Next
वसंत कानेटकर, माधव मनोहर
BOI
Tuesday, March 20, 2018 | 12:24 PM
15 0 0
Share this article:

अनेक अभिनेत्यांना ज्यांच्या नाटकांमुळे विशेष ओळख मिळाली असे अग्रगण्य नाटककार आणि लेखक वसंत कानेटकर आणि ज्यांच्या समीक्षेतून योग्य मूल्यमापन होईल, असा विश्वास भल्या भल्या अभिनेत्यांना वाटायचा असे थोर नाट्यसमीक्षक माधव मनोहर यांचा २० मार्च हा जन्मदिन. आजच्या दिनमणीमध्ये त्यांच्याविषयी....
...... 
वसंत शंकर कानेटकर

२० मार्च  १९२० रोजी रहिमतपूरमध्ये जन्मलेले वसंत शंकर कानेटकर हे मराठीतले अग्रगण्य नाटककार! त्यांनी सुरुवातीच्या काळात कथा-कादंबऱ्या लिहिल्या; पण त्यांचा ओढा नाटकांकडेच राहिला. ‘वेड्याचं घर उन्हात’ या पहिल्याच नाटकापासून त्यांना लोकप्रियता मिळाली आणि पुढे तब्बल ४३ नाटकं त्यांनी लिहिली आणि प्रेक्षकांनी सर्वच नाटकांना भरभरून प्रतिसाद दिला. त्यांच्या नाटकाचे हजारोंनी प्रयोग झाले.

त्यांच्या नाटकांतून जाणवणारं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या नाटकातल्या विषयांचं वैविध्य!! ऐतिहासिक नाटकं, कौटुंबिक नाटकं, व्यक्तिरेखांमधला संघर्ष मांडणारी नाटकं, सुखात्मिका, संगीतिका असे कितीतरी प्रकार त्यांनी लीलया हाताळले. त्यांची नाटकं करून अनेक अभिनेते घडले असं म्हणता येईल.

रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, जिथे गवतास भाले फुटतात! - सारखी मनांत घर करणारी ऐतिहासिक नाटकं, सूर्याची पिल्ले, प्रेम तुझा रंग कसा?, प्रेमाच्या गावा जावे, छूमंतर यांसारखी हलकीफुलकी नाटकं, बेईमान, अश्रूंची झाली फुले  यांसारखी संघर्ष मांडणारी नाटकं, हिमालयाची सावली, गगनभेदी यांसारखी भव्य व्यक्तिरेखा मांडणारी नाटकं, मत्स्यगंधासारखं सुरेख पौराणिक संगीत नाटक, लेकुरे उदंड झाली सारखं संगीतमय नाटक आणि अखेरचा सवाल सारखं काळजाला भिडणारं नाटक अशी त्यांची अफाट गाजलेली नाटकं! 

याशिवाय त्यांनी तिथे चल राणी, रमाई, घर, मी माझ्याशी, पोरका आणि पंख अशा कादंबऱ्या लिहिल्या. १९७१ सालच्या मराठी नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसंच १९८८ सालच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. १९९२ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. ३० जानेवारी २००१ रोजी त्यांचा मृत्यू झाला. 
...........

माधव मनोहर 

२० मार्च १९११ रोजी नाशिकमध्ये जन्मलेले माधव मनोहर वैद्य हे थोर समीक्षक, नाटककार आणि लेखक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी पवन या टोपणनावानंही काही लेखन केलं होतं. त्यांची समीक्षा अत्यंत परखड असायची आणि त्यांच्या समीक्षेतून आपल्या कामाबद्दल जाणून घेण्याची भल्याभल्या अभिनेत्यांना उत्सुकता असायची.

त्यांनी अनेक उत्तमोत्तम इंग्लिश साहित्य मराठीत आणलं. केसरी, नवशक्ती, रत्नाकर, सोबत, रसरंग सारख्या वर्तमानपत्रांतून आणि नियतकालिकांमधून त्यांचं लेखन प्रसिद्ध होत असे. अन्नदाता, आशा, एक आणि दोन, किल्ली, क्लिओपॅट्रा, पंचमवेध, मधुचंद्राची रात्र, मुलांची शाळा, स्मृतिरंग असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१९९० साली साताऱ्यामध्ये झालेल्या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १६ मे १९९४ रोजी त्यांचा मृत्यू झाला. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search