Next
‘रोजनिशी उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य’
भिवंडी महापालिका आयुक्त मनोहर हिरे यांचे प्रतिपादन
मिलिंद जाधव
Saturday, May 04, 2019 | 04:51 PM
15 0 0
Share this article:


भिवंडी : ‘विद्यार्थ्यांनी त्यांच्या पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अन्य उपक्रमांमध्ये भाग घेणे व याकामी त्यांना शिक्षकांनी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांना चौफेर वाचन करून, लिखाणाची सवय करणे आवश्यक आहे. रोजनिशी उपक्रम हा शाळाबाह्य उपक्रमाचा एक भाग आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य आहे,’ असे प्रतिपादन भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त मनोहर हिरे यांनी केले.

शाळाबाह्य उपक्रमांतर्गत महानगरपालिकेच्या मराठी शाळेतील ३२ मराठी शाळांमधून ३२ शिक्षकांनी गेल्या वर्षी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू केला होता. व्यक्तिमत्त्व विकास रोजनिशी लिखाण कार्यक्रमाचे प्रथम वर्षीय स्नेहसंमेलन भिवंडी महापालिका व भाग्यश्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हलारी विसा ओसवाल पदवी महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  

या वेळी व्यासपीठावर महापालिका अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब, मेजर सुभाष गावंड, ग्रंथाली प्रकाशनचे सुदेश हिंगलासपूरकर, हलारी विसा ओसवाल, पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्नेहल दोंदे, भाग्यश्री फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र खेर, भाग्यश्री फाउंडेशनच्या संचालिका शिल्पा खेर, नवभारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर विवेक जोशी, जागतिक कीर्तीचे शल्य विशारद डॉक्टर विनायक श्रीखंडे, महानगरपालिका शिक्षणविभाग उपायुक्त पंढरीनाथ वेखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

हिरे म्हणाले, ‘महापालिकेच्या शाळेतील मुलांची गुणवत्ता चांगल्या प्रकारे वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहे. रोजनिशीसारख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. विद्यार्थ्यांना मानसिक स्तरावर व्यक्त होण्याचा एक उपक्रम दिल्याबद्दल भाग्यश्री फाऊंडेशनचे त्यांनी आभार मानले. हा उपक्रम पुढील दोन वर्षे शाळेतून राबविण्यात येईल.  शाळाबाह्य उपक्रमात स्पर्धा परीक्षा, सैनिकी शिक्षणाचे तोंडओळख, क्रीडा विभाग, अर्थकारण याची जाणीव विद्यार्थी वर्गाला असणे आवश्यक आहे. महानगरपालिका शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सकारात्मक मनोबल तयार करावे तरच महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यास मदत होईल व त्याचा पर्यायाने फायदा समाजाला होईल.’ महापालिकेचे शिक्षक करत असलेल्या विशेष परिश्रमाचे हिरे यांनी कौतुक केले. 


अतिरिक्त आयुक्त रणखांबे यांच्या कल्पनेतून शाळाबाह्य उपक्रमांतर्गत मुलांचा सर्वांगीण विकास हा उपक्रम राबवण्यात आला. या वेळी बोलताना ते म्हणाले, ‘मुलांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास होणे, त्यांच्या भावना व्यक्त होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांचे अवांतर वाचन व लिखाण याची आवड निर्माण करून सकारात्मक भावनिक बदल घडवून आणणे व  विद्यार्थ्यांचा मनातील भावनांचे संतुलन राखणे आवश्यक आहे.’ 

विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षकांचे वेगवेगळ्या स्तरावर प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ. स्नेहल दोंदे यांनी व्यक्त केले. भाग्यश्री फाउंडेशनच्या या अभिनव उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी जागतिक कीर्तीचे शल्यविशारद डॉ. विनायक श्रीखंडे व त्यांचे शिष्य विवेक जोशी यांनी ‘शिक्षक व विद्यार्थ्यांमधील संवाद’ यावर मार्गदर्शन केले. मेजर सुभाष गावडे यांनी सैनिकीशाळा उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. ग्रंथाली प्रकाशनचे हिंगलासपूरकर यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. 

शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये रोजनिशी उपक्रमामुळे एक भावनिक नाते तयार झाले आहे, ते टिकवणे गरजेचे आहे. रोजनिशी लिखाण हा अभिनव उपक्रम असल्याचे भाग्यश्री फाउंडेशनच्या संचालिका शिल्पा खेर यांनी सांगितले. शाळाबाह्य उपक्रम चांगल्या प्रकारे राबविल्याबद्दल  ‘भाग्यश्री’च्या सोनाली देशमुख व सर्व शिक्षा अभियानाचे शिक्षक महेंद्र बोबडे, सुजाता भोईर, शंकर पाटील, वंदना कुंभार, मीनाक्षी खर्चे, रोहित धूम, जयश्री सुरवसे आदी शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 

सूत्रसंचालन महेंद्र बोबडे व शिल्पा खेर यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search