Next
संगीतातले ‘एफएक्यू’ज - भाग एक
BOI
Tuesday, February 12, 2019 | 06:45 AM
15 1 0
Share this story


संगीत शिकत असलेल्यांना आणि नसलेल्यांनाही अनेकदा संगीताबद्दल काही मूलभूत प्रश्न सतत पडतात. या ‘एफएक्यू’ची (फ्रिक्वेटली आस्क्ड क्वेश्चन्स) उत्तरं वेळीच आणि योग्य मिळाली पाहिजेत. अन्यथा संगीतातल्या निखळ आनंदाला मुकावे लागू शकते... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत संगीतातील ‘एफएक्यू’बद्दल...
.........................................
‘अहो मला हार्मोनिअम शिकायची आहे. किती दिवसांत येईल मला गाणी वाजवायला?’ 
‘मला काही शास्त्रीय संगीत नाही शिकायचंय आणि परीक्षाही द्यायच्या नाहीत; पण टीव्हीवर ती चाळिशीच्या वरच्या लोकांसाठी स्पर्धा आहे ना, त्यात भाग घ्यायचाय. त्याची तयारी करून घ्याल?’
‘मला लहानपणापासून वाटायचं, कोणतं तरी वाद्य शिकावं.. मला सतार वाजवता येईल?’
‘माझी मुलगी खूप छान गाणी म्हणते. तिच्या शाळेत परवा स्पर्धा आहे. तबलजी म्हणतात, तिचं गाणं तालात येत नाही. तुम्ही तालात बसवून द्याल?’
‘आमच्या मंडळाने भजन स्पर्धेत भाग घेतलाय. ते सुरुवातीचे आलाप का काय म्हणतात ना, ते फक्त तुम्ही शिकवाल?’
‘आमची तबल्याबरोबर प्रॅक्टिस होत नाही हो. त्यामुळे गाताना ताल चुकतो.. याला काय करायचं?’
‘आमची मुलगी गाणं शिकते आहे. तिनं काय काय खाणं वर्ज्य केलं पाहिजे? मी सांगितलं तिला, तुला आता वडे, सामोसे, लोणचे, आइस्क्रीम काही काही खाता येणार नाही.. हो की नाही?’
‘मला ना स्टेजवर उभं राहून, हातात माईक घेऊन गाणं म्हणायचंय. बाई म्हणतात तू खूप हळू आवाजात गातेस. आता माइक असल्यावर कशाला मोठ्यानं म्हणायचं ना?’

असे अनेक प्रश्न लोकांकडून नेहमी विचारले जातात. गेल्या पन्नास वर्षांत मला अशा प्रश्नांची आता सवय झाली आहे. त्यांचंही बरोबरच आहे म्हणा. ज्या क्षेत्राशी त्यांचा संबंधच आला नाही, त्याबद्दल असे प्रश्न पडणारच. ज्यांना केवळ हौस म्हणून, छंद म्हणून गावंसं वाटतं, त्यांच्या बाबतीत ठीक आहे. त्यांना सगळे गुन्हे माफ; पण कधीही काहीही न शिकता, एकदम स्पर्धेत भाग घेणं किंवा माइक हातात घेऊन एकदम स्टेजवर गायची इच्छा धरणं, म्हणजे नुकतीच गाडी चालवायला शिकलं आहे आणि लगेच कार रेसमध्ये भाग घ्यायला जाण्यासारखं आहे. आपल्याला त्यासाठी काहीतरी शिकायला हवं, आवाजाला वळण द्यायला हवं, एवढं तरी समजून घेतलं पाहिजे. त्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. 

आपण डॉक्टरकडे गेल्यावर असं म्हणू शकतो का, की मला आत्ता पहिला महिना सुरू आहे, पण नऊ महिन्यांपर्यंत थांबायला मला काही वेळ नाही. यात काही शॉर्टकट नाही का? किंवा एखाद्याने आज आंब्याची झाडं लावली आहेत आणि त्याला वाटतंय की पुढच्या महिन्यात त्यांना आंबे येऊ देत. म्हणजे या सीझनला माझ्या आंब्याचा बिझनेस जोरदार होईल. शक्य आहे काय हे? 

आता ‘इन्स्टंट कॉफी’चा जमाना आहे, असं कितीही म्हटलं, तरी प्रत्येक गोष्टींना विशिष्ट वेळ हा द्यावाच लागतो. निसर्गाने या कालमर्यादा घालून दिल्या आहेत ना. अशा वेळी मी त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन समजावण्याचा प्रयत्न करते. 

मी एक उदाहरण देते...
मला माझ्या गाडीनं स्वत: ड्राइव्ह करत मुंबईहून पुण्याला जायचंय, तर मला काय तयारी करावी लागेल. माझ्याकडे एक गाडी हवी. कोणत्याही मॉडेलची. मला ड्रायव्हिंग यायला पाहिजे. मला रस्ते माहिती असले पाहिजेत. मी साक्षर पाहिजे, म्हणजे मला सूचनाफलकावरील सूचना वाचता येतील. मला नकाशा वाचता यायला हवा (गाडीतलं जीपीएस पाहून) मला ट्रॅफिकमध्ये आणि महामार्गावर दोन्ही पद्धतीचा गाडी चालवण्याचा अनुभव हवा. माझी नजर स्पष्ट, स्वच्छ हवी. चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलंच असेल, मला काय म्हणायचंय ते.

आपल्याला प्रत्येकाला देवानं आवाज दिलाय, जसा असेल तसा. ‘जो माणूस बोलू शकतो, तो प्रयत्नांती गाऊही शकतो’, असं मी नेहमी म्हणते. त्यासाठी फक्त आपल्या आवाजाला ‘ड्राइव्ह’ करणं शिकावं लागतं. तो आवाज संगीतासाठी वापरायला शिकावं लागतं. शुद्ध, कोमल, तीव्र स्वरांमध्ये आवाज सहजपणे फिरवण्यासाठी रियाज करावा लागतो. रियाजानं सुरेल झालेला आवाज, ऐकायला गोड लागतो. ‘तुमचा आवाज किती छान आहे’, अशी कमेंट जेव्हा गायकाला मिळते, तेव्हा आवाज कमावण्यासाठी त्याने केलेल्या रियाजाला दिलेली ती दाद असते. 

हा असा रियाज जर नियमित केला गेला, तर रोजच्या रोज खाण्याची पथ्यं काही पाळावी लागत नाहीत. सगळं खाऊ शकतो. फक्त कार्यक्रमाच्या किंवा रेकॉर्डिंगच्या आधी एक दोन दिवस पथ्य पाळलं तरी चालतं. म्हणजे माईकला आवाज निकोप, क्लियर छान लागतो.

माइकपुढे गाताना, सूर परफेक्ट लागण्यासाठी, रियाजाच्या वेळी अवगत झालेलं श्वासोच्छ्वासाचं तंत्र उपयोगी पडतं. माइक आपला आवाज शंभर पट मोठा करून ऐकवतो ना, मग कशाला मोठ्यानं गायचं? हा समज चुकीचा आहे. श्वासांच्या साहाय्यानं लागलेला सूर, मोकळा स्वच्छ लागतो. हा विशिष्ट पद्धतीनं आणि योग्य आवाजात लावलेला सूर जसा माइकमुळे शंभरपट मोठा ऐकवला जातो, तसंच झालेल्या बारीक-सारीक चुकाही शंभरपट मोठ्या होऊनच ऐकवल्या जातात, हेही ध्यानात घेतलं पाहिजे. त्यामुळे माइक असला, की चोरट्या आवाजात गायलं तरी चालतं, असं नाही.

आपल्याला रस्ते माहीत हवेत. हे रस्ते म्हणजे निरनिराळे राग. हे राग माहीत असले, तर आपण आपला आवाज हवा तसा वापरू शकतो. मी संगीताबाबत साक्षर पाहिजे, म्हणजेच मला संगीतशास्त्राचं बेसिक ज्ञान पाहिजे. स्वरांचे शुद्ध, कोमल, तीव्र, भेद, तालांच्या रचना याबद्दल माहिती हवी. संगीताच्या सादरीकरणात शास्त्राचं महत्त्व किती याबाबतीत मतभेद असू शकतील. संगीत शास्त्र की कला याबाबत पुन्हा पुढे कधीतरी लिहीन; पण ‘शास्त्रशुद्ध माहितीचं कलात्मक सादरीकरण संगीतात असावं,’ असं मला नेहमी वाटतं. 

मला मॅप रीडिंग यायला हवं म्हणजेच संगीताचा नोटेशन पद्धतीनं अभ्यास हवा. आपण काय गातोय, कुठे चाललोय, याचं भान स्वत:ला हवं. म्हणजे गाणं भरकटत नाही, रस्ता चुकत नाही. आपण सुरुवातीला मोकळ्या रस्त्यावर गाडी चालवायला शिकतो, म्हणजे गाडी चालवण्याचं तंत्र कळतं; पण प्रत्यक्षात रस्त्यावर गाडी काढली, की ट्रॅफिकमध्ये चालवण्याचं तंत्र आणि महामार्गावर चालवण्याचं तंत्र वेगळं असतं, हे कळून चुकतं. तसंच संगीतातली प्राथमिक माहिती मिळाल्यावर, शास्त्रीय, उपशास्त्रीय, सुगम ज्या प्रकारचं गायन करू इच्छितो, त्याप्रमाणे आवाजाचा निरनिराळ्या पद्धतीनं वापर करायला लागतो, हे लक्षात घ्यावं लागतं.

हे समजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं संगीत ऐकावं लागतं. आवाजाचा वापर कसा केला आहे, हे समजून घ्यावं लागतं. मग त्याबद्दलची ‘नजर’ तयार होते अन् तो बदल आत्मसात करण्याचा प्रयत्न केला जाते. थोडक्यात काय, तर काहीही अभ्यास, प्रयत्न न करता गायला जाल तर?
बघा पटतंय कां!

बाकी प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागात...

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
अनुराधा फाटक About 5 Days ago
Uttam article.
0
0
सौ. मंगला वेल्हाणकर About 6 Days ago
संगीत शिकण्याचा विचार केल्यास मनातील सहज येणारे प्रश्न व त्यांची उकल सोप्या व सहज पटतील अशा उदाहरणात मांडली गेली. छान माहितीपूर्ण लेख
0
0

Select Language
Share Link