला नाही. चार वर्षांची लता पहाटे उठून रियाज करायची, हे वाचल्यावर त्या या पदावर कशा पोहोचल्या हे लक्षात येते. 

दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे गाण्यावरची निष्ठा! ध्वनिमुद्रण स्थळ आणि रंगमंच याला त्या मंदिरच समजतात. तेथे सरस्वतीचा वास असतो, असे त्या म्हणतात. त्यामुळेच तेथील पावित्र्य त्या पाळतात. तेथे जाताना त्यांच्या पायांत चपला नसतात. लंडन येथील कार्यक्रमाच्या वेळी तेथील प्रचंड थंडीची पर्वा न करता रंगमंचावर त्या अनवाणीच वावरत होत्या.  

लतादीदींची गाणी हा एक प्रचंड मोठा विषय आहे. त्यामुळे त्या आणि त्यांची गाणी यावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांच्या जीवनावरील पहिले पुस्तक लिहिण्याचा बहुमान लेखक वसंत भालेकर यांना लाभला आहे. ‘स्वरलता’ हे त्या पुस्तकाचे नाव आहे. त्या पुस्तकावरून कळते, की गायन एवढी एकाच कला दीदींजवळ नाही, तर त्यांना चित्रकलेचाही शौक आहे. त्या अळूची भाजीही उत्तम बनवतात. कॅमेरा घेऊन फोटोग्राफीमध्ये त्या निष्णात आहेत. लतादीदींना संगीताची जेवढी समज आहे, तेवढीच साहित्याचीही समज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, भा. रा. तांबे, आरती प्रभू, राजा बढे, गोंविंदाग्रज, ग्रेस, शांता शेळके यांच्या कविता गाताना त्यांची ही समज उत्कटपणे व्यक्त होते. 

लतादीदी चित्रपट क्षेत्रात गायिका म्हणून जास्त परिचित असल्या, तरी चित्रपट निर्मिती, तसेच संगीत नियोजन या क्षेत्रातही त्यांनी कार्य केले आहे. आणि जुन्या मराठी चित्रपटात त्या पडद्यावरही दिसतात. 

अशा या महान व्यक्तिमत्त्वाला परमेश्वराने आरोग्यपूर्ण दीर्घ आयुष्य द्यावे, या शुभेच्छा देऊन त्यांच्या एका ‘सुनहऱ्या’ गीताकडे वळतो! हिऱ्या-माणकांच्या भांडारातील एक हिरा काढून तो उत्कृष्ट आहे हे सांगायचे काम जसे अवघड, तसेच लतादीदींचे एक सुनहरे गीत निवडायचे म्हणजे अवघडच आहे; पण विचार करून एका गीताकडे मी वळतो. 

चित्रपट फिल्मिस्तानचा ‘अनारकली!’ संगीत सी. रामचंद्र आणि गीतकार हसरत जयपुरी! दुर्मीळ कलावंतांचे एकत्र येणे! अनारकली चित्रपट अर्थातच सलीम-अनारकलीच्या प्रेमावरचा! आणि अशा कथानकातील प्रीती म्हणजे काय हे सांगण्यासाठी हसरत जयपुरी यांच्यातील प्रतिभासंपन्न शायर अप्रतिम रचना करून जातो, ते अस्सल बावनकशी सोने असते. सी. रामचंद्र यांच्यासारखा संगीतकार त्या सोन्याचा, ‘लता मंगेशकर’ या सात अक्षरांच्या साह्याने एक उत्कृष्ट दागिना तयार करतो. तो अप्रतिम, अनमोल दागिना अर्थात ते गीत कित्येकदा ऐकूनही पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. 
या गीताची सुरुवातच लतादीदींच्या मधुर स्वरातील ध्रुवपदाने होते. त्या गातात - 

इस इंतजार-ए-शौक को जलवे की आस है 
इक शमा जल रही है, वो भी उदास है

माझ्या या प्रतीक्षेच्या शौकाला तुझ्या दर्शनाची इच्छा आहे. (तुझ्यावरील प्रेमाखातर मी) एका दीपकळीप्रमाणे जळत आहे (पण तुझ्या दर्शनाअभावी मी) पण उदास आहे. 

एवढी प्रस्तावना झाल्यावर पुढे गीत सुरू होते - 

मुहब्बत ऐसी धडकन है, जो समझाई नहीं जाती 
जुबाँ पर दिल की बेचैनी कभी लाई नहीं जाती

प्रीती म्हणजे हृदयाचे स्पंदन (आणि हे स्पंदन चार समजुतीच्या गोष्टी) सांगून शांत करता येत नाही. याच ओळीतून असाही अर्थ निघू शकतो, की प्रेम ही हृदयाची अशी धडधड असते, की ती काय आहे, कशी आहे, हे कोणालाच समजावून सांगता येत नाही. प्रीतीमुळे अस्वस्थ होणारी मनाची भावना जिभेद्वारे सांगता येत नाही. (ती भावना शब्दातीत असते) 

प्रेमात पडल्यानंतर होणारी ही मनाची अवस्था अशा पद्धतीने काव्यात बद्ध केल्यावर समीप नसलेल्या आपल्या प्रियकराला ती तरुणी सांगते -

चले आओ, चले आओ तकाजा है निगहों का 
किसी की आरजू ऐसे तो ठुकराई नहीं जाती 

माझ्या नजरेचा तगादा आहे, (वारंवार सांगणे आहे) की ‘ ये, सत्वर ये! (तुझ्या दर्शनासाठी माझे नेत्र अधीर झाले आहेत. तू माझ्या सांगण्याप्रमाणे लवकर येणेच योग्य. कारण अरे प्रियकरा) कुणाचीही (प्रामाणिक) इच्छा (त्याच्या जवळच्या माणसांकडून) अशी-तशी अव्हेरली जात नाही. (पुरी केली जात नाही असे घडत नाही.) 
  
प्रियकराची वाट पाहणारी ती पुढे म्हणते - 

मेरे दिल ने बिछाए है सजदे आज राहों में 
जो हालत आशिकी की है वो बतलाई नहीं जाती

तू येण्याच्या रस्त्यावर मी (मनापासून/हृदयापासून) हजार वेळा नतमस्तक झाले आहे (अर्थात, तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले आहे.) माझ्या आशिकी वृत्तीची (प्रेमभावना) जी हालत (दुर्दशा) (तुझ्या विरहामुळे झालेली अवस्था) झाली आहे, ती मी शब्दांनी व्यक्त करू शकत नाही. 

प्रियकराची वाट पाहणाऱ्या प्रेमिकेच्या भावना हसरत जयपुरींनी दोन-दोन ओळींच्या कडव्यांमधून अलंकारिक भाषेत मांडल्या आहेत. ते लक्षात घेऊनच लतादीदींनी हे गीत ज्या तन्मयतेने गायले आहे, ते अप्रतिम आहे. पडद्यावर अनारकली बनलेल्या बीना रॉयचे सौंदर्य आणि लतादीदींच्या आवाजाचे सौंदर्य. या दोन्हींतून सजलेला ‘फिल्मिस्तान’चा अनारकली, त्यातील गीतांमुळेच इतक्या वर्षांनंतरही लक्षात राहतो. त्यामध्ये सी. रामचंद्रांच्या संगीताचाही वाटा आहे. 

लतादीदींच्या गाण्यांमुळे कित्येक संगीतकार, वादक, नायिका यांचे भाग्य उजळलेच; पण काही सिनेमांचेही भाग्य उजळले! अशा लतादीदी म्हणजे परमेश्वराचा एक चमत्कारच व तो आपल्या महाराष्ट्रात घडला हे आपले भाग्य!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
जनार्दन अनपट About 287 Days ago
फारच छान
0
0

Select Language
Share Link
 
Search