Next
पंढरीत साकारतोय चित्ररूप संतमेळा
मोहन काळे
Thursday, July 12, 2018 | 01:46 PM
15 0 0
Share this article:सोलापूर :
श्री क्षेत्र पंढरपूर येथे आता चित्रमय संतमेळा साकारत आहे. सध्या येथील यमाई तुकाई तलावाच्या काठावर ‘नमामि चंद्रभागा योजने’अंतर्गत तुळशी उद्यानाच्या निर्मीतीला वेग आला आहे. येथील अडीच एकर क्षेत्रातील काही भागावर हे उद्यान वसविले जात असून, त्यासाठी शासन साडेआठ कोटी रुपये खर्च करणार आहे. त्याच्या संरक्षण भिंतीवर २१ संतांच्या चरित्राची चित्रमालिका साकारण्यात येत आहे. मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी ही चित्रे काढत आहेत. त्यामुळे विठूरायाच्या पंढरीत येणाऱ्या भाविकांना आता चित्रमय संतमेळ्याचा अनुभव घेता येणार आहे. नमामि चंद्रभागा प्रकल्पातील या उद्यानाच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने पुढाकार घेतला आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी या कामाचा सातत्याने आढावा घेत आहेत. यमाई तलावाच्या काठावर ११ जुलै रोजी फेरफटका मारला असता, कामे युद्धपातळीवर सुरू असल्याचे दिसून आले. मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’चे सुमारे १५ विद्यार्थी कामात व्यग्र आहेत. ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’चे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. शशिकांत काकडे, प्रा. विजय बोंदर, प्रा. नितीन मेस्त्री, प्रा. शशांक माशेलकर आणि विद्यार्थी सुनील निनगुळे, सिबी सॅम्युअल, स्वप्नील जगताप, चंद्रकांत हल्याळ, गणेश आठवले, आकाश काशिद, अभिजित पाटोळे, कुमार मिसाळ, कपिल गढरी, अजय माळी, प्रतीक राऊत, अक्षय माने, प्रसाद मेस्त्री, सूरज कांबळे, नंदकिशोर खेडेकर, व्यंकटेश शिंदे, कृष्णा पंडित ही टीम दररोज सकाळी आठ ते रात्री नऊ एवढा वेळ चित्रे काढत आहे. यमाई-तुकाई तलावाच्या काठावरील संरक्षण भिंतीवर २१ संतांची चरित्रदृश्ये यात साकारली जात आहेत. यासाठी या कलाकारांनी चार महिने संतचरित्रांचा अभ्यास केला आहे. संत अभ्यासकांशी चर्चा करूनच या कामाला सुरुवात केली असल्याचे चंद्रकांत हल्याल यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले. सात बाय सत्तावीस फूट एवढ्या भव्य आकारात एका संताच्या चरित्रातील प्रसंग साकारला जाणार आहे. अशा प्रकारे २१ संतांची चरित्रदृश्ये येथे साकारली जाणार आहेत. २९ जूनपासून या कामाला सुरुवात झाली असून, कार्तिकी वारीपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. हे उद्यान श्री यंत्राच्या आकाराचे असून, या उद्यानात सुमारे २५ फूट उंचीची विठूरायाची मूर्ती, संत ज्ञानोबा-तुकाराम पालखी रथ व रिंगण, तुळशीच्या आठ प्रजातींची लागवड, वारकरी महिलेचे शिल्प, तसेच आठ प्रमुख संतांच्या मार्बलकोटिंग मूर्ती, धबधबा आणि खुले सभागृह आदी बाबींचा समावेश आहे. आषाढी व कार्तिकी वारीला मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात येत असतात. इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही. त्यामुळे या तलावाच्या काठावर भव्य विठ्ठल मूर्ती व आठ संतांची मंदिरे साकारण्यात येत आहेत. त्यांचे दर्शन भाविकांना घेता येईल. शिवाय या उद्यानाच अँफी-थिएटरही सुरू होणार असल्याचे तत्कालीन वनक्षेत्रपाल राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. ते झाल्यावर या ठिकाणी भाविकांना भजन-कीर्तन व आरती करण्याचा लाभ घेता येऊ शकेल.

(या चित्रमय संतमेळ्याची झलक आणि अधिक माहितीसाठी पाहा सोबतचा व्हिडिओ.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
अशोक गायकवाड About
छान बातमी
0
0
Ciby Samuel About
Good team work
0
0
दत्ता रोकडे About
खूपच छान बातमी आणि उपक्रम
0
0
श्री.शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालय , रोपळे बुद्रूक ता . पंढरपूर About
आम्ही इलिमेन्ट्री ग्रेड परिक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी सर जे .जे. आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांची भेट घेवून त्यांच्याकडून चित्रकला व शिल्पकलेची माहिती घेणार आहोत . ही ग्रेट भेट बाईट्स ऑफ इंडियाच्या बातमीमुळेच होणार आहे .
1
0

Select Language
Share Link
 
Search