Next
सोलापूर जिल्ह्यात बैलपोळा उत्साहात साजरा
BOI
Monday, September 10 | 11:58 AM
15 0 0
Share this storyसोलापूर :
सोलापूर जिल्ह्यात रविवारी (९ सप्टेंबर २०१८) बैलपोळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला. या वेळी शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या सर्जा-राजाची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. हलगीचा कडकडाट व फटाक्यांच्या आतषबाजीने शेतशिवार दणाणून गेले होते.   गावोगावी दिवसभर आनंदाचे वातावरण होते. शनिवारी बैलांच्या खांदेमळणीचा दिवस होता. त्या दिवशी शेतकऱ्यांनी गोडेतेल व हळदीने बैलांच्या खांद्यांचे मालीश करून त्यांना गूळ-ज्वारीचा खिचडा खायला दिला. बैलपोळ्याच्या दिवशी भल्या सकाळपासूनच बैल व इतर जनावरांना स्वच्छ करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती. दुपारी परिसर देवता व ग्रामदेवतांचे पूजन झाले. त्यानंतर बैलांना सजवून त्यांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. काही शेतकरी एकत्रित मिरवणूक काढत होते, तर काही शेतकऱ्यांनी वैयक्तिक मिरवणूक काढली. हलगीच्या व फटाक्यांच्या आवाजाने वातावरण दणाणून गेले होते. जनावरे व बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा वर्षातील सर्वांत मोठा सण असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाची हौस भागवण्यात जराही कसर ठेवली नाही. रोपळे गावात ग्रामदैवत श्री हनुमानाच्या दर्शनाने बैलांच्या मिरवणुकांची सांगता झाली. त्यानंतर बैलांची पारंपरिक पद्धतीने पूजा करून त्यांना पुरणपोळीचा घास भरवण्यात आला. रात्री शेतकऱ्यांनी सहकुटुंब व आप्तेष्टांसह पुरणपोळी व गव्हाच्या खिरीच्या मेजवानीचा आस्वाद घेतला.‘बैलजोडीमुळेच मला गावात मान-सन्मान मिळाला. बैलांनी मला बक्कळ पैसाही मिळवून दिला. त्यामुळे आजच्या दिवशी आम्ही त्याची हौस करण्यासाठी कधीच मागे-पुढे पाहत नाही,’ अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया अक्षय सुतार या शेतकऱ्याने व्यक्त केली. 

(बैलपोळ्याचा व्हिडिओ सोबत देत आहोत. बहिणाबाईंची पोळा ही कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link